Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

राज्यातील सर्व विशेष शिक्षकांचा होणार समारंभपूर्वक सन्मान; जिल्हानिहाय समारंभ आयोजित करण्याचे निर्देश

महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यासाठी जिल्हानिहाय समारंभ आयोजित करण्याचे निर्देश

Special Educator Honour Latest update

Special Educator Honour Latest Update : राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापन व शैक्षणिक सहाय्य करणाऱ्या सर्व विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समारंभपूर्वक कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत.

यासंदर्भात मा. मुख्यमंत्री सचिवालयाचे दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजीचे पत्र संबंधित जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले आहे. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील पात्र विशेष शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील सर्व विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा केली होती.

जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या-आपल्या जिल्ह्यात समारंभपूर्वक कार्यक्रम आयोजित करून विशेष शिक्षकांचा सन्मान करावा, असे निर्देश त्यावेळी देण्यात आले होते.

सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या शाळांतील विशेष शिक्षकांचा समावेश

दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या विशेष शिक्षकांना या सन्मानासाठी समाविष्ट करण्यात येणार आहे.

यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांना अध्यापन, मार्गदर्शन आणि आवश्यक शैक्षणिक सहाय्य करणाऱ्या विशेष शिक्षकांचा सन्मान प्रमाणपत्र देऊन केला जाणार आहे.

जिल्हानिहाय समारंभाचे आयोजन

प्रत्येक जिल्ह्यात विशेष शिक्षकांसाठी समारंभपूर्वक कार्यक्रम आयोजित करण्याची कार्यवाही यथाशीघ्र पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष शिक्षकांच्या योगदानाची दखल घेत त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष शिक्षक करत असलेल्या कार्याला या उपक्रमातून औपचारिक मान्यता मिळणार आहे.

कार्यपूर्ती अहवाल सादर करण्याचे निर्देश

कार्यक्रमाचे आयोजन आणि विशेष शिक्षकांचा सन्मान केल्यानंतर त्याबाबतचा कार्यपूर्ती अहवाल शासनास तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांकडून विशेष शिक्षकांची माहिती संकलित करून कार्यक्रमाच्या आयोजनाची कार्यवाही सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समावेशित शिक्षणाच्या दृष्टीने विशेष शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्याचा हा उपक्रम त्यांच्या कार्याची दखल घेणारा ठरणार आहे.

Special Educator Honour

शिक्षक दिन २०२६: विशेष शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान (3 sep 2026)

‘दिशा‘ अभियान राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, त्यानिमित्ताने शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विशेष शिक्षकांचा गौरव करणार असल्याचे जाहीर केले व सोबतच नियमित शिक्षकांच्या प्रशिक्षणात दिशा अभ्यासक्रमाचा समावेश होणार असल्याचे सांगितले. सविस्तर वाचा.

Special educators felicitated with certificates by the Chief Minister

सर्वसमावेशक विकास हा भारतीय संस्कृतीचा मूलभूत विचार असून समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला योग्य संधी आणि पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे. ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या ध्येयाकडे वाटचाल करताना समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होणे गरजेचे आहे. यासाठी ‘दिशा’ अभियानाच्या माध्यमातून विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जात आहे.

या अभियानाशी जोडलेल्या राज्यातील सर्व विशेष शिक्षकांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल राज्य शासनाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, विशेष मुलांचे मूल्यमापन केवळ त्यांच्या गुणांच्या आधारे न करता, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजात समरस होण्याची क्षमता यावरही केले पाहिजे. विशेष मुलांना योग्य शिक्षण, संधी आणि वातावरण उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र देशासाठी दिशादर्शक ठरत आहे.

LIVE : शिक्षक दिनानिमित्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक संवाद सत्र

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘दिशा’ अभियान स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सध्या राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ४५० हून अधिक शाळा, २७०० हून अधिक शिक्षक आणि २१ हजारांहून अधिक दिव्यांग व बौद्धिक अक्षमता असलेले विद्यार्थी या अभियानाशी जोडले गेले आहेत.

वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक अध्यापन तंत्राच्या आधारे विशेष मुलांना शिक्षण देण्यासाठी आवश्यक साधनसामग्री या उपक्रमातून उपलब्ध करून दिली जात आहे.

राज्यातील सर्व विशेष शिक्षकांचा होणार सन्मान

कार्यक्रमात पाच विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये समारंभपूर्वक सर्व विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

‘दिशा’ अभियान हा शासनाच्या प्राधान्यक्रमातील महत्त्वाचा उपक्रम असून, त्याच्या प्रगतीचा आणि अडचणींचा ‘वॉर रूम’मधून नियमित आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

नियमित शिक्षकांच्या प्रशिक्षणात दिशा अभ्यासक्रमाचा समावेश होणार

दिव्यांग कल्याण विभागामार्फत दरवर्षी प्रत्येक विशेष मुलापर्यंत आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत ‘दिशा’ अभियानाची उपयुक्त छापील वर्कबुक्स पोहोचविण्यात येणार आहेत. तसेच नियमित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बौद्धिक अक्षमता असलेल्या बालकांसाठी नियमित शिक्षकांच्या प्रशिक्षणात या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग आणि जय वकील फाऊंडेशन संयुक्तपणे प्रयत्न करणार आहेत.

