Educational Material Kit Yojana 2026 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत आणि सक्रिय (जिवंत) बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना ‘मूलभूत वस्तू संच सहाय्य योजना’ अंतर्गत शैक्षणिक साहित्याचा संच (Educational Material MBOCWW Kit) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने 30 ऑक्टोबर 2026 रोजी शासन निर्णय जारी करून प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे.
या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या एकूण 22 प्रकारच्या वस्तूंचा संच देण्यात येणार आहे. वस्तू निवड समितीने विविध शैक्षणिक साहित्य संचांचा अभ्यास करून या वस्तू निश्चित केल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या 11 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. आता राज्य शासनानेही त्यास अधिकृत मंजुरी दिली आहे.
22 प्रकारच्या वस्तूंचा संच यादी | Educational Material Kit List
मूलभूत वस्तू संच सहाय्य योजना अंतर्गत शैक्षणिक संचामध्ये पाण्याची बाटली, गरम व थंड पाण्यासाठी थर्मास, टिफिन बॉक्स, छत्री, रेनकोट, परीक्षेसाठी पॅड, 18 लॉंग बुक, 8 ड्रॉइंग बुक, बॉलपेन बॉक्स, दोन पेन्सिल बॉक्स, भूमितीचा कंपास, दोन ऑईल पेस्टल्स, पोस्टर कलर, ब्रश संच, दोन प्लास्टिक पट्ट्या, सोलर लॅम्प, कॅल्क्युलेटर, फोल्डिंग अभ्यास टेबल, दोन मार्करसह व्हाईट बोर्ड, गजराचे घड्याळ, शाळेची बॅग आणि किट बॅग अशा वस्तूंचा समावेश आहे. या संचामध्ये एकूण 49 नग वस्तू विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या योजनेचा लाभ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत आणि सक्रिय असलेल्या बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना मिळणार आहे. संबंधित पाल्य इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असणे आवश्यक आहे. म्हणजेच या योजनेचा लाभ सर्व नोंदणीकृत कामगारांच्या पाल्यांना सरसकट मिळणार नसून, शासन निर्णयात नमूद केलेल्या पात्रतेनुसारच दिला जाणार आहे.
या योजनेसाठी लागणारा खर्च महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जमा असलेल्या उपकर निधीतून भागविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
बांधकाम कामगारांच्या मुलांना शालेय शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजांना आर्थिक हातभार लागावा, या दृष्टीने शासनाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. विशेषतः पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तू एकाच संचामध्ये मिळणार असल्याने पालकांना शैक्षणिक साहित्य (Educational Material Kit) खरेदीचा खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते.
अधिक माहितीसाठी शासन निर्णय व अधिकृत वेबसाईट लिंक
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांच्या इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिल्या दोन पाल्यांना मुलभूत वस्तू संच सहाय्य योजना या योजनेस प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजीचा शासन निर्णय डाउनलोड करा
- बांधकाम कामगार अधिकृत वेबसाईट : https://mahabocw.in/












