Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबवले जाणारे विविध उपक्रम यादी जाहीर

Seva Sankalp Abhiyan Upkram gr

Seva Sankalp Abhiyan Upkram List 2026 : आपल्या देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भीय शासन निर्णयान्वये दि. १७ सप्टेंबर, २०२६ ते दि. १७ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत राज्यातसेवा संकल्प अभियान” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सदर शासन निर्णयामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असलेले विविध उपक्रम राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यामध्ये विशेषतः विकसित भारत” संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, “नमो सेवागाथा” कार्यक्रम तसेच शिक्षण, करिअर मार्गदर्शन, डिजिटल साक्षरता व विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासंदर्भातील उपक्रमांचा समावेश आहे.

त्या अनुषंगाने विविध उपक्रम शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित/विनाअनुदानित शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.

‘सेवा संकल्प अभियान’ शालेय शिक्षण विभाग उपक्रम यादी | Seva Sankalp Abhiyan Upkram List 2026

शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित/विनाअनुदानित शाळांमध्ये “सेवा संकल्प अभियान” राबविण्याकरिता खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात यावेत.

सेवा संकल्प अभियान उपक्रम

१) “विकसित भारत २०४७” चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा

१.१ चित्रकला स्पर्धा: सर्व शासकीय व खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी “विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करावी. स्पर्धेत विद्यार्थ्यांना विकसित भारत, राष्ट्रनिर्मिती, नवभारताची संकल्पना, स्वच्छ व सक्षम भारत, पर्यावरण संवर्धन, तंत्रज्ञान, शिक्षण, कौशल्य व रोजगार इत्यादी बाबींच्या माध्यमातून आपली कल्पना मांडण्यासाठी प्रोत्साहित करावे. स्पर्धेत निवड झालेल्या उत्कृष्ट चित्रांचे शाळास्तरीय प्रदर्शन आयोजित करावे.

१.२ वक्तृत्व स्पर्धा: खालील विषयांवर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करावी:

  • “माझ्या स्वप्नातील भारत”
  • “विकसित भारत – २०४७”

विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तसेच विकसित भारताच्या संकल्पनेची माहिती शिक्षकांनी समजावून सांगावी.

१.३ पुढील स्तरावरील निवड: शाळास्तरावरून उत्कृष्ट चित्रे व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांची निवड करावी. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे वक्तृत्व सादरीकरण व्हिडिओ स्वरूपात नोंदवून सदर व्हिडिओ व उत्कृष्ट चित्रे संबंधित गट शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचेकडे सादर करावीत. सर्व शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत जिल्हास्तरावर उत्कृष्ट चित्रांचे व वक्तृत्वस्पर्धा विजेत्यांच्या सादरीकरण व्हिडीओंचे प्रदर्शन आयोजित करावे व राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन राज्य नोडल अधिकारी यांच्यामार्फत करण्यात यावे. तसेच, उत्कृष्ट विद्यार्थ्यांना योग्य ते प्रशस्तीपत्र/पुरस्कार देण्यात यावेत.

२) “नमो सेवागाथा” – शाळा/तालुका स्तरावरील कार्यक्रम

दि. २ ऑक्टोबर, २०२६ रोजी प्रत्येक तालुक्यात “नमो सेवागाथा” कार्यक्रम आयोजित करावा. कला पथक/नाट्य पथक यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती विद्यार्थ्यांना, पालकांना व नागरिकांना देण्यात यावी. या कार्यक्रमामध्ये स्थानिक कलाकारांचा सहभाग, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, शासनाच्या योजनांवरील माहितीपर सादरीकरण, उत्कृष्ट विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान यांचा समावेश करता येईल. सदर कार्यक्रमासाठी गट शिक्षण अधिकारी हे तालुकास्तरीय नोडल अधिकारी राहतील. संकलित अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्यामार्फत शालेय शिक्षण विभागास सादर करण्यात यावा.

३) “सेवा माझे योगदान” सामाजिक दायित्व उपक्रम

३.१ “सेवा माझे योगदान” अंतर्गत आयोजित करावयाचे उपक्रम: शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक व माजी विद्यार्थी यांच्या सहभागातून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन व जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी स्थानिक परिस्थिती, विद्यार्थ्यांची ऐच्छिकता/सुरक्षा/वय विचारात घेऊन पुढीलपैकी उपक्रम आयोजित करण्यात यावेत:

  • स्वच्छता अभियान
  • वृक्षारोपण
  • प्लास्टिकमुक्ती जनजागृती
  • कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग
  • जलसंधारण व जलस्रोत स्वच्छता
  • रस्ता सुरक्षा जनजागृती
  • सायबर सुरक्षा जनजागृती
  • “फिट इंडिया” खेळ सत्र
  • वीर गाथा व सैनिकांचा सन्मान
  • दिव्यांगजन सहयोग उपक्रम
  • मतदार जागृती व नोंदणी
  • “व्होकल फॉर लोकल” उपक्रम
  • व्यसनमुक्त भारत जनजागृती
  • पोषण व अॅनिमिया जनजागृती

३.२ विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर सत्रे/उपक्रम:

  • वंचित मुलांसाठी शिक्षण सहकार्य: आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या वंचित मुलांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके, वह्या, डिजिटल साधने इत्यादींच्या माध्यमातून शक्य ते शैक्षणिक सहकार्य करावे.
  • करिअर कौन्सेलिंग सत्र: इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्थानिक उपलब्ध तज्ज्ञ, व्यावसायिक, उद्योजक, माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने करिअर मार्गदर्शन सत्रे आयोजित करावीत.
  • डिजिटल साक्षरता: विद्यार्थी, पालक तसेच गरजू नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता व सुरक्षित डिजिटल वापराबाबत मार्गदर्शन सत्रे आयोजित करावीत.
  • विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे: विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी विविध प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून द्यावे.

