Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेश फॉर्म 2026-27: ऑनलाईन अर्ज, पात्रता, कागदपत्रे, परीक्षा व संपूर्ण माहिती

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश 2026-27 इयत्ता 6 वीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून, यासाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम आणि संपूर्ण माहिती पाहूया.

Jawahar Navodaya Vidyalaya Admission Form 2026-27 Class 6

HIGHLIGHTS

  • इयत्ता 6 वी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्जाची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे.
  • JNVST 2027 प्रवेश परीक्षा 28 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
  • जवाहर नवोदय विद्यालयात CBSE अभ्यासक्रमासह मोफत निवासी शिक्षण, भोजन, वसतिगृह, पुस्तके आणि गणवेश उपलब्ध करून दिला जातो.
  • प्रवेशासाठी 75 टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असून SC, ST, OBC, मुली आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही आरक्षण लागू आहे.
  • JNVST परीक्षा 100 गुणांची असून मानसिक क्षमता, पर्यावरण अभ्यास, गणित आणि भाषा चाचणी या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

Jawahar Navodaya Vidyalaya Admission Form 2026-27 Class 6: जवाहर नवोदय विद्यालय (JNV) मध्ये इयत्ता 6 वी मध्ये Admission घेण्यासाठी नवोदय विद्यालय समितीने शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता 6 वी प्रवेश प्रक्रिया परीक्षा (JNVST 2027) संदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार JNVST प्रवेश परीक्षा 28 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाले आहे.

देशातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षण, निवासी सुविधा, भोजन, पाठ्यपुस्तके, गणवेश आणि CBSE अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी काही महत्त्वाचे पात्रता निकष, वयोमर्यादा, कागदपत्रे आणि जिल्हानिहाय नियम लागू आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नियम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

जवाहर नवोदय विद्यालय माहिती पुस्तिका

या लेखामध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश 2026-27, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे, आरक्षणाचे नियम, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम, निकाल आणि प्रवेशाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती सोप्या मराठीत सविस्तर जाणून घेऊया.

Table of Contents

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया 2026-27

जवाहर नवोदय विद्यालय (Jawahar Navodaya Vidyalaya – JNV) ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या नवोदय विद्यालय समिती (Navodaya Vidyalaya Samiti) द्वारे संचालित निवासी शाळा आहे. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि मोफत शिक्षण मिळावे, या उद्देशाने देशातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. या शाळांमध्ये इयत्ता 6 वीमध्ये प्रवेश जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) द्वारे दिला जातो.

शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता 6 वी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत ऑनलाइन अर्ज भरून प्रवेश परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवेश पूर्णपणे गुणवत्ता (Merit) आणि शासनाच्या आरक्षण नियमांनुसार दिला जातो.

जवाहर नवोदय विद्यालय म्हणजे काय?

जवाहर नवोदय विद्यालय ही पूर्णपणे निवासी (Residential) आणि सहशिक्षण (Co-educational) पद्धतीची केंद्रीय शाळा आहे. या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना CBSE अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जाते. इयत्ता 8 वीपर्यंत मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषेत शिक्षण दिले जाते, तर त्यानंतर गणित आणि विज्ञान इंग्रजी माध्यमातून तसेच सामाजिक शास्त्र हिंदी माध्यमातून शिकवले जाते.

जवाहर नवोदय विद्यालयातील सुविधा

नवोदय विद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना अनेक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात.

  • गुणवत्तापूर्ण CBSE मोफत शिक्षण
  • मोफत निवासी वसतिगृह
  • मोफत भोजन व्यवस्था
  • मोफत पाठ्यपुस्तके
  • मोफत शालेय गणवेश
  • सुसज्ज विज्ञान व संगणक प्रयोगशाळा
  • ग्रंथालय सुविधा
  • क्रीडा साहित्य व खेळांचे प्रशिक्षण
  • NCC, Scouts & Guides आणि NSS सारख्या उपक्रमांमध्ये सहभाग
  • सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी
  • राष्ट्रीय एकात्मता वाढविण्यासाठी Migration Scheme ची सुविधा

जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्याचे फायदे

जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणे हे विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी मानले जाते. कारण येथे केवळ शिक्षणच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो.

