Shala Bahya Vidyarthi Sarvekshan 2026: राज्यातील शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षण २०२६-२७ (Out-of-School Children Survey) बाबत महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या असून, प्रत्येक जिल्ह्यात सर्वेक्षण करून शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
Table of Contents
शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण 2026-27
शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक २३ जून, २०२२ अन्वये राज्यात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात येते. (शासन निर्णय PDF लिंक खाली दिलेली आहे.)
सदर सर्वेक्षणामध्ये आढळून येणाऱ्या शाळाबाह्य तसेच अनियमित बालकांना त्यांच्या नजिकच्या शाळेत दाखल करणे व त्यांचे शिक्षण अखंडित राहण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येते.
तथापि, असे असूनही प्रत्येक जिल्ह्यात शाळाबाह्य बालकांचे प्रमाण अद्यापही लक्षणीय असल्याचे दिसून येते.
कौटुंबिक अडचणी, पालकांची कमकुवत आर्थिक परिस्थिती, शिक्षणाबाबत पालकांची अनास्था इ. कारणांमुळे बालके शाळेत दाखल होत नाहीत अथवा शाळेत अनियमित असतात. शहरे तसेच मोठ्या गावांतील रस्ते, रल्वेस्थानके, राज्य परिवहन मंडळाची बसस्थानके इ. ठिकाणी शाळाबाह्य बालके आढळून येत असतात.
याची दखल घेऊन पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे यांचेकडून जून व जुलै २०२६ मध्ये पुणे शहरामध्ये रस्त्यांवर आढळून येणाऱ्या बालकांचे ( Street Children) सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते.
सदर सर्वेक्षणामध्ये केवळ पुणे शहरामध्ये ८३१ शाळाबाह्य बालके असल्याचे आढळून आले आहे. सदर ८३१ शाळाबाह्य बालकांना शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्याबाबत कार्यवाहीचे नियोजन पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे यांचेकडून करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे यांनी राबविलेल्या शाळाबाह्य बालकांच्या शोधमोहिमेच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यवाही होणे गरजेचे आहे. तरी, आपल्या जिल्ह्यातील इतर यंत्रणांसोबत पोलीस प्रशासनाचेही सहकार्य घेऊन सर्वेक्षणाचे काम यशस्वीपणे पूर्ण करावे व एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यादृष्टीने कार्यवाही करण्याबाबत सर्व जिल्ह्यांना प्राथमिक शिक्षण संचालनालय राज्य कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण अ ब क ड प्रपत्र PDF
शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांच्या सर्वेक्षणासाठी प्रपत्र अ, ब, क आणि ड मध्ये कोणती माहिती भरायची, याची सविस्तर माहिती पाहूया.
- प्रपत्र अ = कुटुंबाची सर्वसाधारण माहिती
- प्रपत्र ब = शाळाबाह्य बालकांची माहिती
- प्रपत्र क = स्थलांतरित होऊन गेलेल्या बालकांची माहिती
- प्रपत्र ड = स्थलांतरित होऊन आलेल्या बालकांची माहिती
प्रपत्र “अ” – कुटुंबाची सर्वसाधारण माहिती
या प्रपत्रामध्ये सर्वप्रथम कुटुंबाची प्राथमिक माहिती घेतली जाते. यात जिल्हा, गाव/शहर, वस्तीचे नाव, ग्रामीण/शहरी विभाग, सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकाचे नाव व मोबाईल क्रमांक आणि कुटुंब क्रमांक यांचा समावेश आहे.
यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव व पत्ता, सामाजिक प्रवर्ग, व्यवसाय आणि कुटुंबातील ३ ते १८ वयोगटातील एकूण बालके यांची संख्या नोंदवली जाते.
तसेच या वयोगटातील किती बालके अंगणवाडी/बालवाडी किंवा शाळेत दाखल आहेत, किती विशेष गरजाधिष्ठित बालके आहेत आणि त्यापैकी किती बालके शिक्षणाच्या प्रवाहात आहेत, याची माहिती घेतली जाते.
प्रपत्र “अ” मध्ये शाळेत जाऊ न शकणाऱ्या मुलांची संख्या इयत्ता १ली ते ५वी, ६वी ते ८वी आणि ९वी ते १२वी अशा गटांमध्ये नोंदवली जाते. शेवटी पालक आपल्या पाल्यांना नियमितपणे शाळेत पाठविण्यास तयार आहेत का, याची होय/नाही स्वरूपातील माहिती घेतली जाते.
