SCERT Navopkram Spardha 2026-27: राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२६-२७ चे आयोजन करणे बाबत परिपत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य (SCERT Pune) कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार आता राज्यातील शिक्षक, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांसाठी नाव नोंदणी सुरू झाली आहे. या लेखात नोंदणी लिंक व स्पर्धेची सविस्तर माहिती दिली आहे.
Table of Contents
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२६-२७ | SCERT Navopkram Spardha 2026
राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्तस्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020), बदललेला अभ्यासक्रम, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN), निपुण महाराष्ट्र, अध्ययन निष्पत्ती इत्यादी क्षेत्रातील विषयांवरील नवोपक्रम हाती घेणेबाबत तसेच या वर्षी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२६-२७ चे पुढील सात गटात आयोजन करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे.
- पूर्वप्राथमिक गट – (अंगणवाडी कार्यकर्ती / सेविका व पर्यवेक्षिका)
- प्राथमिक गट – पायाभूत स्तर
(प्राथमिक शिक्षक इ. १ ली व २ री) - प्राथमिक गट – पूर्वतयारी स्तर
(प्राथमिक शिक्षक आणि मुख्याध्यापक इ. ३ ते ५) - प्राथमिक गट – पूर्वमाध्यमिक स्तर
(प्राथमिक पदवीधर आणि मुख्याध्यापक इ. ६ ते ८) - माध्यमिक गट –
माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक
(इयत्ता ९ वी ते १२ वी) - विषय सहायक, विषय साधन व्यक्ती,
समावेशित शिक्षण साधन व्यक्ती व शिक्षकेतर कर्मचारी - अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी
(केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी तसेच
अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य)
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पहिल्या टप्प्यात वरील गट क्र. १ ते ५ साठी जिल्हा स्तरावर व गट क्र. ६ व ७ साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण (विभाग) स्तरावर घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, नगरपालिका, जिल्हा परिषद यांचेशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
स्पर्धेबाबत सोबत दिलेले माहितीपत्रक अवलोकन करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेविषयी अधिनस्त कार्यालयातील सर्व गटातील स्पर्धकांना अवगत करणे. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांनी आपल्या कार्यालयातील एका सक्षम अधिकाऱ्याकडे नोडल अधिकारी म्हणून या स्पर्धेची जबाबदारी देणे. तसेच सदर नोडल अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक यासह नवोपक्रम स्पर्धेची माहिती पोहोचविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास परिपत्रकात दिलेल्या ई-मेलवर काळविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
नवोपक्रम स्पर्धा कोणासाठी आहे?
प्रस्तुत स्पर्धा ही सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये मराठी माध्यमासह इतर सर्व माध्यमातील शिक्षक व अधिकारी यांचेसाठी आयोजित करण्यात येत आहे.
इतर माध्यमातील स्पर्धकांनी आपला नवोपक्रम अहवाल मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये सादर करण्याविषयी स्पर्धकांना अवगत करण्यात यावे.
त्यानुसार आपल्या अधिनस्त वरील नमूद सात गटात समाविष्ट अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांसह सर्व स्पर्धक नवोपक्रमशील घटकांना सोबतचे माहितीपत्रक निदर्शनास आणून द्यावे.
- संबंधित स्पर्धकांनी माहितीपत्रकाचे अवलोकन करावे.
- आपले नवोपक्रम नोंदविण्यासाठी माहितीपत्रकात दिलेल्या वेळापत्रकानुसार लिंक देण्यात येईल.
- दिलेल्या लिंकवर नवोपक्रम सादर करण्याविषयी सूचित करण्यात यावे.
- दिलेल्या मुदतीत संबंधितांनी आपले नवोपक्रम सादर करण्याबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२६-२७ संभाव्य वेळापत्रक आणि माहितीपत्रक
माहितीपत्रक
राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० हे शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक व नवोन्मेषी शिक्षण देण्यावर भर देते. या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास, कृतीशील शिक्षण, कौशल्याधिष्ठित शिक्षण, तंत्रज्ञानाचा शैक्षणिक उपयोग, शाळा व समाज यांच्यातील सशक्त नाते विकसित करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
यानुषंगाने शाळा व कार्यक्षेत्रांत राबविल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांना राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी प्रोत्साहन दिले जाते. यासाठी राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी यांनी या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेऊन शाळेत व कार्यक्षेत्रात राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करावे.
या राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरावरील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी सदर स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.
शैक्षणिक सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्याध्यापक, विषय साधन व्यक्ती, विषय सहायक, केंद्रप्रमुख व अधिकारी यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी गट
१. पूर्वप्राथमिक गट – (अंगणवाडी कार्यकर्ती / सेविका व पर्यवेक्षिका)
२. प्राथमिक गट – पायाभूत स्तर
(प्राथमिक शिक्षक इ. १ ली व २ री)
३. प्राथमिक गट – पूर्वतयारी स्तर
(प्राथमिक शिक्षक आणि मुख्याध्यापक इ. ३ ते ५)
४. प्राथमिक गट – पूर्वमाध्यमिक स्तर
(प्राथमिक पदवीधर आणि मुख्याध्यापक इ. ६ ते ८)
५. माध्यमिक गट –
माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक
(इयत्ता ९ वी ते १२ वी)
६. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती,
समावेशित साधन व्यक्ती व शिक्षकेतर कर्मचारी
७. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी
(केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी तसेच
अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य)
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे
१. पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी, शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी शिक्षक व अधिकारी यांना प्रोत्साहन देणे.
२. शिक्षक व अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाजात नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे.
३. पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर तसेच डी.एल.एड. विद्यालय ते प्रशासन यामध्ये शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेच्या दृष्टीने नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकारी यांना उत्तेजन देणे.
४. शिक्षक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांमधील सृजनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे.
पृष्ठ ४
५. शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासनाच्या माहितीसाठी ऑनलाईन प्रकाशित करणे.
नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे
नवोपक्रम अहवाल लेखन पुढील मुद्द्यांच्या आधारे करावे.
१) नवोपक्रमाचे शीर्षक – उपक्रमाचे शीर्षक नेमकेपणाने लिहावे.
२) नवोपक्रमाची गरज व महत्त्व –
- हा उपक्रम मी का करतो आहे?
- उपक्रमाचा फायदा कोणाला?
- कसा, कोणत्या स्वरूपात, कोणत्या कृतीमुळे होणार?
- उपक्रम निवडण्याचे कारण, गरज, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इ. तपशील.
३) नवोपक्रमाची उद्दिष्टे – या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार, याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.
४) नवोपक्रमाचे नियोजन –
१. उपक्रम पूर्वस्थितीचे निरीक्षण
२. संबंधित व्यक्तींशी, तज्ज्ञांशी चर्चा
३. आवश्यक साधनांचा विचार
४. करावयाच्या कृतींचा क्रम
५. उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण
६. कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक)
७. उपक्रमासाठी इतरांची मदत
८. उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे
५) नवोपक्रमाची कार्यपद्धती –
I. पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी
II. कार्यवाही दरम्यान केलेली निरीक्षणे व माहिती संकलन
III. उपक्रम पूर्ण झाल्यावर केलेली निरीक्षणे व त्यांच्या नोंदी
IV. कार्यवाही करताना आलेल्या अडचणी
V. माहितीचे विश्लेषण : आलेख, तक्ते (आवश्यक वाटल्यास)
६) नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार)
या उपक्रमातून काय साध्य झाले व शिक्षण क्षेत्रातील कोणत्या घटकाला या उपक्रमाचा लाभ झाला, याबाबतची मांडणी यात करावी.
उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुती स्पष्ट करावी.
७) समारोप – आपल्या उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी कसा झाला, हे स्पष्ट करावे.
८) संदर्भसूची व परिशिष्टे –
नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची सूची द्यावी तसेच सहभागी वर्गातील विद्यार्थी व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर चाचणी, प्रश्नावली इ. जे असेल ते परिशिष्टामध्ये जोडावे.
