Chala Shalet Jauya Abhiyan Nodal Officers List Circular 2026 : चला शाळेत जाऊया अभियान अंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी तसेच आकांक्षित जिल्ह्यांसाठी जिल्हानिहाय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून याबाबत यादी जाहीर करण्यात आली आहे. सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. (संपूर्ण यादी, शाळा भेट नियोजन व परिपत्रक डाउनलोड लिंक खाली दिली आहे.)
नवीन अपडेट : चला शाळेत जाऊया अभियान अंतर्गत आता दिनांक २२ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत शाळांना भेटी होणार आहे. याबाबतचे नियोजन
राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देतानाच शाळांमधील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जपणूक करण्यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ हे व्यापक अभियान लोकचळवळीच्या स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी राज्यातील शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शैक्षणिक व भौतिक सुविधांचा आढावा घेणार आहेत.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात शालेय शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माहिती दिली.
या अभियानांतर्गत संबंधित अधिकारी यांनी दिनांक ८ व ९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत शाळांना भेटी दिल्या आहेत. आता दिनांक २२ व २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत भेटी होणार आहे. तदनंतर दिनांक ७ व ८ ऑक्टोबर रोजी शाळांना भेटी देणार आहेत. यासाठी अधिकाऱ्यांना विविध जिल्ह्यांचे पालकत्व सोपविण्यात आले आहे.
आकांक्षित १० जिल्ह्यांसाठी पालक अधिकारी
राज्याच्या संतुलित आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने १० जिल्ह्यांची विस्तारित आकांक्षित जिल्हे म्हणून निवड करण्यात आली आहे. या जिल्ह्यांसाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
| जिल्हा | पालक अधिकारी |
|---|---|
| जालना | प्रधान सचिव |
| गडचिरोली | शालेय शिक्षण आयुक्त |
| पालघर | महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक |
| परभणी | राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक |
| बीड | माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष |
| नंदुरबार | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष |
| वाशिम | शिक्षण संचालक (प्राथमिक) |
| धाराशिव | शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) |
| धुळे | शिक्षण संचालक (योजना) |
| हिंगोली | संचालक (बालभारती) |
शाळांमधील सुविधांसाठी विविध निधींचा समन्वय
‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून शाळांमधील अपूर्ण भौतिक सुविधा पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीचा वापर वाढविण्यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, लोकसहभाग, CSR निधी आणि आकांक्षित तालुक्यांसाठी उपलब्ध विशेष निधी यांचा प्रभावी समन्वय साधला जाणार आहे.
ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि उद्योग समूहांच्या CSR निधीतून काही शाळांनी केलेले उल्लेखनीय काम राज्यातील इतर शाळांसाठी आदर्श ठरू शकते. अशा उपक्रमांचा राज्यभर विस्तार करण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विशेष भर
विद्यार्थ्यांची वाचन, लेखन आणि आकलन क्षमता वाढविणे, मराठी शाळांबाबत समाजाचा विश्वास अधिक दृढ करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये गुणवत्तेची नवी उंची गाठणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि स्थानिक समाज यांच्या एकत्रित सहभागातून शाळांच्या विकासाला गती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्हानिहाय नोडल अधिकाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती यादी
आकांक्षित १० जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीवर संबंधित विभागाचे विभागीय अध्यक्ष संनियंत्रण अधिकारी म्हणून देखरेख ठेवणार आहेत.
संबंधित संनियंत्रण अधिकारी दर १५ दिवसांनी कामांचा आढावा घेऊन त्याचा अहवाल शिक्षण आयुक्तालयास सादर करतील.


चला शाळेत जाऊया अभियान – जिल्हानिहाय नोडल अधिकारी यादी PDF डाउनलोड
संघटनांच्या मागण्यांवरही सकारात्मक कार्यवाही
शालेय शिक्षण विभागाशी संबंधित विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी बैठकीत त्यांच्या मागण्या, प्रश्न आणि सूचना मांडल्या. या मागण्यांवर सकारात्मक दृष्टिकोनातून कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.
काही प्रश्नांवर विभागाने यापूर्वीच कार्यवाही केली असून उर्वरित प्रलंबित प्रश्नही टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येणार आहेत. आर्थिक किंवा धोरणात्मक स्वरूपाच्या विषयांबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला जाणार आहे.
सर्व संघटनांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या काही आठवड्यांत पुणे येथे व्यापक बैठक आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर सखोल चर्चा केली जाणार आहे.
‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून केवळ शाळांना भेटी देणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता शाळांचा शैक्षणिक दर्जा, भौतिक सुविधा आणि समाजाचा सहभाग यांना एकत्रित दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
चला शाळेत जाऊया अभियान – जिल्हानिहाय नोडल अधिकारी यादी PDF डाउनलोड