  • उच्च दर्जाचे आणि मोफत शिक्षण
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील शिक्षणाचा खर्च कमी होतो
  • स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी भक्कम शैक्षणिक पाया तयार होतो
  • शिस्तबद्ध निवासी वातावरणामुळे व्यक्तिमत्त्व विकास होतो
  • क्रीडा, विज्ञान, सांस्कृतिक आणि नेतृत्व गुण विकसित होतात
  • देशातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांशी संवादातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढते
  • CBSE शिक्षणामुळे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षा आणि करिअरसाठी चांगली तयारी होते.

नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता | JNV Class 6 Admission 2026-27 Eligibility

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेशासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नवोदय विद्यालय समितीने निश्चित केलेले सर्व पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, जिल्हानिहाय प्रवेश नियम, ग्रामीण-शहरी निकष आणि NIOS विद्यार्थ्यांसाठीचे नियम यांची पूर्तता झाल्यासच अर्ज ग्राह्य धरला जाईल.

कोण अर्ज करू शकतो?

शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 5 वीमध्ये नियमित शिक्षण घेत असलेले विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. उमेदवार हा ज्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितो, त्या जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. काही विशेष परिस्थितीत शेजारच्या जिल्ह्यातील शाळेत शिक्षण घेत असल्यासही प्रवेशासाठी पात्रता लागू होऊ शकते, मात्र त्यासाठी प्रॉस्पेक्टसमधील अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचा जन्म 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 (दोन्ही तारखा धरून) या कालावधीत झालेला असावा. प्रवेशावेळी शासनमान्य जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ही वयोमर्यादा सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना समानपणे लागू आहे.

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता 5 वीचे शिक्षण मान्यताप्राप्त सरकारी, अनुदानित किंवा इतर मान्यताप्राप्त शाळेत घेतलेले असावे. तसेच इयत्ता 3 री, 4 थी आणि 5 वीचा संपूर्ण शैक्षणिक कालावधी नियमितपणे पूर्ण केलेला असावा. इयत्ता 5 वी पूर्वी उत्तीर्ण झालेला किंवा इयत्ता 5 वीची पुनरावृत्ती करणारा विद्यार्थी अर्जासाठी पात्र राहणार नाही. तसेच JNVST परीक्षा दुसऱ्यांदा देता येणार नाही.

जिल्हानिहाय प्रवेश नियम

जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेश पूर्णपणे जिल्हानिहाय (District Specific) दिला जातो. उमेदवाराने आपल्या राहत्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयासाठीच अर्ज करणे आवश्यक आहे. चुकीच्या जिल्ह्यासाठी अर्ज केल्यास, निवड झाल्यानंतरही उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. जर विद्यार्थी शेजारच्या जिल्ह्यातील शाळेत शिकत असेल, तर ती शाळा राहत्या ठिकाणापासून 10 किमीच्या परिघात असणे आवश्यक आहे आणि त्याची पडताळणी नवोदय विद्यालय समितीकडून केली जाईल.

ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांसाठी नियम

नवोदय विद्यालयात किमान 75 टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. ग्रामीण कोट्यात अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने इयत्ता 3 री, 4 थी आणि 5 वीचा संपूर्ण शैक्षणिक कालावधी ग्रामीण भागातील सरकारी, अनुदानित किंवा मान्यताप्राप्त शाळेत पूर्ण केलेला असावा. इयत्ता 3 री, 4 थी किंवा 5 वीमध्ये एका दिवसासाठीही शहरी भागातील शाळेत शिक्षण घेतल्यास संबंधित विद्यार्थी शहरी प्रवर्गात गणला जाईल.

NIOS विद्यार्थ्यांसाठी पात्रता

राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षण संस्था (NIOS) अंतर्गत ‘बी’ प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र आहेत. मात्र त्यांनी निर्धारित वयोमर्यादा पूर्ण केलेली असावी. निवड झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार ग्रामीण किंवा शहरी रहिवासी प्रमाणपत्र तसेच NIOS शी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

आरक्षणाचा नियम

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेश प्रक्रिया ही भारत सरकारच्या आरक्षण धोरणानुसार राबविण्यात येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याबरोबरच अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्ग (OBC), मुली आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही नियमानुसार आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. अंतिम प्रवेश हा JNVST मधील गुणवत्ता, आरक्षणाचे नियम आणि संबंधित जिल्ह्यातील उपलब्ध जागांनुसार दिला जातो.

