Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी 2026: विद्यार्थ्यांना NASA, ISRO भेटीची संधी!

Mukhyamantri Vidhyarthi Vidnyan Wari

Mukhyamantri Vidhyarthi Vidnyan Wari: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) नुसार आता महाराष्ट्र राज्यातील बाल वैज्ञानिक प्रदर्शनांमध्ये (Science Exhibitions) निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अमेरिका येथील नासा (NASA), बंगळूरू येथील इस्त्रो (ISRO) तसेच रमन सायन्स सेंटर नागपूर, पिंपरी-चिंचवड सायन्स सेंटर, पुणे किंवा नेहरु तारांगण, मुंबई या विज्ञान केंद्रांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासनाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रम सुरू केला असून या योजनेत तालुका ते राज्यस्तरीय विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती पाहूया.

मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रमाचे मुख्य उद्देश आणि पार्श्वभूमी

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) मध्ये विज्ञान शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारसरणी आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना अनुभवाधारित व प्रयोगशील शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञान अधिक समजण्यास सोपे करण्यात आले आहे. शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल लॅबस्, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणकीय विचार यांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनविण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर “मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रम काय आहे?

NEP 2020 मध्ये संशोधनाच्या गुणवत्तेमध्ये परिवर्तन आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी एक सर्वसमावेशक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसारच आता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने तालुका, जिल्हा आणि राज्यस्तर विज्ञान प्रदर्शनांमध्ये निवड झालेल्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

यामध्ये तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या प्रत्येकी ६ अशा एकूण २१४८ विद्यार्थ्यांना विभागीय सायन्स सेंटरला (नागपूर, मुंबई, पुणे) येथे भेट देण्याची संधी मिळणार आहे.

तसेच जिल्हास्तरांवर निवड झालेल्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना बंगळूरू येथील इस्रो (ISRO) केंद्राला भेट आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट ५१ विद्यार्थ्यांना अमेरिका येथील नासा (NASA) केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे.

मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रमांतर्गत कोणत्या विज्ञान केंद्रांना भेट दिली जाणार?

Mukhyamantri Vidhyarthi Vidnyan Wari या उपक्रमामध्ये तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खालील विज्ञान केंद्राना भेटी देण्याची संधी मिळणार आहे.

तालुका स्तरावर निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्र भेट स्थळ

राज्यातील तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात प्रथम येणाऱ्या प्रत्येकी ६ असे एकूण २१४८ विद्यार्थी (३५८ X ६ = २१४८) व त्यांच्या सोबतच्या २० पर्यवेक्षक / विज्ञान शिक्षक यांना रमन सायन्स सेंटर, नागपूर/ पिंपरी-चिंचवड सायन्स सेंटर, पुणे किंवा नेहरु तारांगण, मुंबई यापैकी जे विज्ञान केंद्र नजीक असेल, त्या ठिकाणी भेट देण्यात येणार आहे.

जिल्हा स्तरावर निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्र भेट स्थळ

राज्यातील जिल्हा स्तरावरील प्राथमिक व माध्यमिक (सर्वसाधारण गट), प्राथमिक व माध्यमिक (दिव्यांग गट) आणि प्राथमिक व माध्यमिक (आदिवासी गट) मधून निवड झालेल्या एकूण १८० विद्यार्थी व ०८ पर्यवेक्षक / शिक्षक यांना बंगळूरू येथील इस्त्रो (ISRO) केंद्राला भेट देण्याची एक चांगली संधी मुलांना मिळणार आहे.

राज्य स्तरावर निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्र भेट स्थळ

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या उत्कृष्ट ५१ विद्यार्थी, ०१-शिक्षक, ०१-शिक्षिका व ०२ प्रशासकीय अधिकारी / समन्वयक अशा एकूण ५५ व्यक्तींना अमेरिका येथील नासा (NASA) या विज्ञान केंद्राला भेटी देण्याची संधी असून, या दरम्यानचा संपूर्ण खर्च शासनामार्फत होणार आहे.

मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रमामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे?

मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रमाचे आयोजन हे एन.सी.ई.आर.टी.
(NCERT) नवी दिल्ली आणि राज्यशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांनुसार तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तरावरील बाल वैज्ञानिक प्रदर्शनांचे (विज्ञान प्रदर्शन) आयोजन करण्यात येणार आहे.

तालुका स्तरावर विज्ञान केंद्र भेटीसाठी विद्यार्थ्यांची निवड कशी होणार?

तालुकास्तरावर बाल वैज्ञानिकांना त्या-त्या विभागातील नजिकच्या सायन्स सेंटरला भेट देण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद / शिक्षण निरिक्षक यांच्या स्तरावर समिती गठित करण्यात येणार आहे.

विज्ञान प्रदर्शनाच्या मूल्यमापनासाठी उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर (इयत्ता ९ वी ते १२ वी) असे दोन गट निश्चित करण्यात आले आहे.

यामधून तालुकास्तरावरील प्राथमिक व माध्यमिक स्तरातील सर्वसाधारण, दिव्यांग व आदिवासी गटातून प्रत्येकी प्रथम क्रमांकावरील एक याप्रमाणे ०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल, त्यामुळे तालुकास्तरावरील पात्र विद्यार्थ्यांची संख्या २१४८ (३५८X६) इतकी असून २० पर्यवेक्षक / विज्ञान शिक्षक अशा एकूण २१६८ व्यक्तींना विज्ञान केंद्र भेटी साठी पाठविण्यात येणार आहे. यासाठी प्रतिव्यक्ती कमाल रु.२०,०००/- इतका खर्च त्या-त्या जिल्हास्तरावरील जिल्हा योजनेतून (DPDC) तरतूद करण्याबबत शासन निर्णयाद्वारे कळविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीतील तालुका स्तरावर विद्यार्थ्यांची निवड करणे, भेटीचे स्थळ निश्चित करणे, भेटीचे नियोजन करणे याची जबाबदारी तालुकास्तरावरील नियंत्रक म्हणून गट शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

इस्त्रो (ISRO) भेटीसाठी निवड कशी होईल?

राज्यातील एकूण ३४ जिल्हे व मुंबई (उत्तर/ पश्चिम / दक्षिण) मधील ०३ याप्रमाणे एकूण ३७ ठिकाणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन राबविण्यात येते. यापैकी १६ आदिवासी जिल्हे आहेत. जिल्हास्तरीय प्रदर्शनात तालुकास्तरीय प्रदर्शनातून निवड झालेले विद्यार्थी सहभागी होतात. जिल्हास्तरावरील विज्ञान प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांच्या दोन गटातून राज्यस्तर प्रदर्शानासाठी निवड करण्यात येते.

जिल्हास्तरावरील बाल वैज्ञानिकांची निवड करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. सदर गटातून मुख्यमंत्री विद्यार्थी वारीतील विद्यार्थ्यांना बंगळूरू येथील इस्त्रो (ISRO) केंद्राला भेट देण्यासाठी खालीलप्रमाणे निवड करण्यात येणार आहे.

Mukhyamantri Vidhyarthi Vidnyan Wari upkram nivad

यामध्ये राज्यातील जिल्हा स्तरावरील प्राथमिक व माध्यमिक (सर्वसाधारण गट), प्राथमिक व माध्यमिक (दिव्यांग गट) आणि प्राथमिक व माध्यमिक (आदिवासी गट) मधून निवड झालेल्या १८० विद्यार्थ्यांसोबतच्या ०८ पर्यवेक्षक / विज्ञान शिक्षक यांची बंगळूरू येथील इस्त्रो (ISRO) केंद्राला भेट देण्यासाठी निवड करण्यात येणार आहे. त्यासाठीप्रती व्यक्ती कमाल रु. ३५,०००/- इतका खर्च त्या-त्या जिल्हास्तरावरील जिल्हा योजनेत (DPDC) मधून करण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हास्तरावरील विद्यार्थ्यांची निवड करणे व भेटीचे नियोजन करणे याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

NASA भेटीसाठी विद्यार्थ्यांची निवड कशी होईल?

उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतचे विद्यार्थी) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर (इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी) गट असून, याकरिता राज्यस्तरीय उत्कृष्ट ५१ बाल वैज्ञानिक विद्यार्थ्याची व ०४ प्रशासकीय अधिकारी / विज्ञान शिक्षक यांची अमेरिका येथील नासा (NASA) भेटीच्या वारी करिता संधी मिळणार आहे.

मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीतील नासा (NASA) येथील केंद्रास भेटीसाठी ५१ विद्यार्थ्यांची निवड खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे.

Mukhyamantri Vidhyarthi Vidnyan Wari upkram rajya star

राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनात निवड झालेल्या ५१ विद्यार्थी व सोबत जाणाऱ्या ४ प्रशासकीय अधिकारी / विज्ञान शिक्षकांकरिता ८ दिवसांच्या कालावधीतील अमेरिका येथील नासा (NASA) भेटीच्या वारीकरिता विमान प्रवास खर्च, व्हिसा खर्च, निवास व्यवस्था तेथील प्रवास खर्च यामध्ये वेळोवेळी होणारी वाढ विचारात घेऊन प्रतिव्यक्तींसाठी कमाल रु. ६,००,०००/- याप्रमाणे ५५ व्यक्तींच्या रु. ३,३०,००,०००/- इतक्या खर्चास शासन मान्यता देण्यात आली आहे.

राज्यस्तरावरील अमेरिका येथील नासा (NASA) भेटीचे आयोजन व नियोजन करण्यासाठी निवड संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती असणार आहे.

अधिक माहितीसाठी: मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रम शासन निर्णय PDF डाउनलोड करा

सारांश

मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी हा उपक्रम राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी एक अभिमानास्पद उपक्रम असणार आहे. यामध्ये विशेषत: सर्वच विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर बाल वैज्ञानिक प्रदर्शनामध्ये सहभाग घेण्याची संधी तर मिळणारच आहे. त्यासोबत निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना रमन सायन्स सेंटर, नागपूर/ पिंपरी-चिंचवड सायन्स सेंटर, पुणे किंवा नेहरु तारांगण, मुंबई, बंगळूरू येथील इस्त्रो (ISRO) आणि अमेरिका येथील नासा (NASA) केंद्राला भेटी देण्याची संधी मिळणार आहे.

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment