‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६’ (The Rights of Persons with Disabilities Act, 2016) भारत सरकारने दिव्यांग (अपंग) व्यक्तींसाठी एक महत्वपूर्ण कायदा दि.२७ डिसेंबर २०१६ रोजी पारित केला आहे. या नवीन कायद्यानुसार दिव्यांग (अपंग) म्हणजे काय? आणि अपंगत्वाचे RPWD ACT 2016 नुसार (दिव्यांग २१ प्रकार) कोणते? त्याची व्याख्या कायद्यात कशी आहे? याबद्दलची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.
RPWD Act 2016 कायदा काय आहे? दिव्यांग 21 प्रकार आणि कायद्यातील तरतुदी? । The Rights of Persons with Disabilities Act 2016

दिव्यांग व्यक्तींना समाजात समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग मिळावा यासाठी भारत सरकारने दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ (RPWD Act 2016) लागू केला आहे.
या कायद्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांवरील कराराची प्रभावी अंमलबजावणी करणे हा आहे.
याआधी लागू असलेला १९९५ चा कायदा बदलून हा नवीन आणि अधिक व्यापक स्वरूपात आणलेला कायदा आहे. ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिक मजबूत बनले आहे.
या कायद्यानुसार सरकारी नोकऱ्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींना किमान ४% आरक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच उच्च शिक्षण संस्थांमध्ये किमान ५% जागा राखीव ठेवण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
६ ते १८ वर्षे वयोगटातील दिव्यांग मुलांना मोफत शिक्षणाचा अधिकार देण्यात आला असून, शिक्षणापासून ते रोजगारापर्यंत त्यांना समान संधी मिळाव्यात यावर भर देण्यात आला आहे.
याशिवाय सरकारी कार्यालये, सार्वजनिक इमारती, वाहतूक व्यवस्था आणि दळणवळणाची साधने दिव्यांगांसाठी सुलभ (Accessible) करणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे.
या नवीन कायद्यात दिव्यांगत्वाच्या प्रकारामध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ७ प्रकारच्या दिव्यांगत्वाचा समावेश होता, तर आता ही संख्या २१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये शारीरिक अपंगत्व, अंधत्व, बहिरेपणा यांसोबतच कुष्ठरोगमुक्त व्यक्ती, मस्कुलर डिस्ट्रॉफी, ॲसिड हल्ला पीडित, ऑटिझम, मानसिक आजार तसेच थॅलेसेमिया आणि हिमोफिलिया यांसारख्या रक्ताशी संबंधित विकारांचाही समावेश करण्यात आला आहे.
४०% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींना ‘बेंचमार्क डिसेबिलिटी’ श्रेणीत समाविष्ट करून विविध सरकारी योजना आणि सवलतींचा लाभ दिला जातो.
दिव्यांग व्यक्तींवर होणारा भेदभाव थांबवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर सल्लागार मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने या कायद्याचे उल्लंघन केले किंवा दिव्यांग व्यक्तींचा छळ केला, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आणि तुरुंगवासाची तरतूदही करण्यात आली आहे.
एकंदरीत हा कायदा दिव्यांग व्यक्तींना केवळ सुविधा देणारा नाही, तर त्यांना सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा मजबूत कायदेशीर अधिकार देणारा महत्त्वाचा कायदा आहे.
आता आपण या नवीन RPWD Act नुसार दिव्यांग म्हणजे काय? आणि दिव्यांगत्वाचे 21 प्रकार कोणते आहेत? पाहूया.
दिव्यांग म्हणजे काय? | Divyang Meaning
दिव्यांग (अपंग)शब्द ऐकला की, आपल्या डोळ्यासमोर हाताने , पायाने अधु असलेली व्यक्ती येते. परंतु हाताने किंवा पायाने अधु असलेलीच व्यक्ती दिव्यांग (अपंग) नव्हे हा एक अस्थिव्यंगाचा प्रकार झाला. मग याप्रमाणे शारीरिक, बौद्धिक, मानसिक दृष्ट्या दिव्यांग्त्वाचे RPWD ACT 2016 नुसार २१ दिव्यांग प्रकार आहेत.