ग्रामीण कोटा

जवाहर नवोदय विद्यालयातील किमान 75 टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. ग्रामीण कोट्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने इयत्ता 3 री, 4 थी आणि 5 वीचे संपूर्ण शिक्षण ग्रामीण भागातील मान्यताप्राप्त शाळेत पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. उर्वरित जागांवर ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.

SC (अनुसूचित जाती)

अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी संबंधित जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले जाते. मात्र हे आरक्षण राष्ट्रीय स्तरावर किमान 15 टक्क्यांपेक्षा कमी असणार नाही. प्रवेशावेळी सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले वैध जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

ST (अनुसूचित जमाती)

अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीही संबंधित जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू आहे. हे आरक्षण राष्ट्रीय स्तरावर किमान 7.5 टक्के राहील. ST प्रवर्गाचा लाभ घेण्यासाठी वैध जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

OBC (इतर मागासवर्ग)

इतर मागासवर्ग (OBC) विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या विद्यमान आरक्षण धोरणानुसार आरक्षणाचा लाभ दिला जातो. OBC प्रवर्गातील उमेदवारांनी केंद्रीय (Central) OBC प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. राज्य शासनाचे OBC प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.

मुलींसाठी आरक्षण

जवाहर नवोदय विद्यालयात किमान एकतृतीयांश (33%) जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक विद्यालयात मुलींचा सहभाग वाढावा आणि त्यांना गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षणाची संधी मिळावी, हा या आरक्षणाचा उद्देश आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरक्षण

दिव्यांग (Persons with Benchmark Disabilities – PwBD) विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या नियमांनुसार आरक्षण लागू आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी अर्ज करताना वैध दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच JNVST परीक्षेदरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांना 40 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जातो.

नवोदय विद्यालय प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरताना तसेच निवड झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारी अथवा प्रवेश रद्द होऊ शकतो.

ऑनलाइन अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • विद्यार्थ्याचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो (JPG स्वरूपात)
  • विद्यार्थ्याची स्वाक्षरी
  • पालक किंवा पालक प्रतिनिधीची स्वाक्षरी
  • आधार क्रमांक किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेला रहिवासी दाखला
  • सामाजिक प्रवर्गाचे प्रमाणपत्र (SC/ST/OBC), लागू असल्यास
  • दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • APAAR ID आणि PEN Number (असल्यास)
  • वैध मोबाईल क्रमांक
  • इयत्ता 5 वी शिकत असल्याची आवश्यक माहिती

ऑनलाइन अर्ज करताना फोटो, स्वाक्षऱ्या आणि इतर कागदपत्रे निर्धारित आकारात (JPG फॉरमॅट) अपलोड करणे आवश्यक आहे.

निवड झाल्यानंतर सादर करावयाची कागदपत्रे

JNVST परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील.

  • जन्मतारीख सिद्ध करणारे जन्म प्रमाणपत्र
  • जिल्हा रहिवासी प्रमाणपत्र
  • पात्रता सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे
  • इयत्ता 3 री, 4 थी आणि 5 वीचा शैक्षणिक तपशील व ग्रामीण/शहरी क्षेत्राचा दाखला (मुख्याध्यापकांकडून)
  • विद्यार्थ्याच्या आधार कार्डची प्रत
  • शाळा सोडल्याचा दाखला (Transfer Certificate – TC)
  • SC/ST/OBC प्रवर्गाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • केंद्रीय OBC प्रमाणपत्र (OBC विद्यार्थ्यांसाठी)
  • UDID कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • स्थलांतर (Migration) संदर्भातील हमीपत्र
  • NIOS विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अतिरिक्त प्रमाणपत्रे (लागू असल्यास)

नवोदय विद्यालय समितीकडून कागदपत्रांची सविस्तर पडताळणी केल्यानंतरच प्रवेश निश्चित केला जातो. कागदपत्रांमध्ये तफावत किंवा चुकीची माहिती आढळल्यास, निवड झाल्यानंतरही प्रवेश रद्द केला जाऊ शकतो.