स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी
१. स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तसेच अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वीला अध्यापन करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इ. ६ वी ते ८ वी ला शिकवणारे शिक्षक प्राथमिक स्तर स्पर्धेसाठी गणले जातील.
२. राज्यातील ICDS विभागाच्या अधिनस्त अंगणवाडीतील कार्यकर्ती / सेविका व पर्यवेक्षिका या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतील.
३. डी.एल.एड. विद्यालयातील अध्यापकाचार्य व शिक्षणक्षेत्रातील पर्यवेक्षकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.
४. स्पर्धक सध्या SCERT / प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA) / DIET मध्ये विषय सहाय्यक / DIET अंतर्गत विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असावा.
५. सन २०२४-२५ पासून मराठी माध्यमासह इतर माध्यमातील शिक्षक व अधिकारी यांचेसाठी देखील सदर स्पर्धेत भाग घेऊ शकतील. मात्र इतर माध्यमातील स्पर्धकांनी आपला नवोपक्रम अहवाल मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये सादर करावा.
स्पर्धेचे नियम
नवोपक्रम स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे :
१. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येईल.
२. स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा. त्यासाठी स्पर्धकाने स्वघोषित प्रमाणपत्र सादर करावे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत दिला आहे.)
३. नवोपक्रम स्पर्धकाने स्वतः राबविलेला असावा. याबाबतीत स्पर्धकाने नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवालासमवेत विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.
४. सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना / मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतीसंशोधन अहवाल व लघुसंशोधन अहवाल पाठवू नयेत.
५. नवोपक्रम अहवाल मराठी किंवा इंग्रजी यांपैकी कोणत्याही एका भाषेत टंकलिखित केलेला असावा.
६. नवोपक्रम टाईप केलेला असावा.
टायपिंगसाठी Unicode या फॉन्टचाच वापर करावा. फॉन्ट साईझ १२, पेज मार्जिन डावी बाजू १.५ इंच व उजवी बाजू तसेच वरची व खालची बाजू प्रत्येकी १ इंच मार्जिन / समास असावा.
७. हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
८. सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन २०२५-२६ किंवा २०२६-२७ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेला असावा.
९. नवोपक्रम अहवाल शब्दमर्यादा ४००० ते ५००० असावी. फाईलमध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त ६ फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा.
१०. स्पर्धकाने आपल्या नवोपक्रमाशी निगडीत इतरांना उपयुक्त होईल असा व्हिडिओ अथवा YouTube वर असलेली लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या लिंकवर विहित ठिकाणी नोंदवावी.
११. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२६-२७ साठी स्पर्धकांनी आपले नवोपक्रम दिलेल्या लिंकवर विहित वेळेत अपलोड करावेत.
१२. जिल्हास्तर, विभाग स्तरावर प्रथम ७ व राज्यस्तरावर प्रथम १० क्रमांकांच्या स्पर्धकांना आपापल्या नवोपक्रमाचे प्रत्यक्ष (ऑफलाईन) सादरीकरण करणे बंधनकारक असेल.
१३. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गुणानुक्रम पारितोषिके व उत्तेजनार्थ पारितोषिक पात्र स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रम अहवालाची एक प्रत संशोधन विभागाकडे कार्यक्रमाच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील.
नवोपक्रम अहवालाचे मूल्यांकन
नवोपक्रम स्पर्धेचे मूल्यांकन प्रत्येक स्तरावर दोन फेरीमध्ये केले जाणार आहे.
जिल्हा व विभाग स्तरावर द्वितीय फेरी ही पहिल्या फेरीत गुणानुक्रमे पहिल्या १ ते ७ क्रमांकासाठी तर राज्यस्तरावर पहिल्या फेरीतील गुणानुक्रमे पहिल्या १ ते १० क्रमांकासाठी राबविण्यात येईल.

जिल्हास्तर व प्रादेशिक विद्या प्राधिकरण स्तरावर प्रथम फेरीत नवोपक्रम अहवालांचे मूल्यांकन करून प्रथम १ ते ७ क्रमांकावर असलेल्या नवोपक्रमांचे सादरीकरण कार्यालयात करून द्वितीय फेरीत मूल्यांकन करण्यात येईल.