साधारणपणे दिव्यांग किंवा अपंग, विकलांग असे शब्द ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर हात पायाने अपंग , चालता न येणे (लुळा,पांगळा,आंधळा) असे चित्र येते.
परंतु आता यापुढे अपंग , विकलांग (लुळा,पांगळा,आंधळा) अशी ओळख न ठेवता यासाठी ‘दिव्यांग’ हा शब्द आला आहे. मात्र शब्द जरी बदलले तरी दिव्यांग बांधवांची प्रथम ओळख ही स्वतःच्या नावानेच आपण त्यांना ओळखले पाहिजे यासाठी आपणा सर्व समाजातील घटकांची जबाबदारी आहे.
दिव्यांग बांधवाना समाजात सामावून घेण्यासाठी समान संधी आणि हक्काचे संरक्षण होण्यासाठी त्यासोबतच सहाय्य मिळण्यासाठी दिव्यांग प्रकार आणि त्यानुसार सोयी सुविधा लाभ मिळावा. जेणेकरून Divyang व्यक्ती देखील एक सर्वसामान्य प्रमाणे आनंदाने जीवन जगू शकेल.
दिव्यांग म्हणजे काय? समजून घेण्यासाठी प्रथम Impairment (दोष,विकार) , Disability (अक्षमता) आणि Handicap (अपंगत्व) हे शब्द समजून घेऊया.
दोष आणि अक्षमता हे दोन शब्द नेहमी वापरले जातात. दिव्यांग व्यक्ती म्हंटले कि , त्यांच्यामध्ये दोष आणि अक्षम आहे. अशी आपली समजूत असते. मात्र हे दिव्यांग व्यक्तींच्याच बाबतीत नाही तर सर्वसामान्य तुमच्या माझ्या सारख्या सर्व व्यक्तींना याचा कधीना कधी अनुभव आलेला असतोच, दोष आपल्या शरीराच्या कार्याबद्दल थोडा फार बिघाड व्यक्त करतो; तर ‘अक्षमता’ हा शब्द कोणतेही कार्य करण्याबाबत असमर्थता व्यक्त करतो.
आपल्यातील प्रत्येकालाच कधी ना कधी तरी अपरिचित वातावरणात किंवा शारीरिक इजा झाली असेल तर किंवा आजारपणात आपण अक्षम असल्याचे जाणवते. उदा. आजारपणात आपले नेहमीचेच काम, नेहमीच्या उत्साहाने वा तडफेने पार पाडण्यास आपल्याला असमर्थता जाणवते. अस्थिव्यंगासारखी शारीरिक इजा झाली असता किंवा हातपाय जोरात मुरगळल्यास त्याचा प्रभावी वापर करता येत नाही. उदा. चालणे , पळणे, लिहणे शक्य होत नाही.
Impairment बिघाड,(दोष,विकार)
‘Impairment’ म्हणजे शरीर रचना आणि शरीराच्या अवयवांचे कार्य बाधित असणे किंवा सामान्यपणे न होणे होय. आजार , जखम, आपले शरीर-कार्य करताना उद्भवणारी गुंतागुंत.
Disability (अक्षमता)
जेव्हा एखादी व्यक्ती जन्मतः असलेल्या किंवा नंतर निर्माण झालेल्या क्षतीमुळे स्वतःचे काम इतर सर्वसामान्य लोकांप्रमाणे करू शकत नाही तेव्हा त्या स्थितीला त्या व्यक्तीची ‘अक्षमता’ असे म्हणतात.
