YCMOU Home Assignment 2026-27: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन गृहपाठ (Online Home Assignment) सादर करण्याबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. डिसेंबर २०२६ आणि जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या हिवाळी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हस्तलिखित गृहपाठ ऑनलाइन पद्धतीने अपलोड करावे लागणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना १५ डिसेंबर २०२६ ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.
YCMOU Home Assignment Online Submission Schedule 2026-27
विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार जानेवारी २०२६ आणि जुलै २०२६ या दोन्ही सत्रांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ ऑनलाइन सादर करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. मात्र, सर्वच अभ्यासक्रमांसाठी ही पद्धत लागू नसून विद्यापीठाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या यादीतील अभ्यासक्रमांचेच गृहपाठ ऑनलाइन अपलोड करावे लागणार आहेत.
विद्यार्थ्यांनी १५ डिसेंबर २०२६ पर्यंत आपले गृहपाठ पोर्टलवर अपलोड करायचे आहेत. त्यानंतर अभ्यासकेंद्रांना १८ डिसेंबर २०२६ पर्यंत अपलोड केलेल्या गृहपाठांची प्राथमिक पडताळणी पूर्ण करावी लागेल. समंत्रकांनी २८ डिसेंबर २०२६ पर्यंत गृहपाठ तपासणी आणि गुणांकनाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
गृहपाठ सादर करण्याच्या महत्त्वाच्या तारखा
| कामकाज | अंतिम तारीख |
|---|---|
| विद्यार्थ्यांनी गृहपाठ अपलोड करणे | १५ डिसेंबर २०२६ |
| अभ्यासकेंद्राकडून पडताळणी | १८ डिसेंबर २०२६ |
| समंत्रकांकडून तपासणी | २८ डिसेंबर २०२६ |
कोणत्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन गृहपाठ सादर करावे लागतील?

जानेवारी २०२६ सत्रातील प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या नियमित आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या सत्रांनुसार ऑनलाइन गृहपाठ सादर करावे लागतील. तसेच G01, G02, G12, G15, M86, M87, M88 आणि M90 या वार्षिक अभ्यासक्रमांच्या जानेवारी २०२६ सत्रात प्रवेश घेतलेल्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन गृहपाठ अपलोड करावे लागतील.
जुलै २०२६ सत्रात प्रवेश घेतलेल्या पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाही लागू असलेल्या सत्रांनुसार ऑनलाइन गृहपाठ सादर करावे लागतील. NEP 2020 अंतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सर्व सत्रांतील नियमित आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठीही ऑनलाइन गृहपाठ पद्धत लागू करण्यात आली आहे. वार्षिक अभ्यासक्रमांतील M88 आणि M90 या अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन गृहपाठ सादर करावे लागतील.
जुलै २०२६ मध्ये वार्षिक अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मे २०२७ च्या परीक्षेसाठी ऑनलाइन गृहपाठ सादर करावे लागतील. यासंदर्भातील सविस्तर सूचना विद्यापीठाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.
YCMOU Home Assignment Online Submission Student Login Step by Step Guide
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील पात्र अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना Home Assignment ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना या पोर्टलवर १६ अंकी PRN क्रमांकाच्या आधारे नोंदणी करून लॉगिन करावे लागेल आणि विषयानुसार हस्तलिखित गृहपाठाची PDF अपलोड करावी लागेल.
खालील स्टेप मध्ये विद्यार्थी लॉगिनपासून गृहपाठ अपलोड करणे आणि त्याची स्थिती तपासण्यापर्यंतची प्रक्रिया क्रमाने दिली आहे.
1. Student Login करण्याची प्रक्रिया
Step 1 – सर्वप्रथम मोबाईल किंवा कॉम्प्युटरमधील ब्राउझरमध्ये YCMOU Home Assignment Portal (https://asm.ycmou.org.in/) या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
तिथे Login Portals मध्ये Student Login (Submit and track your home assignments) यावर क्लीक करा

Step 2 – जर तुम्ही पहिल्यांदाच या पोर्टलचा वापर करत असाल, तर Register या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा १६ अंकी PRN क्रमांक टाकून Verify करा. (No, I am a new user Register with your PRN and an OTP) नोंदणीसाठी विद्यापीठाच्या प्रवेश नोंदीमध्ये असलेला मोबाइल क्रमांक किंवा ई-मेल आयडी वापरून OTP पडताळणी पूर्ण करा.
आधीच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी PRN क्रमांक आणि नवीन पासवर्ड वापरून थेट Sign In करावे. (Yes, I have registeredSign in with your PRN and password)

Step 3 – Password तयार करा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर डीफॉल्ट पासवर्ड बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. विद्यापीठाच्या Student User Manual नुसार सुरुवातीचा पासवर्ड जन्मतारीख DDMMYYYY या स्वरूपात असतो. उदाहरणार्थ, जन्मतारीख 01 जून 1990 असल्यास पासवर्ड 01061990 असा असेल. त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड तयार करून सुरक्षित ठेवा.
2. लॉगिननंतर गृहपाठ अपलोड करण्याची प्रक्रिया
Step 4 – लॉगिननंतर विद्यार्थ्याचे नाव, PRN क्रमांक, अभ्यासक्रम, अभ्यासकेंद्र आणि इतर तपशील स्क्रीनवर दिसतील. ही माहिती काळजीपूर्वक तपासा. ABC ID तयार केलेला असल्यास तो नमूद करा. माहिती योग्य असल्याची खात्री करून पुढील प्रक्रिया सुरू करा.
Step 5 – लॉगिन केल्यानंतर स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या My Assignments या पर्यायावर क्लिक करा. येथे तुमच्या अभ्यासक्रमातील विषयांची यादी, Paper Code, विषयाचे नाव आणि Assignment Status दिसेल.

Step 6 – प्रश्नपत्रिका आणि Answer Booklet डाउनलोड करा
प्रत्येक विषयासमोरील Download पर्यायावर क्लिक करून संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका आणि कोरी Answer Booklet डाउनलोड करा. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पुस्तिका डाउनलोड करणे आवश्यक आहे. या पुस्तिकेवर विद्यार्थ्याचा PRN क्रमांक, विषय कोड आणि बारकोड/QR कोड असतो.
Step 7 – हस्तलिखित गृहपाठ तयार करा
डाउनलोड केलेल्या पुस्तिकेतील बारकोड असलेल्या पानांवर स्वतःच्या हस्ताक्षरात प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतंत्र पानावर लिहावे. उत्तरे मुद्देसूद आणि वाचनीय असावीत. टाईप केलेली किंवा प्रिंट केलेली उत्तरे स्वीकारली जाणार नाहीत.
Step 8 – गृहपाठाची PDF तयार करा
गृहपाठ पूर्ण झाल्यानंतर सर्व पाने योग्य क्रमाने स्कॅन करून एका विषयाची एक PDF तयार करा. पाने स्पष्ट, सरळ आणि वाचनीय असावीत. PDF फाईलचा आकार जास्तीत जास्त २० MB असावा.
Step 9 – गृहपाठ Upload करा
My Assignments मध्ये संबंधित विषयासमोरील Submit Now पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Choose PDF File या पर्यायातून तयार केलेली PDF निवडा आणि Upload & Preview वर क्लिक करा. अपलोड झालेली PDF एकदा उघडून तपासा. योग्य विषयाचा गृहपाठ योग्य विषयासमोर अपलोड झाला आहे याची खात्री करा.
Step 10 – Confirm & Submit Assignment करा
PDF अपलोड केल्यानंतर स्क्रीनच्या खाली दिसणाऱ्या Confirm & Submit Assignment या बटणावर क्लिक करणे अनिवार्य आहे. केवळ PDF अपलोड करून ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. या बटणावर क्लिक केल्यानंतरच गृहपाठ अंतिमरीत्या सबमिट होतो.
3. गृहपाठ सबमिट झाला की नाही हे कसे तपासाल?
विद्यार्थ्यांनी पुन्हा My Assignments मध्ये जाऊन प्रत्येक विषयासमोरील Status तपासावा.
| Status | अर्थ |
|---|---|
| Submit | गृहपाठ अद्याप सबमिट केलेला नाही |
| Uploaded | गृहपाठ यशस्वीपणे अपलोड झाला आहे |
| Verified | अभ्यासकेंद्राने पडताळणी केली आहे |
| Valued | समंत्रकाने गृहपाठ तपासून गुणांकन केले आहे |
| Rejected | गृहपाठ नाकारण्यात आला आहे |
गृहपाठ Rejected झाल्यास संबंधित Status वर क्लिक करून नाकारण्याचे कारण तपासावे आणि आवश्यक दुरुस्ती करून निर्धारित मुदतीत पुन्हा अपलोड करावा.
गृहपाठ लिहिताना आणि PDF तयार करताना घ्यायची काळजी
विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतंत्र पानावर लिहावे. उत्तरे मुद्देसूद आणि कमीत कमी शब्दांत असावीत. दोन्ही गृहपाठ जास्तीत जास्त चार ते पाच पानांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रश्नांची उत्तरे दिलेल्या क्रमाने लिहावीत आणि एका पानावर शक्यतो एकाच प्रश्नाचे उत्तर पूर्ण करावे.
गृहपाठ पूर्ण झाल्यानंतर त्याची स्पष्ट आणि वाचनीय PDF तयार करावी. पानांचा क्रम योग्य असावा. स्कॅन केलेली पाने तिरकी, अस्पष्ट किंवा एकमेकांवर आच्छादित नसावीत. प्रत्येक पानाची फाईल साइज किमान ३ MB आणि संपूर्ण PDF फाईलची साइज जास्तीत जास्त २० MB असावी.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे गृहपाठ लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःच्या लॉगिनमध्ये उपलब्ध असलेल्या बारकोड असलेल्या पानांचाच वापर करावा. इतर कोणत्याही पानांवर गृहपाठ लिहिल्यास त्याचे मूल्यमापन केले जाणार नाही. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र PDF तयार करून ती संबंधित विषयासमोरच अपलोड करणे आवश्यक आहे.
गृहपाठ Reject झाल्यास काय करावे?
विद्यार्थ्यांनी गृहपाठ अपलोड केल्यानंतर लॉगिनमध्ये ‘Uploaded’ असा संदेश दिसत असल्याची खात्री करावी. त्यानंतर अभ्यासकेंद्रामार्फत गृहपाठाची प्राथमिक पडताळणी केली जाईल. योग्य पद्धतीने अपलोड केलेले गृहपाठ मंजूर (Approved) झाल्यानंतर संबंधित समंत्रकांकडून त्यांची तपासणी आणि गुणांकन केले जाईल.
अस्पष्ट स्कॅनिंग, चुकीच्या विषयासमोर अपलोड केलेला गृहपाठ, तिरकी किंवा कोरी पाने अशा त्रुटी आढळल्यास गृहपाठ Reject केला जाऊ शकतो. अशा वेळी विद्यार्थ्यांना तो पुन्हा अपलोड करण्याची (Resubmission) संधी मिळेल. मात्र, पुनर्सादरीकरणही निर्धारित कालावधीतच पूर्ण करावे लागेल.
विद्यार्थ्यांनी नियमितपणे पोर्टलवरील प्रोफाइल आणि ई-मेल तपासणे आवश्यक आहे. गृहपाठ अपलोड न केल्यास किंवा Reject झालेला गृहपाठ निर्धारित मुदतीत पुन्हा सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या रकान्यात Absent (AB) नोंद होऊ शकते.
अधिकृत लिंक आणि मदत क्रमांक
| सुविधा | लिंक |
|---|---|
| YCMOU Official Website | https://ycmou.digitaluniversity.ac/ |
| YCMOU Home Assignment Portal | asm.ycmou.org.in |
| YCMOU Home Assignment Circuler | Click Here |
| Student User Manual | User Guide PDF |
विद्यापीठाच्या ऑनलाइन गृहपाठ पोर्टलवरील Notification विभागात ‘List of Courses enabled for submission of Assignments Online‘ या नावाने ऑनलाइन गृहपाठासाठी पात्र अभ्यासक्रमांची यादी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम या यादीत आहे की नाही, हे तपासूनच गृहपाठ अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू करावी.
ज्या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन गृहपाठाची सुविधा लागू नाही, त्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या पूर्वीच्या प्रचलित पद्धतीनुसार गृहपाठ सादर करावेत. तसेच बंद झालेल्या अभ्यासक्रमांमध्ये पुढील वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांनुसार गृहपाठ लिहून पूर्वीच्या पद्धतीने अभ्यासकेंद्रावर जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तांत्रिक अडचणी किंवा अधिक माहितीसाठी विद्यार्थी 8071188789, 8007253044 आणि 8055253072 या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. तसेच oasishelpdesk22@gmail.com या ई-मेलवर शंका विचारता येतील.
विद्यार्थ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता आपला अभ्यासक्रम, PRN नोंदणी आणि गृहपाठ अपलोड करण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. गृहपाठ अपलोड केल्यानंतर त्याची स्थिती तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा गृहपाठाचे गुण नोंदवले न गेल्याने विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होऊ शकतो.


Related
YCMOU दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा; ऑनलाइन अर्जासाठी 7 कागदपत्रे आवश्यक