JNVST 2027 परीक्षा पद्धत

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST 2027) ही वस्तुनिष्ठ (Objective Type) स्वरूपाची परीक्षा आहे. परीक्षेत विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता, गणितीय कौशल्य, पर्यावरण विषयाचे ज्ञान आणि भाषा आकलन क्षमता तपासली जाते. सर्व प्रश्न बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे असतात आणि प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले असतात. उमेदवारांनी स्वतंत्र OMR उत्तरपत्रिकेवर निळ्या किंवा काळ्या बॉलपेनने योग्य उत्तर चिन्हांकित करावे लागते. (अभ्यासक्रम विषयी सविस्तर माहिती)

jawahar navodaya vidyalaya class 6th question paper

परीक्षेचा कालावधी

JNVST 2027 परीक्षेचा एकूण कालावधी 2 तास (120 मिनिटे) आहे. परीक्षा सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 या वेळेत घेतली जाते. दिव्यांग विद्यार्थ्यांना अतिरिक्त 40 मिनिटांचा वेळ दिला जातो. परीक्षेदरम्यान कोणताही मध्यंतर (Break) नसतो.

एकूण प्रश्न

परीक्षेत एकूण 80 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. प्रश्नपत्रिकेचे तीन विभाग असतात.

विभागप्रश्नगुण
मानसिक क्षमता चाचणी (MAT) व पर्यावरण अभ्यास (EVS)4050
अंकगणित (Arithmetic)2025
भाषा चाचणी (Language Test)2025
एकूण80100

प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व विभागांचा समावेश असलेली एकच प्रश्नपत्रिका दिली जाते.

गुणपद्धती

JNVST 2027 परीक्षा एकूण 100 गुणांची असते. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1.25 गुण दिले जातात. चुकीचे उत्तर दिल्यास गुण वजा केले जात नाहीत. सर्व प्रश्न समान महत्त्वाचे असून अंतिम गुणवत्ता यादी एकूण गुणांच्या आधारे तयार केली जाते.

निगेटिव्ह मार्किंग आहे का?

नाही. JNVST 2027 परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणे विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

किमान पात्रता गुण किती?

JNVST 2027 मध्ये गुणवत्तायादीसाठी विचार केला जाण्यासाठी उमेदवाराने प्रत्येक विभागात किमान पात्रता गुण मिळवणे आवश्यक आहे.

  • मानसिक क्षमता चाचणी (MAT) व पर्यावरण अभ्यास (EVS) : किमान 14 गुण
  • अंकगणित (Arithmetic) : किमान 7 गुण
  • भाषा चाचणी (Language Test) : किमान 7 गुण

प्रत्येक विभागातील किमान पात्रता गुण पूर्ण करणे अनिवार्य असून त्यानंतरच अंतिम निवड प्रक्रियेसाठी उमेदवाराचा विचार केला जातो.

नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST 2027) मध्ये विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, आकलनशक्ती, गणितीय कौशल्य, पर्यावरणाविषयीचे ज्ञान आणि भाषा समजून घेण्याची क्षमता तपासली जाते. परीक्षेत एकूण चार प्रमुख विषयांचा समावेश असून अभ्यासक्रम इयत्ता 5 वीपर्यंतच्या स्तरावर आधारित आहे.

मानसिक क्षमता चाचणी (Mental Ability)

मानसिक क्षमता चाचणीमध्ये विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, निरीक्षण क्षमता, विचार करण्याची पद्धत आणि समस्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता तपासली जाते. या विभागात प्रामुख्याने आकृत्या आणि चित्रांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

या विभागातील प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत.

  • Pattern Completion
  • Figure Series Completion
  • Geometrical Figure Completion
  • Mirror Image आणि Water Image
  • Embedded Figure
  • अक्षरे व अंकांच्या नमुन्यांवरील प्रश्न

या विभागात भाषेचे ज्ञान आवश्यक नसून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेतली जाते.

पर्यावरण अभ्यास (EVS)

पर्यावरण अभ्यास (EVS) विभागात विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि पर्यावरण शिक्षणाशी संबंधित मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांच्या आजूबाजूच्या परिसराविषयीचे ज्ञान आणि सामान्य जागरूकता तपासण्यावर भर दिला जातो.

या विभागात खालील विषयांचा समावेश आहे.

  • नैसर्गिक पर्यावरण (नद्या, पर्वत, वनस्पती, प्राणी, जलचक्र, नैसर्गिक आपत्ती)
  • मानवी शरीर, अन्न व पोषण
  • स्वच्छता आणि आरोग्य
  • दैनंदिन जीवनातील विज्ञान
  • पाणी व वायू प्रदूषण
  • जल आणि मृदा संवर्धन
  • भारतातील राज्ये व राजधानी
  • राष्ट्रीय प्रतीके
  • सण-उत्सव
  • पिके, जंगले, ऋतू, वस्त्रे आणि तंतू
  • उताऱ्यावर आधारित प्रश्न

या विभागात एक उतारा दिला जातो आणि त्यावर आधारित पाच प्रश्न विचारले जातात.

गणित (Arithmetic)

गणित विभागात विद्यार्थ्यांची मूलभूत गणितीय संकल्पना समजून घेण्याची आणि त्यांचा वापर करण्याची क्षमता तपासली जाते. प्रश्न हे केवळ पाठांतरावर नव्हे तर संकल्पनांच्या आकलनावर आधारित असतात.

या विभागातील प्रमुख विषय पुढीलप्रमाणे आहेत.

  • संख्या पद्धती
  • बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार
  • गुणक आणि विभाजक
  • अपूर्णांक
  • लांबी, वजन, क्षमता, वेळ आणि पैशांची मोजमापे
  • एकक रूपांतरण
  • संख्यात्मक उदाहरणांचे सुलभीकरण
  • परिमिती आणि क्षेत्रफळ
  • कोन आणि दिशा
  • तक्ते, बार आलेख आणि चित्र आलेखाचे विश्लेषण

या विभागात विद्यार्थ्यांची गणितीय तर्कशक्ती आणि संकल्पना समजण्याची क्षमता तपासली जाते.

भाषा चाचणी

भाषा चाचणीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची वाचन आकलन (Reading Comprehension) क्षमता तपासणे हा आहे. या विभागात चार उतारे दिले जातात आणि प्रत्येक उताऱ्यावर आधारित पाच प्रश्न विचारले जातात.

या विभागात प्रामुख्याने खालील प्रकारचे प्रश्न असतात.

  • उताऱ्याचे आकलन
  • योग्य उत्तर निवडणे
  • समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द
  • शब्दसंग्रह
  • वाक्याचा अर्थ समजून घेणे
  • उताऱ्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न

या विभागात विद्यार्थ्यांनी उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे द्यायची असतात.

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम विषयी जाणून घ्या

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेशासाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातात. विद्यार्थी किंवा पालकांनी नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा. अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. चुकीची अथवा अपूर्ण माहिती आढळल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

स्टेप 1 : अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

सर्वप्रथम नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Click here for Registration for Class VI JNVST (2027-28) या लिंकवर क्लिक करा.

nvs Registration ONLINE Form

स्टेप 2 : नोंदणी (Registration) करा

nvs Registration Form Login

विद्यार्थ्याची मूलभूत माहिती, मोबाईल क्रमांक आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

स्टेप 3 : अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा

ऑनलाइन अर्जामध्ये खालील माहिती अचूक भरा.

  • विद्यार्थ्याचे पूर्ण नाव
  • जन्मतारीख
  • पालकांची माहिती
  • शाळेचे नाव
  • जिल्हा व राज्य
  • ग्रामीण किंवा शहरी क्षेत्राची माहिती
  • सामाजिक प्रवर्ग (General/SC/ST/OBC)
  • दिव्यांग असल्यास त्याची माहिती
  • APAAR ID आणि PEN Number (असल्यास)

स्टेप 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

अर्जामध्ये निर्धारित नमुन्यानुसार खालील कागदपत्रे अपलोड करा.

  • विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • विद्यार्थ्याची स्वाक्षरी
  • पालकांची स्वाक्षरी
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)

स्टेप 5 : अर्जाची माहिती तपासा

अर्जातील सर्व माहिती पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासा. विशेषतः जन्मतारीख, जिल्हा, शाळेची माहिती, प्रवर्ग आणि ग्रामीण/शहरी क्षेत्राची नोंद योग्य असल्याची खात्री करा.

स्टेप 6 : अर्ज अंतिम (Submit) करा

सर्व माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर अर्ज अंतिम स्वरूपात सादर (Submit) करा. अर्ज सादर झाल्यानंतर त्यामध्ये बदल करण्याची संधी उपलब्ध नसेल.

स्टेप 7 : अर्जाची प्रिंट सुरक्षित ठेवा

अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्यानंतर त्याची प्रिंट किंवा PDF प्रत डाउनलोड करून सुरक्षित जतन करा. प्रवेशपत्र डाउनलोड करणे, कागदपत्र पडताळणी आणि पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी ही प्रत उपयुक्त ठरेल.

अर्ज करताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या सूचना

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी आणि पालकांनी काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रे आढळल्यास अर्ज किंवा प्रवेश रद्द होऊ शकतो. त्यामुळे अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.

चुकीची माहिती भरू नका

ऑनलाइन अर्जामध्ये विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, पालकांची माहिती, शाळेचे नाव, जिल्हा, प्रवर्ग आणि इतर सर्व तपशील अचूक भरावेत. चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे पडताळणीत आढळल्यास निवड झाल्यानंतरही प्रवेश रद्द केला जाऊ शकतो.

OBC साठी केंद्रीय प्रमाणपत्र आवश्यक

OBC प्रवर्गातील उमेदवारांनी केंद्र शासनाच्या (Central OBC List) नियमानुसार वैध OBC प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. केवळ राज्य शासनाचे OBC प्रमाणपत्र असल्यास आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

Rural/Urban माहिती अचूक भरा

अर्जामध्ये ग्रामीण (Rural) किंवा शहरी (Urban) क्षेत्राची माहिती योग्य नमूद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण कोट्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने इयत्ता 3 री, 4 थी आणि 5 वीचे शिक्षण ग्रामीण भागातील पात्र शाळेत पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.

जिल्हा चुकीचा निवडल्यास अर्ज रद्द होऊ शकतो

प्रवेश हा संबंधित जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयासाठी दिला जातो. त्यामुळे अर्ज भरताना योग्य जिल्ह्याची निवड करणे आवश्यक आहे. चुकीचा जिल्हा निवडल्यास किंवा जिल्हा पात्रतेचे नियम पूर्ण न झाल्यास अर्ज अथवा प्रवेश रद्द होऊ शकतो.

अर्जाची माहिती अंतिम मानली जाईल

अर्ज अंतिम स्वरूपात (Final Submit) सादर केल्यानंतर त्यातील माहिती अंतिम मानली जाते. त्यामुळे अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व तपशील, कागदपत्रे आणि अपलोड केलेल्या फाइल्सची खात्री करूनच अंतिम सबमिट करावे.

पुनर्परीक्षा किंवा पुनर्मूल्यांकनाची सुविधा नाही

JNVST परीक्षेनंतर पुनर्परीक्षा, उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन किंवा गुणांची फेरतपासणी करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. नवोदय विद्यालय समितीने जाहीर केलेला निकाल अंतिम मानला जातो.

JNV Class 6 Admission 2026-27 महत्त्वाच्या तारखा

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेशासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रवेश प्रक्रियेतील सर्व महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीत अर्ज न केल्यास विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

JNV Class 6 Admission 2026-27 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 होती, मात्र आता 7 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ (Extended) देण्यात आली आहे. अंतिम मुदतीनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करावा.

प्रवेश परीक्षा (JNVST) तारीख

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST 2027) 28 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश दिला जाईल.

निकाल कधी जाहीर होणार?

JNVST 2027 चा निकाल मार्च 2027 अखेर जाहीर होण्याची अपेक्षा आहे. निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि प्रवेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

प्रवेशपत्र (Admit Card) कसे डाउनलोड करावे?

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST 2027) साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (Admit Card) परीक्षा सुरू होण्यापूर्वी नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. उमेदवारांनी वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची छापील प्रत (Printout) परीक्षा केंद्रावर सोबत नेणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील प्रक्रिया अवलंबा.

  • नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • JNVST Class VI Admit Card 2027 या लिंकवर क्लिक करा.
  • अर्ज क्रमांक (Registration Number) आणि जन्मतारीख किंवा आवश्यक लॉगिन माहिती प्रविष्ट करा.
  • Submit बटणावर क्लिक करा.
  • स्क्रीनवर प्रवेशपत्र दिसल्यानंतर ते डाउनलोड करा.
  • प्रवेशपत्राची छापील प्रत काढून सुरक्षित ठेवा.

प्रवेशपत्रावर विद्यार्थ्याचे नाव, रोल नंबर, परीक्षा केंद्राचा पत्ता, परीक्षा दिनांक, वेळ तसेच परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या सूचना नमूद असतील. परीक्षा केंद्रावर जाताना प्रवेशपत्रासोबत आवश्यक असल्यास वैध ओळखपत्रही सोबत ठेवावे. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी सकाळी 11:00 वाजेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असून उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.

निकाल कसा पाहायचा?

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST 2027) चा निकाल नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर केला जाईल. तसेच संबंधित जवाहर नवोदय विद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालय आणि इतर अधिसूचित कार्यालयांमध्येही निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध करून दिली जाईल.

निकाल पाहण्यासाठी खालील प्रक्रिया अवलंबा.

  • नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • JNVST Class 6 Result 2027 या लिंकवर क्लिक करा.
  • रोल नंबर किंवा आवश्यक लॉगिन माहिती प्रविष्ट करा.
  • Submit बटणावर क्लिक करा.
  • स्क्रीनवर विद्यार्थ्याचा निकाल प्रदर्शित होईल.
  • भविष्यातील प्रवेश प्रक्रियेसाठी निकालाची प्रत डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवा.

निकालात विद्यार्थ्याचे नाव, रोल नंबर, निवड झाल्याची स्थिती (Selection Status) आणि इतर आवश्यक माहिती नमूद असेल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी निश्चित मुदतीत कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी यशस्वी झाल्यानंतरच प्रवेश निश्चित केला जाईल.

निवड झाल्यानंतर पुढील प्रक्रिया

JNVST 2027 मध्ये निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिला जात नाही. प्रवेश निश्चित करण्यापूर्वी नवोदय विद्यालय समितीकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाते. सर्व अटी व पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच प्रवेश अंतिम केला जातो.

कागदपत्र पडताळणी

निकाल जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित जवाहर नवोदय विद्यालयात मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. या वेळी जन्म प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, इयत्ता 5 वीचे शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास) तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाते. अर्जामधील माहिती आणि मूळ कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.

प्रवेश निश्चिती

कागदपत्रांची पडताळणी यशस्वी झाल्यानंतरच विद्यार्थ्याचा प्रवेश अंतिम केला जातो. निवड झाल्यानंतरही पात्रता निकष पूर्ण न झाल्यास किंवा चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्याचा अधिकार नवोदय विद्यालय समितीकडे राहील.

शाळा बदलता येते का?

सामान्यतः विद्यार्थ्याला ज्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड करण्यात आली आहे, त्याच विद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. प्रवेशानंतर स्वतःच्या इच्छेनुसार दुसऱ्या जिल्ह्यातील किंवा दुसऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात शाळा बदलण्याची परवानगी दिली जात नाही. प्रवेश हा संबंधित जिल्हा आणि उपलब्ध जागांच्या आधारे दिला जात असल्याने अर्ज करताना योग्य जिल्ह्याची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

स्थलांतर (Migration Scheme)

जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी Migration Scheme राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत इयत्ता 9 वीमध्ये ठरावीक संख्येने विद्यार्थ्यांचे एका राज्यातील नवोदय विद्यालयातून दुसऱ्या राज्यातील नवोदय विद्यालयात शैक्षणिक स्थलांतर केले जाते. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांची ओळख होते तसेच राष्ट्रीय ऐक्याची भावना अधिक दृढ होते. ही योजना इयत्ता 6 वी प्रवेश प्रक्रियेचा भाग नसून पुढील शैक्षणिक टप्प्यावर लागू केली जाते.

महत्त्वाच्या लिंक

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेश 2026-27 संदर्भातील महत्त्वाच्या अधिकृत लिंक खाली दिल्या आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना आणि माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावा.