क्षतिग्रस्तते मुळे काम करण्याच्या क्षमतेवर मर्यादा येतात व त्यातूनच व ‘अक्षमता’ निर्माण होते व अक्षमता ही जन्मतः किंवा जन्मानंतर निर्माण होऊ शकते तसेच व ‘अक्षमता’ ही तात्पुरती किंवा कायमस्वरूपी असू शकते. उदा. दृष्टी नसेल तर अंधत्वाची स्थिती निर्माण होते. एकाच प्रकारच्या अक्षमतेत दोन व्यक्तींच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतील. उदा. कर्णबधीर , अंध, बौद्धिक अक्षमता
Handicap (अपंगत्व)
जेव्हा एखाद्या व्यक्तीची अक्षमता इतकी तीव्र स्वरूपाची असते की, त्या व्यक्तीला तिच्या सर्व कामांसाठी इतरांवर किंवा समाजावर अवलंबून रहावे लागते, तेव्हा त्या व्यक्तीच्या त्या स्थितीला ‘अपंगत्व’ असे म्हणतात.
दिव्यांग म्हणजे काय? Divyang Meaning in Marathi
‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६’ (RPWD Act, 2016) या अधिकृत कायद्याच्या GAZETTE मधील कलम २ नुसार मुख्य व्याख्या खालीलप्रमाणे करण्यात आलेल्या आहेत.

१. अपंग व्यक्ती (Person with Disability)
कलम २ (s) नुसार, “अपंग व्यक्ती” म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती जिला दीर्घकालीन शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा संवेदनात्मक (Sensory) अक्षमता असते. ही अक्षमता किंवा त्रुटी जेव्हा समाजात वावरताना वेगवेगळ्या अडथळ्यांशी (Barriers) संवाद साधते, तेव्हा त्या व्यक्तीला इतर नागरिकांच्या बरोबरीने समाजात पूर्ण आणि प्रभावीपणे सहभागी होण्यात अडचण निर्माण होते. त्यास अपंग व्यक्ती (Person with Disability) संबोधले आहे.
२. बेंचमार्क अपंगत्व असलेली व्यक्ती (Person with Benchmark Disability)
कलम २ (r) नुसार, “बेंचमार्क अपंगत्व असलेली व्यक्ती” म्हणजे अशी व्यक्ती जिला या कायद्याच्या अनुसूचीमध्ये (Schedule) नमूद केलेल्या २१ विशिष्ट अपंगत्वांपैकी कोणतेही अपंगत्व किमान ४०% किंवा त्याहून अधिक प्रमाणात आहे. ज्या अपंगत्वाचे मोजमाप मोजता येण्याजोग्या अटींमध्ये परिभाषित केलेले नाही, तिथे अधिकृत प्रमाणन प्राधिकरणाने (Certifying Authority) तसे अपंगत्व असल्याचे प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.
३. उच्च साहाय्याची गरज असलेली अपंग व्यक्ती (Person with Disability having High Support Needs)
कलम २ (t) नुसार, “उच्च साहाय्याची गरज असलेली अपंग व्यक्ती” म्हणजे बेंचमार्क अपंगत्व असलेली अशी प्रमाणित व्यक्ती जिला तिच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी, स्वतंत्रपणे व विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी, तसेच शिक्षण, रोजगार, कौटुंबिक व सामाजिक जीवनात आणि उपचारात पूर्णपणे सहभागी होण्यासाठी अत्यंत तीव्र शारीरिक, मानसिक किंवा इतर साहाय्याची आवश्यकता असते.
दिव्यांग (अपंगत्व) म्हणजे काय? व्याख्या
Impairment (दोष,विकार) , Disability (अक्षमता) आणि Handicap (अपंगत्व)लक्षात घेता, ‘दिव्यांग (अपंगत्व) असणारी व्यक्ती’ म्हणजे दीर्घकालीन ज्या व्यक्तीमध्ये शारीरिक , बौद्धिक , मानसिक , पेशी व रक्तासंबंधी किंवा संवेदना दोष/अक्षम असतात. ज्यांचे प्रमाणीकरण केले असता, ४०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग्त्व / अपंगत्व प्रमाण असते. ती व्यक्ती ‘दिव्यांग’ किंवा ‘अपंग’ म्हणून ओळखली जाते. आणि या व्यक्तीस शासनाने लागू केलेल्या सरकारी योजना, आरक्षण किंवा इतर सुविधांचा लाभ घेता येतो.