बालकांमधील विशेष गरजांची वेळेत ओळख होण्यासाठी विशेष प्रशिक्षण मॉड्यूल (Special training modules) विकसित करण्याची गरज असून, यासाठी जय वकील फाऊंडेशनने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

राज्य शासन, समाज आणि सेवाभावी संस्थांच्या एकत्रित सहभागामुळे दिव्यांग शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे काम उभे राहिले आहे. या मॉडेलच्या माध्यमातून महाराष्ट्र संपूर्ण देशासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. जय वकील फाऊंडेशन, बजाज फिनसर्व्ह, एचटी पारेख फाऊंडेशन यांसह सामाजिक संस्थांनी या संवेदनशील विषयात घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी आभार मानले.

पाच विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक सन्मान

Special educators felicitated with certificates by the Chief Minister

बौद्धिक अक्षमता असलेल्या मुलांसाठी भारतातील पहिला प्रमाणित आणि एकसमान अभ्यासक्रम असलेल्या ‘दिशा अभियानाची’ प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल पाच विशेष शिक्षकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Special educators disha

यामध्ये यामिनी काळे (नवजीवन मतीमंद मुलांची शाळा, छत्रपती संभाजीनगर), अण्णासाहेब कदम (पांडुरंग निवास मतीमंद विद्यालय, लातूर), वैशाली गायकवाड (नंदनवन दुर्बल मनस्क मुलांची शाळा, नागपूर), ज्ञानेश्वर काळे (कै. रावसाहेब निवासी मतीमंद विद्यालय, देवळी, वर्धा) आणि मानसी मुलाम (जय वकील स्कूल फॉर चिल्ड्रन इन नीड ऑफ स्पेशल केअर, मुंबई शहर) यांचा समावेश आहे.

Special educators felicitated with certificates by the Chief Minister
Special educators felicitated with certificates by the Chief Minister

कार्यक्रमास जय वकील फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना चंद्र, एसीईसीएफचे सहसंस्थापक अमित चंद्र, जय वकील फाऊंडेशनच्या अध्यक्ष व संचालक डॉ. अनायता हेगडे, बजाज फिनसर्व्हच्या अध्यक्षा शेफाली बजाज, एचटी पारेख फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी झिया लालकाका, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव माणिक गुरसळ, आयुक्त सत्यजित बडे, समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थानचे संचालक राम कुमार आणि मुख्यमंत्री यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांच्यासह राज्यभरातील विशेष शिक्षक ऑनलाइन उपस्थित होते.

Special educators disha

दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त सत्यजित बडे यांनी प्रास्ताविकातून विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. अर्चना चंद्र यांनी जय वकील फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘दिशा’ अभियानाची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

दिशा’ (DISHA) अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी शासन निर्णय डाउनलोड करा

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ | National Teacher Award 2026

Teacher Day Special 2026 : शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ शिक्षकांसह देशातील एकूण ८२ शिक्षकांचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील National Teacher Award 2026 संपूर्ण यादी.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील ९ शिक्षकांसह देशातील एकूण ८२ शिक्षकांचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. ४८ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि १३ कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांचा यात समावेश आहे.

पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, पदक आणि ५० हजार रुपये रोख प्रदान करण्यात आले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना राष्ट्रपतींनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीस अभिवादन करुन राष्ट्रपतींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर आणि गोपाळबंधू दास यांच्या शैक्षणिक योगदानाचा विशेष उल्लेख केला.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समारंभास केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी, शिक्षण मंत्रालयाचे सचिव अनिल कुमार, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या सचिव देबाश्री मुखर्जी आदी उपस्थित होते.

शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाहीत, तर त्यांचे व्यक्तिमत्त्व, चारित्र्याला आणि विचारांना आकार देऊन सशक्त राष्ट्राची पायाभरणी करतात. अंदमान-निकोबारपासून लडाखपर्यंत दुर्गम आणि ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या समर्पण कौतुकास्पद आहे. भारताला जगाची ज्ञान आणि कौशल्याची राजधानी बनविण्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच तंत्रज्ञान, नैतिक मूल्ये आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

National Teacher Award 2026 महाराष्ट्रातील सन्मानप्राप्त शिक्षक

  • डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे – साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय, बीड,
  • कुंदा जयवंत बच्छाव – महापालिका शाळा, नाशिक,
  • वैभव वसंतराव कुलकर्णी – जवाहर नवोदय विद्यालय, लातूर,
  • शिवप्रसाद अरविंद टिंगरे – सैनिक स्कूल, सातारा,
  • डॉ. विक्रम विशाल – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई,
  • डॉ. अमर मोहनराव ताकसांडे – जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, दत्ता मेघे संस्था, वर्धा,
  • डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे – शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर,
  • किरण प्रकाश झरकर – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव,
  • अर्चना राकेश जाधव – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment