National Sports Day Activities 2026 (राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६) निमित्त दि. २८ ते ३० ऑगस्ट, २०२६ या कालावधीत विविध क्रीडा व फिटनेस उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत शिक्षण संचलनालय कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. त्यानुषंगाने राबविण्यात येणारे उपक्रम यादी या लेखात दिली आहे.
National Sports Day 2026
राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) हा दरवर्षी दिनांक २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो.
National Sports Day Theme 2026
क्रिडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना व निरोगी जीवनशैली याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ हा दिनांक २८ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत “Khelega Bharat, Jeetega Bharat” या संकल्पनेखाली साजरा करण्यात येणार आहे.
सदर अभियानांतर्गत “Tribute, Play and Move” या तीन स्तंभांनुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने आपल्या अधिपत्याखालील सर्व शाळांमध्ये सदर उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिन उपक्रम यादी |National Sports Day Activities in School
१. दिनांक २८ ऑगस्ट २०२६ – “TRIBUTE” – मेजर ध्यानचंद व भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाला अभिवादन करण्यासाठी पुढीलपैकी योग्य उपक्रम आयोजित करावेत
- मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पांजली/अभिवादन करणे.
- विदयार्थ्यांकडून विविध क्रीडा प्रकारांशी संबंधित “29 Challenge” राबविणे.
- “Pass the Ball Challenge” आयोजित करणे.
- विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामध्ये “Sports Bandhan” उपक्रम राबविणे.
- भारतीय क्रीडा क्षेत्रातील महान खेळाडू व स्थानिक क्रीडा व्यक्तिमत्वांची माहिती विद्यार्थ्यांना देणे.
- उपलब्ध डिजिटल साहित्याचा वापर करून राष्ट्रीय क्रीडा दिनाबाबत जनजागृती करणे.
२. दिनांक २९ ऑगस्ट २०२६ “PLAY” – राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मुख्य दिवशी “Ek Ghanta Khel Ke Maidan Mein” या आवाहनानुसार प्रत्येक विदयार्थ्याला किमान एक तास मैदानी खेळ अथवा शारीरिक उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावे. यासाठी –
- प्रत्येक वर्गासाठी एक खेळ/क्रिडा प्रकार निश्चित करणे.
- खो-खो, कबड्डी, लगोरी, पिडू यांसारख्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणे.
- शिक्षक विरुद्ध विदयार्थी मैत्रीपूर्ण सामने आयोजित करणे.
- धावणे, रिले रेस, विविध क्रीडा स्पर्धा व साधे शारीरिक उपक्रम आयोजित करणे.
- विदयार्थ्यांनी व शिक्षकांनी शक्य असल्यास क्रिडा पोशाख परिधान करावा.
- मुली, दिव्यांग विदयार्थी तसेच सर्व वयोगटातील विदयार्थ्यांचा समावेशक सहभाग सुनिश्चित करावा.
३. दिनांक ३० ऑगस्ट २०२६ – “MOVE” – राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या समारोपाच्या दिवशी “Sundays on Cycle” विशेष उपक्रमांतर्गत सायकल रॅली/सायकलिंग, वॉकथॉन, रन-अँड-राईड इत्यादी उपक्रम स्थानिक परिस्थितीनुसार आयोजित करावेत. या उपक्रमांमध्ये रस्ता सुरक्षा, हेल्मेटचा वापर व स्थानिक वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी.

४. प्रसिद्धी व जनजागृती – राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या उपक्रमांची माहिती विदयार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये व समाजामध्ये पोहोचविण्यासाठी उपलब्ध पोस्टर्स, बॅनर्स, सोशल मीडिया क्रिएटिव्हज व इतर प्रचार साहित्याचा वापर करावा. उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ व रील्स उपलब्ध असल्यास #FitIndiaNSD2026, #KhelegaBharatJeetegaBharat, #FitIndia या हॅशटॅगसह प्रसारित करण्यास प्रोत्साहन द्यावे.
५. समन्वय व अहवाल – प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित शाळांना याबाबत आवश्यक सूचना देऊन उपक्रमांचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी सुनिश्चित करावी. उपक्रमांची नोंद, छायाचित्रे व आवश्यक माहिती संकलित करून संबंधित प्राधिकरणास सादर करण्याची कार्यवाही करावी. राष्ट्रीय क्रिडा दिनाच्या उपक्रमांसाठी डिजिटल टूलकिट व अहवाल सादरीकरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सदर उपक्रम राबवितांना उपलब्ध पायाभूत सुविधा, स्थानिक परिस्थिती व हवामान यांचा विचार करून सुरक्षितता, स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार, सुलभता व सर्वसमावेशक सहभाग यांची आवश्यक व्यवस्था करण्यात यावी.
राष्ट्रीय क्रिडा दिन २०२६ हा उपक्रम विदयार्थ्यांमध्ये क्रिडाप्रेम, शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना व निरोगी जीवनशैली विकसित करण्यासाठी प्रभावीपणे राबविण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी : राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ दि २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत उपक्रम आयोजनाबाबत परिपत्रक डाउनलोड करा
यूथ फर्स्ट दिल्ली मॅरेथॉन 2026 नोंदणी लिंक
राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६: विशेष प्रश्नमंजुषा (Quiz)
मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand) मराठी माहिती

ऑलिम्पिकच्या अधिकृत संकेतस्थळावर (olympics.com) उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand) हे भारतीय हॉकीच्या सुवर्ण युगातील एक महान खेळाडू होते, ज्यांना क्रीडा विश्वात त्यांच्या चेंडूवरील अप्रतिम नियंत्रणामुळे ‘हॉकीचे जादूगार’ (Hockey Wizard) आणि ‘द मॅजिशियन’ म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद (सध्याचे प्रयागराज) येथे झाला असून त्यांचे मूळ नाव ध्यान सिंग असे होते.
ब्रिटिश भारतीय लष्करात भरती झाल्यानंतर त्यांनी हॉकी खेळायला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. दिवसभर सैन्यातील कर्तव्य बजावल्यानंतर ते रात्री चंद्राच्या प्रकाशात हॉकीचा सराव करत असत, ज्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ‘चंद’ (चंद्र) हे नाव दिले.
त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला सलग तीन सुवर्णपदके जिंकून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. १९२८ च्या ॲमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ५ सामन्यांत सर्वाधिक १४ गोल केले आणि भारतीय संघ अजिंक्य राहून सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
त्यानंतर १९३२ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये त्यांनी केवळ दोन सामन्यांत १२ गोल नोंदवले. पुढे १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि अंतिम सामन्यात यजमान जर्मनीचा ८-१ असा पराभव करून भारताला पुन्हा सुवर्णपदक मिळवून दिले.
बर्लिन ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात विरोधी संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केल्यामुळे त्यांचा एक दात तुटला होता, तरीही त्यांनी ३ गोल केले आणि मैदानावर आपला वेग वाढवण्यासाठी उत्तरार्धात ते चक्क अनवाणी (पायात बूट नसताना) खेळले होते. त्यांनी ऑलिम्पिकच्या ३ पर्वांमध्ये एकूण १२ सामने खेळले आणि त्यामध्ये तब्बल ३७ गोल नोंदवण्याचा पराक्रम केला.
१९२६ ते १९४८ या त्यांच्या प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्यांनी १८५ सामने खेळले आणि ४०० पेक्षा जास्त गोल करण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला.
३४ वर्षांच्या सेवेनंतर ते ऑगस्ट १९५६ मध्ये भारतीय लष्करातून लेफ्टनंट या पदावरून निवृत्त झाले (जरी भारतभर त्यांना आदराने ‘मेजर’ ध्यानचंद म्हटले जाते). त्याच वर्षी, म्हणजेच १९५६ मध्ये, भारत सरकारने त्यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित केले.
३ डिसेंबर १९७९ रोजी यकृताच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले, परंतु त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. त्यांच्या अतुलनीय कामगिरीच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस (२९ ऑगस्ट) भारतात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच, भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला आता त्यांच्या सन्मानार्थ ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे नाव देण्यात आले आहे.