प्रपत्र “ब” – शाळाबाह्य बालकांची नोंद
हे प्रपत्र प्रत्यक्ष शाळाबाह्य बालकांची वैयक्तिक माहिती नोंदवण्यासाठी आहे. यात दोन प्रकारच्या बालकांची नोंद केली जाते—
E1: कधीच शाळेत न गेलेले बालक
E2: अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेले बालक.
या प्रपत्रात बालकाचे पूर्ण नाव, E1/E2 प्रकार, वय, आधार क्रमांक उपलब्ध असल्यास, लिंग, जात प्रवर्ग, कुटुंब प्रमुखाचे नाव, संपर्क क्रमांक आणि पूर्ण पत्ता घेतला जातो.
याशिवाय बालक विशेष गरजाधिष्ठित आहे का, असल्यास त्याचा प्रकार, बालमजूर म्हणून काम करत असल्यास कामाचे ठिकाण, तसेच बालक शाळाबाह्य होण्याची कारणे नोंदवली जातात.
बालक यापूर्वी शाळेत शिकत असेल तर त्याची पूर्वीची शाळा व इयत्ता, सध्या कोणत्या इयत्तेत प्रवेश द्यायचा आहे आणि ज्या शाळेत प्रवेश द्यायचा आहे त्या शाळेचे नाव व UDISE क्रमांक याचीही नोंद केली जाते.
प्रपत्र “क” – स्थलांतरित होऊन गेलेल्या बालकांची नोंद
हे प्रपत्र अशा बालकांसाठी आहे जे कुटुंबासह परगावी, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात किंवा राज्याबाहेर स्थलांतरित होऊन गेले आहेत.
यामध्ये बालकाचे नाव, जन्मतारीख, वय, लिंग, जात प्रवर्ग, पालकाचे नाव व संपर्क क्रमांक, स्थलांतर करण्यापूर्वीचा पूर्ण पत्ता आणि बालक विशेष गरजाधिष्ठित असल्यास त्याचा प्रकार नोंदवला जातो.
तसेच स्थलांतर करण्यापूर्वी बालक कोणत्या शाळेत आणि कोणत्या इयत्तेत शिकत होते, त्या शाळेचा UDISE क्रमांक व पत्ता याची माहिती घेतली जाते.
बालक गावाबाहेर/तालुक्याबाहेर, जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर स्थलांतरित झाले असल्यास संबंधित गाव/तालुका, जिल्हा किंवा राज्याचे नाव नोंदवण्याची स्वतंत्र माहिती यात आहे.
प्रपत्र “ड” – स्थलांतरित होऊन आलेल्या बालकांची नोंद
हे प्रपत्र उलट परिस्थितीसाठी आहे. म्हणजेच बाहेरगावातून, दुसऱ्या तालुक्यातून, जिल्ह्यातून किंवा राज्यातून स्थलांतरित होऊन आलेल्या कुटुंबातील बालकांची नोंद या प्रपत्रात केली जाते.
यामध्ये बालकाचे नाव, जन्मतारीख, वय, लिंग, जात प्रवर्ग, पालकाचे नाव व संपर्क क्रमांक आणि सध्याचा पूर्ण पत्ता नोंदवला जातो.
तसेच बालक स्थलांतरित होण्याचे कारण, विशेष गरजाधिष्ठित बालक असल्यास त्याचा प्रकार, स्थलांतरापूर्वीची शाळा, UDISE क्रमांक, पूर्वीची इयत्ता आणि सध्या राहत असलेल्या ठिकाणच्या जवळच्या शाळेचे नाव व UDISE क्रमांक घेतला जातो.
बालक परगावातून/इतर तालुक्यातून, इतर जिल्ह्यातून किंवा इतर राज्यातून आले असल्यास त्या गाव/तालुका, जिल्हा किंवा राज्याचे नावही नोंदवले जाते.
या चारही प्रपत्रांचा मुख्य उद्देश शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित बालकांचा शोध घेणे, त्यांची माहिती नोंदवणे आणि त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे हा आहे. शासन निर्णयातही या प्रपत्रांमध्ये योग्य त्या बालकांची नोंद घेण्याचे स्पष्ट निर्देश आहेत.
शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण अ ब क ड प्रपत्र PDF Download
शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण शासन निर्णय PDF
- शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करणेसाठी मिशन झिरो ड्रॉपआऊट (MISSION ZERO DROPOUT) राबविणेबाबत दि 23-06-2022 शासन निर्णय डाउनलोड करा
- शाळाबाह्य,अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करणेसाठी विशेष शोध मोहिम राबविणेबाबत दि 23-02-2021 शासन निर्णय PDF डाउनलोड करा
- शाळाबाह्य विद्यार्थ्यांशी संबंधीत विषयावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करणेबाबत दि 19-07-2022 शासन निर्णय