सेवालिंक
नवोदय विद्यालय समितीचे अधिकृत संकेतस्थळhttps://cbseitms.rcil.gov.in/nvs/
ऑनलाइन अर्ज (JNV Class 6 Admission 2027)ऑनलाईन अर्ज नोंदणी
JNV Class 6th Form Prospectus PDFमाहिती पुस्तिका
Previous Year Question Bookletमागील वर्षीची प्रश्नपत्रिका

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

नवोदय विद्यालय प्रवेश 2026-27 साठी अर्जाची शेवटची तारीख कोणती?

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2026 आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वीच अर्ज सादर करावा.

इयत्ता 6 वी प्रवेशासाठी वयोमर्यादा किती आहे?

JNVST 2027 साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 (दोन्ही तारखा धरून) या कालावधीत झालेला असावा.

नवोदय परीक्षेचे स्वरूप काय आहे?

JNVST ही बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची लेखी परीक्षा आहे. परीक्षेत मानसिक क्षमता, पर्यावरण अभ्यास, गणित आणि भाषा चाचणी या विषयांवरील प्रश्न विचारले जातात. एकूण परीक्षा 100 गुणांची असते.

इयत्ता सहावीच्या नवोदय परीक्षेत किती गुण आवश्यक आहेत?

JNVST मध्ये प्रत्येक विभागासाठी किमान पात्रता गुण निश्चित करण्यात आले आहेत. अंतिम निवड मात्र उमेदवाराचे गुण, आरक्षण नियम आणि संबंधित जिल्ह्यातील उपलब्ध जागांच्या आधारे केली जाते.

नवोदय परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रमात मानसिक क्षमता चाचणी (Mental Ability), पर्यावरण अभ्यास (EVS), गणित (Arithmetic) आणि भाषा चाचणी (Language Test) या विषयांचा समावेश आहे. अभ्यासक्रम इयत्ता 5 वीच्या स्तरावर आधारित असतो.

JNVST परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे का?

नाही. JNVST परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी कोणतेही गुण वजा केले जात नाहीत. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणे विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

नवोदय विद्यालयात शिक्षण पूर्णपणे मोफत आहे का?

होय. जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, निवासी वसतिगृह, भोजन, पाठ्यपुस्तके, गणवेश आणि इतर अनेक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी कोण अर्ज करू शकतो?

शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 5 वीमध्ये नियमित शिक्षण घेत असलेले आणि पात्रता निकष पूर्ण करणारे विद्यार्थी JNVST साठी अर्ज करू शकतात.

नवोदय विद्यालय प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

ऑनलाइन अर्जासाठी विद्यार्थ्याचा फोटो, स्वाक्षरी, पालकांची स्वाक्षरी, आधार क्रमांक, आवश्यक असल्यास जात प्रमाणपत्र आणि दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाते.

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा कधी होणार?

JNVST 2027 परीक्षा 28 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

नवोदय विद्यालयाचा निकाल कसा पाहायचा?

निकाल नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर केला जाईल. तसेच संबंधित जवाहर नवोदय विद्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयातही निवड यादी उपलब्ध असेल.

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आरक्षण आहे का?

होय. जवाहर नवोदय विद्यालयातील किमान 75 टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. यासाठी ग्रामीण भागातील शाळेत शिक्षण घेतल्याची अट पूर्ण करावी लागते.

OBC विद्यार्थ्यांसाठी कोणते प्रमाणपत्र आवश्यक आहे?

OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाचे (Central OBC) वैध प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. केवळ राज्य शासनाचे OBC प्रमाणपत्र आरक्षणासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.

JNVST साठी एकापेक्षा अधिक वेळा अर्ज करता येतो का?

नाही. इयत्ता 6 वीसाठी JNVST परीक्षा केवळ एकदाच देता येते. त्याच प्रवेशासाठी पुन्हा अर्ज किंवा पुनर्परीक्षेची परवानगी नाही.

निवड झाल्यानंतर पुढे काय करावे?

निवड झाल्यानंतर संबंधित जवाहर नवोदय विद्यालयात आवश्यक मूळ कागदपत्रे सादर करून पडताळणी पूर्ण करावी लागते. सर्व कागदपत्रे योग्य आढळल्यानंतरच विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित केला जातो.

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment