Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

महाराष्ट्रात प्रथमच राज्यस्तरीय बाल संसद! कधी, कुठे आणि कसे होणार आयोजन? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Bal Sansad 2026

Maharashtra Bal Sansad 2026 : बालकांचा निर्णयप्रक्रियेतील सहभाग वाढविणे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करणे या उद्देशाने महाराष्ट्रात प्रथमच राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र बाल संसद 2026’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये 34 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. जागतिक बाल दिनाचे (World Children’s Day) औचित्य साधून शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026 रोजी पुण्यातील यशदा येथे ही बाल संसद आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग (MSCPCR), यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचेही या उपक्रमासाठी सहकार्य लाभणार आहे.

या बाल संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ आपले विचार मांडण्याची संधी मिळणार नाही, तर लोकशाही पद्धतीने निर्णय कसे घेतले जातात, सभागृहाचे कामकाज कसे चालते आणि लोकप्रतिनिधींची भूमिका काय असते, याचा प्रत्यक्ष अनुभवही घेता येणार आहे.

महाराष्ट्र बाल संसद 2026 मध्ये कोणाला सहभागी होता येणार?

या राज्यस्तरीय बाल संसदेमध्ये महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांतील 102 नामनिर्देशित बालस्नेही ग्रामपंचायतींमधून निवडलेले 100 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. इयत्ता 6 वी ते 10 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यातून 3 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यांतील समस्या, अपेक्षा आणि विकासासंदर्भातील सूचना राज्यस्तरीय व्यासपीठावर मांडता येणार आहेत.

विकसित महाराष्ट्र @2027 ही बाल संसदेची मध्यवर्ती संकल्पना

‘विकसित महाराष्ट्र @२०४७’ ही या बाल संसदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत म्हणजेच २०४७ पर्यंत महाराष्ट्र कसा असावा, याबाबत विद्यार्थी आपले विचार मांडणार आहेत.

यामध्ये विद्यार्थ्यांच्या स्थानिक समस्या, त्यांच्या अपेक्षा, गावातील सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना यांवर चर्चा होणार आहे. विकसित महाराष्ट्राच्या उभारणीत बालकांचे विचार आणि सूचना यांचाही समावेश व्हावा, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.

विधानसभेच्या धर्तीवर चालणार बाल संसदेचे कामकाज

विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी बाल संसदेचे कामकाज विधानसभेच्या धर्तीवर आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थी आपापल्या विभागीय समित्यांमध्ये चर्चा करून बालमंत्री निवडतील. त्यानंतर बाल मुख्यमंत्री आणि बाल सभापती यांची निवड करण्यात येईल.

बाल संसदेत सहभागी विद्यार्थी सदस्य म्हणून सभागृहात आपल्या जिल्ह्यांतील प्रश्न मांडतील. बालमंत्र्यांची निवेदने ऐकणे, प्रश्नोत्तराच्या सत्रात प्रश्न विचारणे आणि विविध विषयांवर चर्चा करणे अशा स्वरूपात सभागृहाचे कामकाज पार पडणार आहे.

सहा विभागीय समित्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा | Maharashtra Bal Sansad Subject 2026

या बाल संसदेमध्ये राज्यातील सहा विभागीय समित्यांमार्फत वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांना संबंधित विषयावर आपले विचार आणि सूचना मांडता येतील.

  • पुणे विभाग: शिक्षण
  • छत्रपती संभाजीनगर विभाग: दुष्काळ
  • कोकण विभाग: उद्योग व रोजगार
  • नाशिक विभाग: बाल हक्क
  • नागपूर विभाग: समाजमाध्यमे व डिजिटल पायाभूत सुविधा
  • अमरावती विभाग: पोषण

या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील प्रश्नांपासून ते राज्याच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांपर्यंत विविध बाबींवर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.

शून्य प्रहर, प्रश्नोत्तराचा तास आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद

दिवसभराच्या कार्यक्रमात शून्य प्रहराच्या माध्यमातून ३४ जिल्ह्यांतील विद्यार्थी आपल्या जिल्ह्यांमधील समस्या सभागृहासमोर मांडणार आहेत. यानंतर बालमंत्र्यांची विविध खात्यांशी संबंधित निवेदने सादर केली जातील.

तसेच प्रश्नोत्तराचा तास आणि मान्यवर व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी संवाद अशी विविध सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शासनाच्या कामकाजाबाबत माहिती मिळण्यासोबतच आपल्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

बाल संसदेतील चर्चेतून तयार होणार ‘बालकांची सनद’

या उपक्रमातील महत्त्वाची निष्पत्ती म्हणजे सहभागी बालकांनी मांडलेले मुद्दे, समस्या, अपेक्षा आणि शिफारशी यांचा समावेश असलेली ‘बालकांची सनद’ तयार करण्यात येणार आहे. ही सनद मुख्यमंत्री तसेच संबंधित राज्य शासनाच्या विभागांना सादर करण्यात येणार आहे.

बाल संसदेत सहभागी झालेले विद्यार्थी या उपक्रमातून मिळालेले अनुभव आणि शिकवण आपल्या ग्रामपंचायती व बालपंचायतींपर्यंत पोहोचवतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

बालकांच्या विचारांना राज्याच्या विकास प्रक्रियेत स्थान

महाराष्ट्र बाल संसद २०२६ (Maharashtra Bal Sansad 2026) हा केवळ विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम नसून, बालकांचा आवाज निर्णयप्रक्रियेपर्यंत पोहोचविण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. बालकांना स्वतःचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि गावपातळीवरील बालसहभाग राज्यस्तरावर नेणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

आज इयत्ता सहावीमध्ये शिकणारी मुले 2047 मध्ये विकसित महाराष्ट्राच्या उभारणीत सक्रिय भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा, विचारांचा आणि अपेक्षांचा आजच्या विकास प्रक्रियेत समावेश होणे महत्त्वाचे आहे. बालकांना केवळ भविष्याचे नागरिक न मानता वर्तमानातील सक्रिय भागीदार म्हणून विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्याच्या दिशेने Maharashtra Bal Sansad 2026 हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

Related
बाल चित्रकला स्पर्धेचा निकाल अपडेट येथे चेक करा

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment