School Student Eye Checkup Free Spectacles : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य आणि त्यांच्या दृष्टीशी संबंधित समस्या वेळेत ओळखण्यासाठी शासनाने महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. शासकीय शाळांमधील 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी (Eye Screening) करण्यात येणार असून, तपासणीत दृष्टीदोष (Low Vision) आढळलेल्या पात्र व गरजू विद्यार्थ्यांना मोफत नंबरचे चष्मे (Free Spectacles) उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
Table of Contents
त्रिपक्षीय सामंजस्य करार

या उपक्रमासाठी शालेय शिक्षण विभाग, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राजीव मेहता तसेच वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशनचे संचालक वेणू अंबाती यांच्यासह संबंधित अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
20 लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी
या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या तब्बल 20 लाख विद्यार्थ्यांची डोळ्यांची तपासणी (Eye Check-up) करण्याचे नियोजन आहे.
विद्यार्थ्यांना दृष्टीदोष, डोळ्यांशी संबंधित तक्रारी किंवा दृष्टी कमी होण्यासारख्या समस्या असल्यास त्यांचे वेळेत निदान होण्यास या तपासणीमुळे मदत होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहे.
कोणत्या संस्थेची काय जबाबदारी?
या उपक्रमासाठी तीनही संस्थांची भूमिका निश्चित करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभाग प्रकल्पाची अंमलबजावणी आणि समन्वय (Implementation & Coordination) करणार आहे.
रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रकल्पाचा अंमलबजावणी भागीदार (Implementation Partner) म्हणून काम करणार आहे. तर वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन तांत्रिक भागीदार (Technical Partner) म्हणून या उपक्रमात सहभागी होणार आहे.
तपासणीमध्ये दृष्टीदोष आढळलेल्या पात्र विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार मोफत चष्मे (Free Spectacles) उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही संबंधित संस्थेकडून पार पाडली जाणार आहे.
36 महिन्यांचा प्रकल्प
या सामंजस्य कराराचा कालावधी 36 महिने निश्चित करण्यात आला आहे. या काळात राज्यातील विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी शिबिरे (Eye Screening Camps) आयोजित केली जाणार आहेत.
प्रकल्पाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे की नाही, याचे नियमित परीक्षण (Monitoring) केले जाणार आहे. त्यासाठी त्रैमासिक प्रगती अहवाल (Quarterly Progress Report) तयार करण्यात येईल.
या अहवालामध्ये आयोजित केलेल्या डोळे तपासणी शिबिरांची संख्या, तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या, लाभार्थी विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या चष्म्यांची संख्या आणि प्रकल्पाशी संबंधित इतर बाबींचा आढावा घेतला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या माहितीची गोपनीयताही महत्त्वाची
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित माहितीचे संकलन वैज्ञानिक पद्धतीने केले जाणार आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे.
करारामध्ये डेटा संरक्षण (Data Protection) आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता (Data Privacy) राखण्यासाठी आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत.
यापूर्वीही लाखो विद्यार्थ्यांची तपासणी
या उपक्रमाची सुरुवात यापूर्वी 2019 पासून करण्यात आली होती. आतापर्यंत राज्यातील 18 जिल्ह्यांमधील सुमारे 800 शाळांमध्ये 6 लाख 80 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली आहे.
या तपासणीनंतर दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना 63 हजारांहून अधिक चष्मे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आता या अनुभवाच्या आधारे हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीलाही फायदा
डोळ्यांची दृष्टी कमी असणे किंवा दृष्टीदोषाची समस्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासावर परिणाम करू शकते. अनेक वेळा विद्यार्थ्यांना स्वतःला दृष्टीशी संबंधित समस्या असल्याची जाणीवही नसते.
अशा विद्यार्थ्यांची शाळेच्या माध्यमातून तपासणी झाल्यास समस्या लवकर लक्षात येण्यास मदत होईल. आवश्यक विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळाल्यामुळे त्यांना वर्गातील फळा, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य स्पष्टपणे पाहणे सोपे होऊ शकते.
त्यामुळे या उपक्रमातून केवळ डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीलाही (Academic Performance) अप्रत्यक्षपणे मदत होण्याची अपेक्षा आहे.
चष्मा लागण्याची लक्षणे – पूर्वतपासणी

डोळ्यासंबंधी काही समस्या असेल तर आपण डोळ्याची तपासणी करून जर आपली दृष्टी कमी झाली असेल, त्यानुसार आपल्याला चष्मा देऊन त्यावर मात करता येते. चष्मा लागण्याची लक्षणे (नेत्रदोष पूर्वतपासणी) खालील लक्षणावरून आपण प्राथमिक तपासणी करू शकतो. त्यानंतर योग्य नेत्रचीकीत्सक डॉक्टरांना आपण वेळीच दाखवून घ्यायला हवे.
- काही दिवसांपेक्षा अधिक काळ डोळ्यांच्या कडा लाल असणे, कठीण कवचासारखे वा सुजलेले डोळे
- डोळे जळजळ करणे
- सतत डोळ्यातून पाणी येणे
- पुन्हा पुन्हा येणारी रांजणवाडी
- डोळे (बुबुळे) सरळ एका रेषेत नसणे (तिरके दिसणे, दोन्ही डोळे एकाच ठिकाणी केंद्रित न होणे
- डोळ्यातील तिरळेपणा
- बुबुळात पांढरा अथवा करडा रंग असणे
- खाली ओघळणारी / पडणारी पापणी
- प्रकाशास नेहमीच संवेदनशील असणारे डोळे
- तिरळेपणा, डोळे चोळणे, एक डोळा बंद करणे
- एक किंवा दोन्ही डोळे आत किंवा बाहेर वळलेले असणे.
- डोळे सामान्यपणे जसे दिसतात, तसे न दिसणे
- नेहमी डोळे दुखणे, डोळ्यांना खाज येणे
- वाचन करताना पुस्तक डोळ्याजवळ घेऊन वाचन करणे
- अस्पष्टता दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न करणे
- सतत वरचेवर डोळे चोळणे
- दृक् कार्य करताना एक डोळा बंद करणे अथवा झाकून घेणे
- काहीतरी पाहताना मस्तक तिरके झुकवणे वा वळवणे
- नीट दिसण्यासाठी पुढे झुकणे
- डोळ्यांची अती जास्त उघडझाप करणे
- प्रकाशाप्रती अनावश्यक संवेदनशीलता
- अधिक काळ दृष्टीच्या जवळ धरून करावयाच्या कामांमुळे येणारा चिडचिडेपणा
- वस्तूंवर आदळणे वा अडखळणे
- कुठेही सहजगत्या न जाता येणे
- फलकावरील अक्षरे वाचण्यात अडथळा येणे
- वाचताना ओळीचा निदर्शक म्हणून ओळीखाली बोट ठेवणे
- सततची डोकेदुखी
- दोन भुवया जवळ स्ट्रेस निर्माण होणे
- डोळ्यामध्ये मांस येणे
- लिहिताना वाचताना किंवा मोबाईलवर संगणकावर काम करताना डोळे दुखणे
महत्वाची टीप: वरील लक्षणे ही सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. आपण नेत्रचिकित्सक (ophthalmologist) डॉक्टरांकडे जाऊनच आपल्या डोळ्यांची तपासणी करून खात्री करावी. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी मोहीम सुरू होत असून, याचा लाभ तुम्ही घेऊ शकता आणि पात्र विद्यार्थ्यांना मोफत नंबरचे चष्मे देखील दिले जाणार आहे.
Related Post : RPWD Act 2016 कायदा काय आहे? दिव्यांग 21 प्रकार आणि कायद्यातील तरतुदी