४) शाळांमध्ये “विकसित भारत २०४७” जनजागृती

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विकसित भारत २०४७ या संकल्पनेची माहिती देण्यासाठी विशेष सत्र आयोजित करून मार्गदर्शन करावे. यामध्ये पुढील बाबींवर भर देण्यात यावा:

  • गुणवत्तापूर्ण शिक्षण
  • कौशल्य व रोजगार
  • नवोपक्रम व तंत्रज्ञान
  • पर्यावरण संवर्धन
  • स्वच्छता
  • जबाबदार नागरिकत्व
  • आत्मनिर्भरता
  • राष्ट्रनिर्मितीतील युवकांची भूमिका

५) शाळांमध्ये “सेवा संकल्प”

“सेवा संकल्प अभियान” कालावधीत प्रत्येक शाळेने आपल्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन किमान एका अर्थपूर्ण सेवा उपक्रमाची अंमलबजावणी करावी. सदर उपक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी व स्थानिक नागरिक यांचा सहभाग घेण्यात यावा. उपक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून “मी समाजासाठी काय करू शकतो?” या भावनेवर आधारित सेवा संकल्प घेण्यात यावा.

६) प्रसिद्धी व दस्तऐवजीकरण

सर्व उपक्रमांचे छायाचित्रण, व्हिडिओ चित्रीकरण, विद्यार्थ्यांचे अनुभव/प्रतिक्रिया, उत्कृष्ट उपक्रमांच्या यशोगाथा यांचे संकलन करण्यात यावे. प्राप्त झालेल्या उत्कृष्ट फोटो/व्हिडिओ/रील्सचा उपयोग विभागाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्धीसाठी करण्यात यावा. तसेच, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकारी यांनी अशा कामांचे व्हिडिओ, रील्स व फोटो संकलित करून माहिती व जनसंपर्क विभागास उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

७) अंमलबजावणी व संनियंत्रण

  • शाळास्तर: मुख्याध्यापक हे शाळास्तरीय उपक्रमांचे समन्वयक राहतील.
  • तालुकास्तर: गट शिक्षण अधिकारी हे तालुकास्तरीय नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. ते शाळांना मार्गदर्शन करतील, उपक्रमांचे संनियंत्रण करतील, उत्कृष्ट उपक्रमांची निवड करतील, तालुकास्तरीय अहवाल तयार करतील.
  • जिल्हास्तर: शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) हे जिल्हास्तरीय समन्वयक म्हणून काम पाहतील. ते तालुकानिहाय माहिती संकलित करून जिल्हास्तरीय अहवाल राज्यस्तरीय नोडल अधिकाऱ्यामार्फत शालेय शिक्षण विभागास सादर करतील.
  • राज्यस्तर: शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे हे संपूर्ण राज्यात “सेवा संकल्प अभियान” राबविण्याकरिता नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.

८) अहवाल सादरीकरण

प्रत्येक शाळेने राबविलेल्या उपक्रमाची संक्षिप्त माहिती, सहभागी विद्यार्थी/शिक्षकांची संख्या, छायाचित्रे व आवश्यकतेनुसार व्हिडिओ यांची नोंद ठेवावी. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय संकलित अहवाल तयार करून शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांना सादर करावा. शिक्षणाधिकारी यांनी जिल्हानिहाय संकलित अहवाल राज्यस्तरीय नोडल अधिकाऱ्यामार्फत शालेय शिक्षण विभागास सादर करावा.

९) कालमर्यादा

वरील सर्व उपक्रम दि. १७ सप्टेंबर, २०२६ ते दि. १७ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत राबविण्यात यावेत. दि. २ ऑक्टोबर, २०२६ रोजी “नमो सेवागाथा” कार्यक्रम तालुका स्तरावर आयोजित करणे आवश्यक राहील.

१०) सर्व संबंधितांना सूचना

१. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गट शिक्षण अधिकारी व मुख्याध्यापक यांनी सदर अभियानामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा. उपक्रम हे केवळ औपचारिक स्वरूपाचे न राहता विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक जबाबदारी, राष्ट्रनिर्मितीची जाणीव निर्माण करणारे असावेत. २. ‘सेवा संकल्प अभियान’ या उपक्रमांतर्गत, उपरोक्त नमूद कृती कार्यक्रम/घटक उपक्रम आयोजित करणे हे राज्यातील सर्व शाळांसाठी अनिवार्य राहील. परंतु, आयोजित करण्यात येणाऱ्या कृती कार्यक्रम/घटक उपक्रमात सहभागी होणे विद्यार्थ्यांकरिता ऐच्छिक राहील.

सेवा संकल्प अभियान शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०९१११८५९४६१३४९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

Seva Sankalp Abhiyan Upkram gr

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment