Shalarth Salary Update 2026: राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ प्रणालीद्वारे माहे सप्टेंबर २०२६ आणि ऑक्टोबर २०२६ चे वेतन अदा करण्याबाबत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. संचमान्यतेतील मंजूर पदांपेक्षा अधिक पदांवरील वेतन तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक त्रुटींमुळे प्रलंबित असलेल्या वेतन देयकांच्या संदर्भात शिक्षण संचानलाय कार्यालयाकडून सूचना देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ साठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संचमान्यता करण्यात आली आहे. या संचमान्यतेनुसार मंजूर पदांपेक्षा अधिक पदांवरील वेतन देयके काढण्यासाठी यापूर्वी एक स्तर वरिष्ठ अधिकारी यांच्या मान्यतेने परवानगी देण्यात आली होती.
या सवलतीचा उपयोग करून राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, डिजिटलायझेशनमधील कागदपत्रांची अपूर्णता, जन्मदिनांक व रुजू दिनांकाच्या चुकीच्या नोंदी, संचमान्यता आणि शालार्थ प्रणालीतील UDISE क्रमांकातील तफावत, एकाच UDISE क्रमांकावर एकापेक्षा अधिक DDO Code असणे, शाळा बंद होणे, संचमान्यतेत पद मंजूर नसणे तसेच न्यायालयीन प्रकरणांशी संबंधित बाबींमुळे वेतन देयके अदा करण्यास परवानगी देण्यात आली होती.
मात्र, १ सप्टेंबर २०२६ पासून संचमान्यतेतील मंजूर पदांपेक्षा अधिक पदांचे वेतन अदा करता येणार नाही, तसेच सेवाविषयक बाबींमध्ये त्रुटी असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतनही अदा करता येणार नाही, असे निर्देश देण्यात आले होते.
सप्टेंबर व ऑक्टोबर २०२६ चे वेतन करण्यास परवानगी
सद्यस्थितीतील कामकाजाची व्याप्ती आणि दसरा व दिवाळी या महत्त्वाच्या सणांचा विचार करून, सप्टेंबर २०२६ व ऑक्टोबर २०२६ या दोन महिन्यांचे वेतन एक स्तर वरिष्ठ अधिकारी यांच्या मान्यतेने अदा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही परवानगी तात्पुरती असून संबंधित कार्यालयांनी शालार्थ प्रणालीतील प्रलंबित त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत करावयाच्या कार्यवाही
विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी खालील बाबींची पूर्तता ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत करणे अनिवार्य आहे.
संचमान्यता आणि शालार्थ प्रणालीतील DDO Code शी संबंधित UDISE क्रमांक वेगवेगळे असल्यास ते एकसारखे करावेत. शालार्थ प्रणालीतून डिटॅच केलेल्या कर्मचाऱ्यांची योग्य माहिती नोंदवावी.
ज्या कर्मचाऱ्यांचे अद्याप एकदाही वेतन व भत्ते अदा करण्यात आलेले नाहीत, त्यांच्या सेवाविषयक बाबींची पडताळणी करून आवश्यकतेनुसार त्यांची नावे प्रणालीतून कमी करण्याची कार्यवाही करावी.
समायोजन झाल्यानंतरही संबंधित शाळेत रुजू न झालेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याची कार्यवाही करावी. तसेच डिजिटलायझेशन, जन्मदिनांक, रुजू दिनांक आणि इतर तांत्रिक कारणांमुळे सेवार्थ किंवा शालार्थ प्रणालीत निर्माण झालेल्या त्रुटी तातडीने दूर कराव्यात.
१ नोव्हेंबर २०२६ पासून वेतनाबाबत कडक नियम
१ नोव्हेंबर २०२६ पासून संचमान्यतेतील मंजूर पदांपेक्षा अधिक पदांवरील वेतन देयके कोणत्याही परिस्थितीत अदा करता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व प्रलंबित त्रुटींची पूर्तता निर्धारित मुदतीत करावी. अन्यथा नोव्हेंबर २०२६ पासून संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी : अतिरिक्त शिक्षकांसह त्रुटी असलेल्या कर्मचाऱ्यांचे शालार्थ प्रणाली द्वारे वेतन करणेबाबत – परिपत्रक डाउनलोड करा