द्वितीय फेरीतील गुणांच्या आधारावरच जिल्हा व विभाग प्रथम पाच क्रमांक निर्धारित करण्यात येऊन तेच पुढे राज्यस्तरावर पाठविण्यात येतील.
(टीप : मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी या स्पर्धेचे सातही गटाचे मूल्यांकन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई या स्तरावर करण्यात येईल.)
नवोपक्रम अहवालाचे जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर मूल्यांकन पुढील निकषांच्या आधारावर करण्यात येईल. स्पर्धेचा निकाल सर्वस्वी परीक्षकांवर अवलंबून राहील.

राज्यस्तरावर वरीलप्रमाणेच नवोपक्रम अहवालावरून प्रथम फेरीतील गुणांच्या आधारे प्रत्येक गटातील १० उत्कृष्ट नवोपक्रम काढण्यात येतील. त्या स्पर्धकांना नवोपक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी बोलविण्यात येईल. द्वितीय फेरीतील गुणांच्या आधारे पाच गुणानुक्रम व पुढील पाच उत्तेजनार्थ क्रमांक निश्चित करण्यात येतील.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची कार्यवाही
पहिला टप्पा
अ) जिल्हास्तरावरील पुरस्कार –
पूर्वप्राथमिक गट, प्राथमिक गट, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांना ७५% पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत त्यांचे नवोपक्रम पुढे SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले जातील.
त्यामुळे केवळ उत्कृष्ट नवोपक्रम राज्यस्तरावर येण्यासाठी उपयोग होईल. तसेच प्रथम पाच क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
आ) विभागस्तरावरील पुरस्कार –
विषय सहायक व विषय साधन व्यक्ती तसेच अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी यांचे नवोपक्रम प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या लिंकवर जातील व त्यामधून प्रत्येक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांना ७५% पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहेत त्यांचे नवोपक्रम पुढे SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले जातील. तसेच प्रथम पाच क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
(टीप : मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी या स्पर्धेचे पाचही गटाचे मूल्यांकन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई या स्तरावर करण्यात येईल.)
दुसरा टप्पा
राज्यस्तरावरील पुरस्कार – नवोपक्रम अहवाल लेखन व नवोपक्रम सादरीकरण या आधारित पुढील सात गटातील पारितोषिकांचे वितरण केले जाईल.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा संभाव्य वेळापत्रक | SCERT Navopkram Spardha Time Table 2026-27
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२६-२७ : संभाव्य वेळापत्रक
- ३० ऑक्टोबर २०२६ – जिल्हा समन्वयकांची मार्गदर्शन बैठक (ऑनलाईन)
- ०२ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ – नवोपक्रम नोंदणी (ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करणे)
- २३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ – छाननी (पात्र / अपात्र) (ऑनलाईन)
टप्पा क्र. १
जिल्हास्तर (गट १ ते ५)
- ०७ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२६ – पहिली फेरी : ऑनलाईन अहवाल परीक्षण
- २१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ – दुसरी फेरी : ऑफलाईन नवोपक्रम सादरीकरण
विभागस्तर (गट ६ व ७)
- ०७ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२६ – पहिली फेरी : ऑनलाईन अहवाल परीक्षण
- २१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ – दुसरी फेरी : ऑफलाईन नवोपक्रम सादरीकरण
टप्पा क्र. २
राज्यस्तर (गट १ ते ७)
- ०१ जानेवारी ते १५ जानेवारी २०२७ – पहिली फेरी : ऑनलाईन अहवाल परीक्षण
- १८ जानेवारी ते २२ जानेवारी २०२७ – दुसरी फेरी : ऑफलाईन नवोपक्रम सादरीकरण

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2026-27 : ऑनलाइन नावनोंदणी सुरू | SCERT Innovation Competition Registration
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने सन २०२६-२७ साठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक, अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका तसेच इतर पात्र घटकांसाठी ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या स्पर्धेबाबतचे संपूर्ण नियोजन आणि माहितीपत्रक यापूर्वीच दिनांक २९ जुलै २०२६ रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आले होते. आता स्पर्धेसाठी नवोपक्रमांची नोंदणी करण्याकरिता स्वतंत्र Google Form लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त पात्र शिक्षक व अधिकारी यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी नावनोंदणीचे वेळापत्रक
स्पर्धकांना आपले नवोपक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यासाठी दिनांक २ नोव्हेंबर २०२६ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संधी देण्यात आली आहे. या निर्धारित कालावधीतच दिलेल्या Google Form लिंकवरून अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, ई-मेल, WhatsApp किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पाठविण्यात आलेले नवोपक्रम स्पर्धेसाठी स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे इच्छुक स्पर्धकांनी अधिकृत Google Form द्वारेच आपली नावनोंदणी पूर्ण करावी.
ऑनलाइन अर्जामध्ये कोणती माहिती भरावी लागेल?
ऑनलाइन अर्ज भरताना स्पर्धकांना स्वतःचे पूर्ण नाव, शाळा किंवा कार्यालयाचे पूर्ण नाव, शाळेचा UDISE क्रमांक, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक अशी माहिती द्यावी लागेल. शाळेव्यतिरिक्त इतर कार्यालयांतील स्पर्धकांनी UDISE क्रमांकाच्या रकान्यात 0 नमूद करायचे आहे.
याशिवाय नवोपक्रम स्पर्धेचा गट निवडणे आणि नवोपक्रमाचे शीर्षक नमूद करणे आवश्यक आहे. स्पर्धा एकूण सात गटांमध्ये आयोजित करण्यात येत असून, स्पर्धकांनी यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकातील निकषांनुसार आपल्या पात्रतेप्रमाणे गट निवडावा.
अर्जासोबत कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतील?
नावनोंदणी करताना स्पर्धकांना नवोपक्रमाचा अहवाल PDF स्वरूपात अपलोड करावा लागेल. त्यासोबत स्पर्धकाचे प्रतिज्ञापत्र आणि कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्रही PDF स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.
| आवश्यक कागदपत्र | फाइल स्वरूप |
|---|---|
| नवोपक्रम अहवाल | |
| स्पर्धकाचे प्रतिज्ञापत्र | |
| कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्र |
आपल्या नवोपक्रमासंबंधी व्हिडिओ उपलब्ध असल्यास त्याची YouTube लिंक अर्जामध्ये देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2026-27: ऑनलाइन नावनोंदणी लिंक
इच्छुक व पात्र स्पर्धकांनी खालील Google Form लिंकवर जाऊन निर्धारित मुदतीत आपली नावनोंदणी करावी.
नावनोंदणी कालावधी : २ नोव्हेंबर २०२६ ते २० नोव्हेंबर २०२६
ऑनलाइन अर्ज लिंक : https://forms.gle/UK6NDHUqCJNVvsUA9
अर्ज भरण्यापूर्वी स्पर्धेबाबत यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेले माहितीपत्रक व त्यातील गटनिहाय पात्रतेचे निकष तपासून घेणे आवश्यक आहे. तसेच अहवाल, प्रतिज्ञापत्र आणि कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्र PDF स्वरूपात तयार ठेवावे. अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज पूर्ण करून सादर करावा.
राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक, अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांनी आपल्या कार्यक्षेत्रात राबविलेल्या उपक्रमांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या स्पर्धेत सहभागी होण्याची ही संधी आहे.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२६-२७ माहिती पुस्तिका व वेळापत्रक PDF डाउनलोड
- राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२६-२७ साठी नावनोंदणी करणे बाबत दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजीचे परिपत्रक
- राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२६-२७ माहिती पत्रक डाउनलोड करा
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT Pune) द्वारे आयोजित यापूर्वीचे नवोपक्रम स्पर्धा गटनिहाय अहवाल पीडीएफ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर डाउनलोड करू शकता.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ मधील नवोपक्रम अहवाल PDF Download Click Here
अधिकृत वेबसाईट : https://www.maa.ac.in/











