Diwali Holiday Workbook 2026 : दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांच्या अध्ययनात सातत्य राहावे आणि शाळेत शिकविलेल्या अभ्यासाचा सराव व्हावा, यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळी सुट्टीतील अभ्यास पुस्तिका (Diwali Homework Book) तयार करण्यात आल्या आहेत. या लेखात दिवाळी सुट्टीतील अभ्यास पुस्तिका मार्गदर्शक सूचना व इयत्ता निहाय PDF लिंक दिल्या आहेत.
Table of Contents
दिवाळी अभ्यास पुस्तिका मुख्य उद्देश
महाराष्ट्र शासनाच्या कृती कार्यक्रमानुसार वर्गातील किमान ७५ टक्के विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त कराव्यात, हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर मागे पडू नये, शाळेत शिकविलेल्या घटकांचा विसर पडू नये आणि त्यांचा नियमित सराव सुरू राहावा, हा या पुस्तिकांचा मुख्य उद्देश आहे.
दिवाळी अभ्यास पुस्तिकांमध्ये या विषयांचा समावेश
या दिवाळी पुस्तिकांमध्ये भाषा, गणित, सामाजिक-भावनिक विकास, पर्यावरण आणि इंग्रजी या विषयांशी संबंधित वर्गनिहाय कृतींचा समावेश करण्यात आला आहे. काही कृती विद्यार्थ्यांना स्वतः करायच्या आहेत, तर काही कृती पालक किंवा शिक्षकांच्या मदतीने पूर्ण करायच्या आहेत.

दिवाळी पुस्तिकांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना
पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी पुस्तिकांच्या वितरण व अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या आहेत.
१. सर्व शाळांपर्यंत पुस्तिका पोहोचविणे: दिवाळी पुस्तिका PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्या संबंधित तालुक्यातील सर्व शाळांपर्यंत पोहोचतील, याची दक्षता गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांनी घ्यावी.
२. पालकांच्या WhatsApp गटांमध्ये PDF पाठविणे: शाळांनी दिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वी संबंधित वर्गाच्या पुस्तिकेची PDF पालकांच्या WhatsApp गटांमध्ये शेअर करावी.
३. पुस्तिकेची प्रिंट काढणे बंधनकारक नाही: शक्य असल्यास शाळा किंवा पालकांनी पुस्तिकेची प्रिंट काढावी. मात्र, प्रिंट काढणे बंधनकारक नाही. प्रिंट उपलब्ध नसल्यास पालकांनी PDF पाहून विद्यार्थ्यांकडून संबंधित कृती स्वतःच्या वहीत सोडवून घ्याव्यात.
४. पालकांपर्यंत आवश्यक सूचना पोहोचविणे: पुस्तिका सोडविताना पालक व विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतच्या सूचना परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्टात दिल्या आहेत. या सूचना सर्व पालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित शाळांची राहील.
५. वर्गनिहाय पुस्तिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे: ज्या वर्गात विद्यार्थी शिकत आहेत, त्या वर्गाचीच पुस्तिका त्यांच्यापर्यंत पोहोचेल, याची खात्री शाळांनी करावी.
शिक्षक आणि पालकांची भूमिका काय असणार?
शिक्षकांनी पालकांना दिवाळी पुस्तिकांची माहिती देऊन या उपक्रमातील त्यांच्या सहभागाचे महत्त्व समजावून सांगावे. विद्यार्थ्यांनी पुस्तिका स्वेच्छेने आणि आनंदाने पूर्ण कराव्यात, यासाठी त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करावे.
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर शिक्षकांनी पुस्तिका तपासताना विद्यार्थ्यांचा सहभाग, कल्पकता आणि अभ्यासातील सातत्य यांची नोंद घ्यावी. तसेच, सुट्टीनंतर होणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत पालकांकडून पुस्तिकांबाबत अभिप्राय घेऊन त्यावर चर्चा करावी.
दिवाळी पुस्तिका सोडविताना पालक व विद्यार्थ्यांनी कोणत्या सूचना पाळाव्यात?
परिपत्रकातील परिशिष्ट १ मध्ये पालक आणि विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुस्तिका सोडविताना विद्यार्थ्यांसोबत पालकांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र, पालकांनी विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढीच मदत करावी. उदाहरणार्थ, कृतीतील सूचना किंवा मजकूर वाचून दाखविणे अथवा लेखनात अडचण असल्यास मदत करणे अपेक्षित आहे.
ज्या कृतींसाठी मोठ्यांची मदत आवश्यक आहे, अशा ठिकाणी सूचना वाचून दाखवाव्यात. विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे त्यांच्या कल्पनेनुसार असू द्यावीत. चित्रे किंवा अक्षरे अगदी रेखीव असावीत, असा आग्रह धरू नये. चित्रे काढण्यासाठी शक्यतो रंगखडू वापरण्याची सूचना करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या संपूर्ण सुट्टीच्या कालावधीत पुस्तिका पूर्ण करावयाच्या आहेत. त्यासाठी दररोज केवळ एक ते दोन कृती करणे अपेक्षित आहे. पुस्तिका PDF स्वरूपात उपलब्ध असल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित कृती वहीत सोडवाव्यात.
इयत्ता 1 ली ते 6 वीच्या दिवाळी अभ्यास पुस्तिका PDF लिंक | Diwali Holiday Workbook PDF 2026
पुणे जिल्हा परिषदेने इयत्तानिहाय दिवाळी अभ्यास पुस्तिका (Diwali Workbook 2026) PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांना संबंधित पुस्तिका पाहण्यासाठी खालील इयत्तेच्या नावावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता.
- इयत्ता पहिलीची दिवाळी पुस्तिका मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
- इयत्ता दुसरीची दिवाळी पुस्तिका मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
- इयत्ता तिसरीची दिवाळी पुस्तिका मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
- इयत्ता चौथीची दिवाळी पुस्तिका मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
- इयत्ता पाचवीची दिवाळी पुस्तिका मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
- इयत्ता सहावीची दिवाळी पुस्तिका मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
पुस्तिका सोडविलेल्या विद्यार्थ्यांची माहिती २६ नोव्हेंबरपर्यंत नोंदवावी
दिवाळी पुस्तिकांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांची एकत्रित माहिती संकलित करावी. विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या पुस्तिकांची संख्या इयत्तानिहाय आणि शाळानिहाय नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ही माहिती २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत संबंधित Google Form मध्ये अचूकपणे भरायची आहे. याशिवाय, पुस्तिकांची उपयुक्तता जाणून घेण्यासाठी स्वतंत्र Google Form उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फॉर्म शिक्षण केंद्रप्रमुख आणि पालक भरू शकतात. त्याचा QR कोड प्रत्येक पुस्तिकेच्या शेवटच्या पानावर देण्यात आला आहे.
या उपक्रमातून दिवाळीच्या सुट्टीतही विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा सराव सुरू राहण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी सुट्टीचा आनंद घेत दररोज थोडा वेळ या कृतींसाठी द्यावा आणि पालकांनीही त्यांना आवश्यक तेवढे सहकार्य करावे, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. या पुस्तिकांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी परिपत्रक जारी केले आहे.
अधिक माहितीसाठी : दिवाळी अभ्यास पुस्तिका अंमलबजावणीबाबतचे परिपत्रक येथे डाउनलोड करा
महत्वाची सूचना: सदर दिवाळी सुट्टीतील अभ्यास पुस्तिका हा उपक्रम पुणे जिल्हा परिषदेचा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यात हा उपक्रम लागू नाही. तुम्ही अभ्यासासाठी या PDF चा वापर करू शकता. सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!