दिव्यांग/अपंगत्वाचे वर्गीकरण
‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६’ नुसार शारीरिक , बौद्धिक , मानसिक , पेशी व रक्तासंबंधी किंवा संवेदना दोष/अक्षम निहाय वर्गीकरणांसह दिव्यांग २१ प्रकार खालीलप्रमाणे आहे.
1. शारिरीक (Physical disability)
शारिरीक दिव्यांग्त्व (अपंगत्व) मध्ये शरीराचा कोणताही भाग किंवा अवयव निकामी होणे , शारिरीक वाढ खुंटणे , स्नायू ची विकृती या प्रकारच्या समस्या Physical disability या व्यक्ती मध्ये आढळून येतात.
- अस्थिव्यंग (Locomotor disability)
- कुष्टरोग (Leprosy cured person)
- मेंदूचा पक्षाघात (Cerebral Palsy)
- बुटकेपणा (Dwarfism)
- अविकसित मांसपेशी (Muscular Dystrophy)
- ACID ह्ल्लाग्रस्त पिडीत (Acid Attack Victims)
- अंध (Blindness)
- अंशतः अंध (अल्पदृष्टी) (Low-Vision)
- कर्णबधीर (Hearing Impairment)
- वाचा आणि भाषा अक्षमता (Speech and Language Disability)
2. बौद्धिक अक्षमता (Intellectual Disability)
- बौद्धिक अक्षमता (Intellectual Disability)
- अध्ययन अक्षमता (Specific Learning Disabilities)
- स्वमग्नता (Autism Spectrum Disorder)
3. मानसिक (Mental Behaviour)
- मानसिक आजार (Mental illness)
4. पेशी व रक्तासंबंधी (Chronic neurological & Blood disorder)
- मल्टीपल स्क्लेरोसिस (Multiple Sclerosis)
- मज्जासंस्थेचे तीव्र आजार (Chronic Neurological Conditions)
- कंपवात रोग (Parkinsons disease)
- हिमोफेलीया /अधिक रक्तस्त्राव (Hemophilia)
- थॅलेसिमिया कॅन्सर (Thalassemia)
- सिकल सेल डिसीज (Sickle Cell Disease)
- बहुविकलांग (Multiple Disabilities)
अशा प्रकारे RPWD ACT 2016 मध्ये दिव्यांग म्हणजे काय? सविस्तर व्याख्या, 21 प्रकार व आरक्षण व आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी : The Rights of Persons with Disabilities Act 2016 PDF Download Click Here
सारांश
RPWD Act 2016 हा दिव्यांग व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाचा कायदा भारत सरकारने पारित केला आहे. त्यानुसार या लेखात आपण दिव्यांग म्हणजे काय? Impairment (दोष, विकार) , Disability (अक्षमता) आणि Handicap (अपंगत्व) या संकल्पना समजून घेतल्या. त्यासोबतच दिव्यांग (अपंगत्वाचे) २१ प्रकार आणि दिव्यंगत्वाचे वर्गीकरण ज्या व्यक्तीमध्ये शारीरिक , बौद्धिक , मानसिक, पेशी व रक्तासंबंधी दीर्घकालीन बिघाड किंवा कायमस्वरूपी अपंगत्व असते हे समजून घेतले. तसेच ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६’ (RPWD ACT 2016) नुसार दिव्यांग २१ प्रकार , दिव्यांग व्याख्या आणि दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या तरतुदी याबाबत या लेखामध्ये सविस्तर माहिती दिली आहे.







