Shaley Swachhata Mohim 2026: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘चला शाळेत जाऊ या… विशेष शालेय स्वच्छता मोहीम’ राबविण्याबाबत १६ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे. दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीचा सकारात्मक उपयोग करून शाळांचा परिसर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनासाठी पोषक बनविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
Table of Contents
विशेष शालेय स्वच्छता मोहिमेची उद्दिष्टे
- शाळांमध्ये गुणवत्ता, संस्कार व स्वच्छता यांचा समन्वय साधणे.
- शाळा व शाळा परिसराची संपूर्ण स्वच्छता/सफाई (Deep Cleaning) करून स्वच्छ, सुंदर व सुरक्षित वातावरण निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण करणे.
- शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी संघ व स्थानिक समुदायाचा शाळेच्या विकासामध्ये सहभाग वाढविणे व याद्वारे शाळा व समाज यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे.
- शाळेचे वातावरण आनंददायी, सर्जनशील व अध्ययन-अध्यापनास पोषक बनविणे.
शालेय स्वच्छता मोहिम वेळापत्रक व करावयाच्या कामाची यादी
शालेय स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी खालील दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे.
टप्पा १ :- दि. १८ ते २४ ऑक्टोबर २०२६
नियोजन व पूर्वतयारी :- या कालावधीत प्रत्येक शाळेने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहे.
- शाळा व्यवस्थापन समितीची विशेष बैठक आयोजित करणे.
- शिक्षक, पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी संघ यांच्या सहभागाचे नियोजन करणे.
- वर्गखोल्या, कार्यालय, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, क्रीडांगण इत्यादींची पाहणी करणे.
- शाळेतील आवश्यक स्वच्छता, दुरुस्ती व सुशोभीकरणाच्या कामांची यादी तयार करणे.
- अनावश्यक व निरुपयोगी साहित्य/भंगार यांचे वर्गीकरण करणे.
- आवश्यक किरकोळ दुरुस्तीची कामे निश्चित करणे.
- शाळानिहाय कृती आराखडा (Action Plan) तयार करणे.
टप्पा २ : दि. २५ ते ३१ ऑक्टोबर २०२६
प्रत्यक्ष कार्यवाही :- या कालावधीत पुढील कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना
शाळेची संपूर्ण स्वच्छता/सखोल साफसफाई (Deep Cleaning) :- वर्गखोल्या, कार्यालय, प्रयोगशाळा, ग्रंथालय व संगणक कक्षांची सखोल साफसफाई व स्वच्छता.
- फरशी, भिंती, दरवाजे, खिडक्या, छत, पंखे व इतर परिसराची स्वच्छता.
- शाळेतील स्वच्छतागृहे व हात धुण्याच्या ठिकाणांची विशेष स्वच्छता.
- पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व पाणीपुरवठा व्यवस्थेची स्वच्छता.
- शाळेचा परिसर, क्रीडांगण, प्रवेशद्वार व परिसरातील कचरा/अनावश्यक वस्तू हटविणे.
- आवश्यकतेनुसार डास, कीटक व इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण करणाऱ्या बाबी दूर करण्यासाठी उपाययोजना करणे.
- कचरा वर्गीकरणासाठी योग्य व्यवस्था.
किरकोळ दुरुस्ती व देखभाल :- शाळेतील विद्युत, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, फर्निचर, दरवाजे-खिडक्या इत्यादींची पाहणी करून आवश्यक किरकोळ दुरुस्ती व देखभाल करण्यात यावी.
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक विद्युत जोडणी, तुटलेले फर्निचर, असुरक्षित भाग इत्यादी बाबी तातडीने दुरुस्त करण्यात याव्यात.
अनावश्यक साहित्य व भंगार
शाळांमधील अनुपयुक्त/निरुपयोगी साहित्याचे निर्लेखन करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या दि. १७.०९.२०२६ रोजीच्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार, शाळेतील निरुपयोगी/अनावश्यक साहित्याचे वर्गीकरण करून विहित कार्यपद्धतीनुसार विल्हेवाट लावावी.
विशेष शालेय स्वच्छता निधीची उपलब्धता – सूचना
राज्यातील शाळांमध्ये “विशेष शालेय स्वच्छता मोहीम” (Shaley Swachhata Mohim) अंतर्गत करण्यात येणाऱ्या सखोल साफसफाई व स्वच्छता (Deep Cleaning), किरकोळ देखभाल व दुरुस्ती तसेच इतर अनुज्ञेय बाबींवरील खर्च शाळांना केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शाळेच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी दिले जाणारे एकत्रित अनुदानातून (Composite School Grant) भागविता येईल.
या मोहिमेसाठी स्वतंत्र अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही.
समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शाळेच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी दिले जाणारे एकत्रित अनुदानातून (Composite School Grant) खर्च करताना संबंधित बाब त्या अनुदानाच्या प्रचलित अनुज्ञेय बाबींमध्ये समाविष्ट आहे, याची संबंधित मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने खात्री करावी.
विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाची अनिवार्य आर्थिक वर्गणी अथवा निधी गोळा करण्यात येऊ नये.
शालेय स्वच्छता मोहीम लोकसहभाग
सदर मोहिमेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी संघ, ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, उपलब्ध असल्यास CSR/स्थानिक सामाजिक संस्था या घटकांचा “माझी शाळा-माझी जबाबदारी” या भावनेतून सक्रिय लोकसहभाग सुनिश्चित करावा.
संनियंत्रण व जबाबदारी
(१) या मोहिमेच्या शाळास्तरीय अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील.
(२) केंद्रप्रमुख यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांना मार्गदर्शन करून मोहीम अंमलबजावणीचा आढावा घ्यावा.
(३) गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील मोहिमेचे नियोजन, समन्वय व संनियंत्रण करावे.
(४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी जिल्हास्तरावर मोहिमेचा नियमित आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांची नोंद ठेवावी.
(५) विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी विभागातील मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन करावे.
(६) प्रत्येक शाळेने मोहीम सुरू करण्यापूर्वी व मोहीम पूर्ण झाल्यानंतरची छायाचित्रे जतन करावीत. (उदा. वर्गखोली/शाळा परिसर/स्वच्छतागृह/पिण्याच्या पाण्याची व्यवस्था/क्रीडांगण/शाळेचा प्रवेश परिसर/सुशोभीकरण केलेल्या जागा).
विशेष शालेय स्वच्छता मोहीम शासन निर्णय PDF
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संकेतांक 202610161449321649 असा आहे. राज्यातील शाळांमध्ये विशेष शालेय स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत दिनांक 16/10/2026 रोजीचा शासन निर्णय येथे डाउनलोड करा












