Varishtha Nivad Shreni Prashikshan Nondni 2026 : वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता माहे एप्रिल व मे २०२६ तसेच ९ सप्टेबर २०२६ ते २० सप्टेबर २०२६ या कालावधीत पात्र शिक्षकांना नावनोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती.
नवीन अपडेट: वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण वेळापत्रक व मार्गदर्शक सूचना
त्यानुसार ऑनलाईन प्रशिक्षण नावनोंदणी करत असताना काही पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण प्रकार व प्रशिक्षण गट यांची निवड करत असताना चुका केलेल्या आहेत.

अशा प्रशिक्षणार्थ्याना दिनांक २२/०९/२०२६ ते २५/०९/२०२६ या कालावधीमध्ये त्यांनी स्वतः निवड केलेल्या प्रशिक्षण गट आणि प्रशिक्षण प्रकारच्या चुका दुरुस्ती करणेसाठीची सुविधा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर (https://www.maa.ac.in/) प्रशिक्षणे मेनूअंतर्गत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण tab मध्ये प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण २०२६ च्या नावनोंदणीची दुरुस्तीसाठी लिंक द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरी यानुसार केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक दुरुस्ती करावयाची आहे, केवळ अशाच प्रशिक्षणार्थ्यांनी सदरच्या कालावधीमध्ये आवश्यक दुरुस्ती करावी. ज्या प्रशिक्षणार्थ्यांची नावनोंदणी अचूक झालेली आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी कोणतीही दुरुस्ती यामध्ये नोंदवू नये. तसेच दुरुस्तीची ही अंतिम संधी प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. याची नोंद घ्यावी
उपरोक्त सूचना चारही गटातील शिक्षकांसाठी असणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणीतील चुका दुरुस्तीची लिंक
राज्यातील ज्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नाव नोंदणी करणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (SCERT) कळविण्यात आले होते. आता नाव नोंदणी दुरुस्ती बाबत कळविण्यात आले आहे.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी वेळापत्रक
दरवर्षी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन माहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केले जाते. मात्र भारताची जनगणना २०२७ चा पहिला टप्पा दि. १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत होता व या राष्ट्रीय कार्यासाठी (घरगणना) राज्यातील बहुतांश शिक्षकांची नियुक्ती झालेली होती. त्यामुळे सदरील प्रशिक्षण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करता आले नाही. यास्तव सदरहू प्रशिक्षण माहे नोव्हें. २०२६ मध्ये दीपावलीच्या सुट्टीत आयोजित करावयाचे आहे.
प्रशिक्षण दीपावलीच्या सुट्टीत आयोजित करावयाचे असल्याने राज्यातील ज्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांची दि. ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्हताकारी सेवेची १२/२४ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक तसेच दि. ३० जून २०२७ पर्यंत सेवानिवृत्त होणारे असे काही शिक्षक, मुख्याध्यापक हे १२/२४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण करीत आहेत आणि ते या कालावधीत सेवानिवृत्त होणार आहेत फक्त असे शिक्षक/मुख्याध्यापक प्रशिक्षणासाठी पात्र असून या शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण घेता यावे यासाठी दिनांक ०९/०९/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक १६/०९/२०२६ रोजी संध्याकाळी ६.०० पर्यंत प्रशिक्षण नोंदणी करण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र पुन्हा ऑनलाईन नाव नोंदणी करणेसाठी दिनांक २०.०९.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
यापूर्वी माहे एप्रिल व मे २०२६ मध्ये वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण-२०२६ साठी ज्या शिक्षकांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे, अशा शिक्षकांनी पुन्हा ऑनलाईन नोंदणी करावयाची आवश्यकता नाही.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी सूचना
दिनांक २१ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होणेकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे.
यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करिता परिषदेमार्फत पोर्टल (www.maa.ac.in) विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक (मान्यताप्राप्त) या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करणेसाठी पुढीलप्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी. (नोंदणीबाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.)
१) प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरिता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरील ‘प्रशिक्षणे’ या टॅब मधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या नावावर क्लिक करून प्रक्रिया सुरू करावी.
२) वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.११.२०२६ पर्यंत एकूण १२ /२४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे. दिनांक ३०.०६.२०२७ रोजीपर्यंत सेवानिवृत्त होणारे शिक्षक ज्यांची १२ /२४ वर्षे अर्हताकारी सेवा होणार आहे असे प्रशिक्षणासाठी पात्र असणार आहे.
३) प्रशिक्षण नोंदणी दिनांक ०९.०९.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक १६.०९.२०२६ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुरू राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
४) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत.
- गट क्र. १ – प्राथमिक गट
(इ. १ली ते ४थी, इ. १ली ते ५वी, इ. १ली ते ७वी, इ. १ली ते ८वी, इ. ६वी ते ८वी) - गट क्र. २ – माध्यमिक गट
(इ. ९वी, १०वी) - गट क्र. ३ – उच्च माध्यमिक गट
(इ. ११वी, १२वी) - गट क्र. ४ – अध्यापक विद्यालय गट
५) मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी.
६) नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या SOP तसेच मार्गदर्शनपर प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी.
७) प्रशिक्षणार्थींनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी. जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करूनच नंतर नाव नोंदणी करावी.
८) प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ ID, ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
ज्या प्रशिक्षणार्थ्यांकडे शालार्थ आयडी उपलब्ध आहे, त्यांनी तो आयडी वापरून नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी जो आयडी वापरून नोंदणी केली आहे त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.
जर विभागाने पडताळणीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना पात्र केले नाही तर त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल व याबाबत केलेला कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही व प्रशिक्षण शुल्क परत केले जाणार नाही. पुणे मनपाचे संगीत व कला विषयाचे शिक्षक आपला मोबाईल नंबर वापरून नोंदणी करू शकतील.
९) आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ या पोर्टलवर नोंदवलेल्या ई-मेल आय.डी. वर OTP येईल. प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी.
तसेच आपल्या शालार्थ या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल. प्राप्त OTP नोंदवून नोंदणी पूर्ण करावी.
ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक यांचे verification होणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी.
१०) नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी. आपण निवडलेला प्रशिक्षण गट (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय) व प्रशिक्षण प्रकार (वरिष्ठ व निवड) यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहात.
११) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना व मार्गदर्शनपर संदर्भ साहित्य, व्हिडिओ, सर्व माहिती www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
१२) इंटरनेट बँकिंग/क्रेडीट/डेबिट कार्ड/UPI payment या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल. शुल्क भरत असताना अचूक माहिती भरणे आवश्यक आहे, जेणेकरून दुबार शुल्क भरणा होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत दुबार शुल्क परत केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
१३) सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु. २,०००/- (अक्षरी रुपये – दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit Card, Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे.
१४) एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये.
त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी. प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवाशुल्क बँकेच्या नियमानुसार प्रशिक्षणार्थींना लागू राहतील याची नोंद घ्यावी.
१५) ज्या कालावधीतील प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठीच्या प्रशिक्षणासाठी लागू राहील.
१६) प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन (रिसिप्ट) पावतीची PDF जतन करून ठेवावी. सदर पावती सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक असणार आहे.
आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इ. तपशील असणार असून ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ई-मेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
१७) नोंदणी अर्ज भरताना अथवा प्रशिक्षणादरम्यान काही अडचण उद्भवल्यास gradetraining@maa.ac.in या ई-मेल आय.डी.वर संपर्क करावा.
१८) नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षणाचे वेळापत्रक प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचे संयुक्त स्वाक्षरीने स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
१९) वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी वेळोवेळी www.maa.ac.in हे संकेतस्थळ पाहावे.
२०) पोर्टलच्या देखभाल दुरुस्तीसाठी पोर्टल दररोज रात्री ११.०० ते ०१.०० या कालावधीत बंद राहील.
२१) संदर्भ क्रमांक एक व दोनच्या शासन निर्णयानुसार सदर प्रशिक्षण हे शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/सर्व अनुदानित शाळांमधील शिक्षकांना लागू आहे. विनाअनुदानित/स्वयं अर्थसहाय्यीत शाळेतील शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू नये.
२२) ज्या पात्र शिक्षकांनी या पूर्वी माहे एप्रिल व मे २०२६ महिन्यात प्रशिक्षणाबाबत नोंदणी केलेली आहे अशा शिक्षकांनी पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे.
उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण परिपत्रक व शासन निर्णय
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी संदर्भातील परिपत्रक डाउनलोड करा
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी डायरेक्ट लिंक
- राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक/अध्यापक विद्यालयातील लागू करण्यात आलेल्या त्रि-स्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 20-07-2021 शासन निर्णय
- अधिकृत वेबसाईट : https://www.maa.ac.in/














