समग्र प्रगती पुस्तक (Holistic Progress Card-HPC) उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत SCERT कार्यालयाकडून सर्व जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या लेखात समग्र प्रगती पुस्तक (HPC Card) काय आहे? समग्र प्रगती पत्रक भरलेला नमुना, मार्गदर्शिका पुस्तिका PDF लिंक सविस्तर माहिती दिली आहे.
Table of Contents
समग्र प्रगती पुस्तक (Holistic Progress Card-HPC) उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत
राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र परख मार्फत NCERT, PARAKH व भारत सरकारने सन २०२४-२५ पासून सर्व विद्यार्थ्यांना (HPC) Holistic Progress Card उपलब्ध करून देण्याविषयी निर्देशित केले आहे.
त्यानुसार पथदर्शी प्रकल्प म्हणून STARS अंतर्गत समग्र प्रगती पुस्तकाची अंमलबजावणी राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिलीसाठी करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीच्या ११,४७,९९२ विद्यार्थ्यांना समग्र प्रगती पुस्तक उपलब्ध करून देण्यात आले. तसेच या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सुमारे ८६ हजार शिक्षकांना शिक्षक मार्गदर्शिका उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तसेच ८२७ पीएम श्री शाळांमधील इयत्ता पहिली व दुसरी च्या एकूण ६०१३० विद्यार्थ्यांना विद्यार्थी पुस्तिका व ८२७ शिक्षकांना शिक्षक पुस्तिका वितरीत करण्यात आले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सदर प्रकल्प पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत आहे, PM SHRI योजनेअंतर्गत राज्यातील PM SHRI शाळांमध्ये पूर्वतयारी स्तरावरील ३५,८८१ विद्यार्थी व ८२७ शिक्षक, तसेच पूर्वमाध्यमिक स्तरावरील ३०,५४२ विद्यार्थी व ८२७ शिक्षक यांना पुस्तिका वितरीत करण्यात आल्या आहेत.
याची परिणामकारकता तपासण्याची जबाबदारी जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या वर सोपविण्यात आली होती.

समग्र प्रगती पुस्तक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक प्रगतीचेच नव्हे, तर भाषिक, गणितीय, सामाजिक, भावनिक, कलात्मक, क्रीडा आणि जीवनकौशल्यांच्या विकासाचे सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी शाळांमध्ये प्रभावी व्यवस्था निर्माण झाली आहे.
तसेच शिक्षकांमध्ये क्षमता-आधारित मूल्यमापनाची समज विकसित होऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील अपेक्षित मूल्यमापन पद्धतीच्या प्रभावी अंमलबजावणीस चालना मिळाली आहे. या अनुषंगाने, समग्र प्रगती पुस्तकाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी संबंधित प्राचार्य (DIET), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील निवडक शाळांना भेटी देऊन शिक्षकांकडून समग्र प्रगती पुस्तकाचा नियमित व उद्देशानुरूप वापर होत असल्याची पडताळणी करावी.
विशेषतः प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील निरीक्षण नोंदी, मूल्यमापन नोंदी व अभिप्राय नियमितपणे नोंदविण्यात येत आहेत किंवा नाही, तसेच समग्र प्रगती पुस्तकातील नोंदींचा वापर अध्यापन नियोजन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा आणि आवश्यक शैक्षणिक हस्तक्षेपासाठी केला जात आहे किंवा नाही, याची खात्री करावी.
तरी त्यासाठी आपण जिल्ह्यातील किमान १५ ते २० शाळांमध्ये (ज्या शाळांमध्ये समग्र प्रगती पत्रक वितरीत केले आहे त्या शाळा फक्त) HPC अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात आली आहे.
पडताळणीदरम्यान आढळून आलेल्या उत्कृष्ट कार्यपद्धती, अडचणी, आवश्यक सुधारणा, तसेच शिक्षक व मुख्याध्यापकांच्या सूचना यांचा जिल्हानिहाय संक्षिप्त अहवाल तयार करून आवश्यक छायाचित्रे व पुराव्यासह लेखी अहवाल दिनांक २० सप्टेंबर २०२६ पर्यंत मागविण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे कार्यालयाकडून सर्व जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत.
समग्र प्रगती पत्रक (HPC Crad) नेमकं काय आहे?
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) या धोरणानुसार शालेय शिक्षणामध्ये अनेक सकारात्मक बदल होत आहेत, त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे ‘समग्र प्रगती पत्रक’ ज्याला आपण HPC (Holistic Progress Card) म्हणून ओळखतो. आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे प्रामुख्याने गुणांवर किंवा मार्कांवर करत आलो आहोत, पण आता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हे समग्र प्रगती पत्रक नेमकं काय आहे, ते कसे समजून घ्यायचे आणि वर्गामध्ये प्रत्यक्ष कसे भरायचे, याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
HPC कार्ड काय आहे?
समग्र प्रगती पत्रक हे पायाभूत स्तरावरील (Foundational Stage) विद्यार्थ्यांचे ३६० अंश मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेले एक नाविन्यपूर्ण दस्तऐवज आहे. हे पत्रक केवळ विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती मोजत नाही, तर त्यांचा शारीरिक, सामाजिक, भावनिक, बोधात्मक, भाषा आणि साक्षरता तसेच सांस्कृतिक विकास कसा होत आहे याचा एक संपूर्ण आलेख आपल्यासमोर मांडते.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे मूल्यमापन करण्यासाठी यामध्ये ‘जाणीवजागृती’ (Awareness), ‘संवेदनशीलता’ (Sensitivity) आणि ‘सर्जनशीलता’ (Creativity) या तीन प्रमुख क्षमतांचा विचार करण्यात आला आहे.
सर्वांत वेगळी आणि सुंदर बाब म्हणजे, या पत्रकामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे स्तर मोजण्यासाठी गुणांऐवजी निसर्गातील संकल्पनांचा वापर करण्यात आला आहे. हे तीन स्तर म्हणजे ‘निर्झर’ (सुरुवातीचा टप्पा), ‘पर्वत’ (मध्यम टप्पा) आणि ‘आकाश’ (प्रगत टप्पा), जेव्हा एखादा विद्यार्थी नवीन गोष्ट शिकत असतो आणि त्याला मदतीची गरज असते तेव्हा तो ‘निर्झर’ स्तरावर असतो.
थोड्या मदतीने तो स्वतःहून कृती करू लागला की तो ‘पर्वत’ स्तरावर पोहोचतो आणि जेव्हा तो ती कृती अत्यंत आत्मविश्वासाने स्वतंत्रपणे करतो व इतरांनाही मदत करतो, तेव्हा तो ‘आकाश’ स्तरावर असतो. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर गुणांचे दडपण न येता त्यांच्या प्रगतीची अचूक दिशा शिक्षकांना समजते.
समग्र प्रगती पत्रक (HPC Card) कसे भरावे? याचे निकष
हे पत्रक भरण्याची प्रक्रिया अतिशय संवादात्मक आणि रंजक ठेवण्यात आली आहे. या पत्रकाचे प्रामुख्याने तीन भाग पडतात.
पहिला भाग हा विद्यार्थ्याची सर्वसाधारण माहिती आणि उपस्थिती याविषयी आहे. यातच ‘मी व माझा परिसर’ असा एक खास विभाग आहे जो विद्यार्थ्याने भरायचा आहे. अर्थात, पायाभूत स्तरावरील मुले लहान असल्याने शिक्षकांनी त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे कुटुंब आणि मित्र याविषयी माहिती विचारून ती नोंदवायची आहे.
दुसरा भाग हा विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कृती आणि मूल्यमापनावर आधारित आहे. यामध्ये शारीरिक, भावनिक, बोधात्मक अशा विविध विकास क्षेत्रांसाठी काही ध्येये आणि क्षमता दिलेल्या आहेत. शिक्षकांनी वर्गात एखादी कृती किंवा उपक्रम घेतल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग कसा होता, हे पाहून मूल्यमापन निकषसंच (Rubric) भरायचा आहे. यासाठी शिक्षकांनी वर उल्लेख केलेल्या जाणीवजागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता या तीन क्षमतांनुसार विद्यार्थी ‘निर्झर’, ‘पर्वत’ की ‘आकाश’ यापैकी कोणत्या स्तरावर आहे, ते पाहून त्या स्तराला खूण करायची आहे. या मूल्यमापनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त शिक्षकांचे निरीक्षण नाही, तर विद्यार्थ्याचे ‘स्वयंमूल्यांकन’, त्याच्या मित्राने केलेले ‘सहाध्यायी मूल्यांकन’ आणि ‘पालकांचे निरीक्षण’ या सर्वांना सामावून घेण्यात आले आहे.
तिसरा आणि शेवटचा भाग हा शैक्षणिक वर्षाच्या सारांशाचा असतो. वर्षअखेरीस सर्व विकास क्षेत्रांमधील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वर्णनात्मक स्वरूपात अभिप्राय शिक्षकांना येथे द्यायचा असतो. यातून विद्यार्थ्याची बलस्थाने आणि त्याला कुठे अधिक मार्गदर्शनाची गरज आहे, हे स्पष्टपणे समोर येते.
समग्र प्रगती पत्रक भरलेला नमुना
समग्र प्रगती हे पत्रक प्रत्यक्षात कसे भरायचे हे समजण्यासाठी आपण एका कृतीचे उदाहरण घेऊया.
समजा, तुम्ही शारीरिक विकास क्षेत्रांतर्गत ‘निरोगी आणि सुरक्षित सवयी’ या क्षमतेसाठी वर्गात एक कृतिगीत (Action Song) घेतले आहे. या गाण्यातून मुलांना भाज्या खाण्याचे आणि स्वच्छतेचे महत्त्व सांगितले जात आहे.
जेव्हा तुम्ही या कृतीचे मूल्यमापन कराल, तेव्हा तुम्हाला विद्यार्थ्याचे बारकाईने निरीक्षण करायचे आहे.
जर एखादा विद्यार्थी गाण्यात सांगितलेल्या स्वच्छतेच्या सवयींबद्दल फक्त माहिती ठेवतो पण प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी त्याला सतत आठवण करून द्यावी लागत असेल, तर तुम्ही त्याच्या ‘जाणीवजागृती’ क्षमतेत ‘पर्वत’ या स्तरावर खूण कराल.
पण जर तो विद्यार्थी स्वतःहून डबा खाण्यापूर्वी हात धुत असेल आणि आपल्या मित्रांनाही तसे करण्यास सांगत असेल, तर तो ‘आकाश’ स्तरावर आहे असे मानले जाईल.
तसेच, ‘संवेदनशीलता’ तपासताना जर विद्यार्थी स्वतःचे अन्न वाया न घालवण्याबाबत जागरूक असेल आणि इतरांनाही तसे करण्यास प्रवृत्त करत असेल, तर तिथेही तुम्ही योग्य स्तरावर नोंद कराल.
त्यानंतर शिक्षक आपल्या अभिप्रायाच्या रकान्यात लिहू शकतात की, “विद्यार्थ्याला स्वच्छतेच्या सवयींची उत्तम माहिती आहे, परंतु प्रत्यक्ष आचरणासाठी त्याला थोड्या अधिक प्रोत्साहनाची आणि सराव करण्याची गरज आहे.”
याच पानावर खाली विद्यार्थी स्वतःच्या आवडीनुसार हसऱ्या किंवा विचार करणाऱ्या चेहऱ्यावर खूण करून ‘मला हे काम करायला आवडले का?’ याचे उत्तर देईल. तसेच, घरातील शैक्षणिक वातावरणाबाबत पालक आपला अभिप्राय नोंदवतील.
थोडक्यात सांगायचे तर, समग्र प्रगती पत्रक हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील एक अत्यंत आनंददायी आणि सर्वांगीण विकासाचे चित्र उभे करणारे साधन आहे. हे पत्रक भरताना विद्यार्थ्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून त्याला योग्य ते मार्गदर्शन करणे आणि शिक्षणाचा आनंद मिळवून देणे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे.
समग्र प्रगती पुस्तक (HPC Card) मार्गदर्शिका पुस्तिका PDF Download
- समग्र प्रगती पुस्तक (Holistic Progress Card-HPC) उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत परिपत्रक
- समग्र प्रगतिपत्रक (HPC) पायाभूत स्तर पुस्तिका PDF डाउनलोड करा
- समग्र प्रगतिपत्रक (HPC) शिक्षक मार्गदर्शिका पायाभूत स्तर पुस्तिका PDF डाउनलोड करा











