राष्ट्रीय नशा मुक्ती जनजागृती अभियान आणि राज्यव्यापी प्रतिज्ञा मोहिमेबाबत
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन परिपत्रक दिनांक :-०४ ऑगस्ट, २०२६.
भारत सरकारसोबत नशा मुक्त भारत अभियानांतर्गत झालेल्या सामंजस्य कराराच्या (MoU) अनुषंगाने, मेडिकल विंग (Rajayoga Education & Research Foundation) यांच्यामार्फत दिनांक ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये देशव्यापी “नशा मुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा” आयोजित करत आहे, ज्याचा उद्देश ४ कोटी नागरिकांना – विशेषतः युवक/युवती आणि विद्यार्थ्यांना व्यसनाच्या विरोधात प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करणे असा आहे.
विद्यार्थी आणि युवकांना ही प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करून, आपण एकत्रितपणे व्यसने, तणाव आणि जीवनशैलीतील आजारांपासून मुक्त समाज घडवू शकतो. एकत्रितपणे “Say No to Drugs, Say Yes to Life” (व्यसनाला नाही म्हणा, जीवनाला हो म्हणा) या संदेशासह राज्यातील या मोहीम कालावधीत प्रतिज्ञा आणि जनजागृती उपक्रमांमध्ये सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सहभागी होण्याकरिता आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी आवश्यक त्या सूचना निर्गमित करणेबाबत शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांनी आदेशीत केले आहे.
तसेच सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल आयुक्त (शिक्षण), पुणे यांनी शासनास सादर करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०८०४१५२१०५७२४९ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आले आहे.

नशा मुक्ती जनजागृती अभियान स्लोगन
शाळा, महाविद्यालय, रॅली, पोस्टर, बॅनर नशा मुक्ती जनजागृती अभियानसाठी स्लोगन खालीलप्रमाणे
- नशा सोडा, निरोगी आयुष्य जोडा.
- व्यसनाला नकार, उज्ज्वल भविष्याचा स्वीकार.
- नशेमुक्त युवा, सक्षम भारताची नवी दिशा.
- व्यसनमुक्त जीवन, आनंदी कुटुंबाचे कारण.
- नशा नाही, शिक्षण हाच खरा मार्ग.
- व्यसनाला ‘नाही’ म्हणा, जीवनाला ‘हो’ म्हणा.
- नशेमुळे नुकसान, संयमामुळे सन्मान.
- आजच घ्या संकल्प – नशेमुक्त समाज घडवूया.
- व्यसन सोडा, स्वप्नांना नवी भरारी द्या.
- नशेच्या अंधारातून आरोग्याच्या प्रकाशाकडे चला.
- नशामुक्त तरुणाई, देशाची खरी ताकद.
- व्यसनापासून दूर राहा, कुटुंबाचा आनंद जपा.
- नशा नाही संस्कार, हाच जीवनाचा खरा आधार.
- एक पाऊल नशामुक्तीकडे, हजार पावले प्रगतीकडे.
- नशेमुक्त भारत, सशक्त भारत.







