Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

जिल्हा परिषद शाळांचा होणार दर्जेदार विकास; ‘नवीन वर्षात नवी शाळा’ अभियान

ZP Schools Development New Year New School

ZP Schools Development New Year New School: जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात यावा. पुढील दोन वर्षांत जिल्ह्यातील ५०० शाळांचा दर्जेदार विकास करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

नवीन वर्षात नवी शाळा’ ही संकल्पना घेऊन अभियान स्वरूपात काम करावे आणि जालना जिल्ह्यातील विकसित होणाऱ्या शाळांनी राज्यातील तसेच इतर राज्यांतील शाळांसाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत जालना जिल्हा परिषद शाळांच्या विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, मनपा आयुक्त अंजली शर्मा यांच्यासह विविध अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.

यापूर्वी १ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीतही पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषद शाळांच्या विकासाचा आढावा घेतला होता. त्यावेळी जिल्ह्यातील शाळांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या अहवालाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत पालकमंत्र्यांनी शाळांच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

शाळांच्या विकासासाठी निधीचा काटेकोर वापर

शाळा आणि अंगणवाड्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी नियोजनबद्ध, काटेकोोर आणि परिणामकारक पद्धतीने खर्च करावा, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच विकासकामांचा दर्जा उत्तम राहील, याचीही काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. निधी उपलब्ध असूनही कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, यावर त्यांनी भर दिला.

आदर्श शाळेची संकल्पना प्रत्यक्षात आणणार

जिल्ह्यातील शाळांचा विकास करताना आदर्श शाळेची संकल्पना डोळ्यासमोर ठेवावी. शाळांची आकर्षक रंगरंगोटी, स्वच्छ व सुंदर परिसर, आवश्यक पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांना उपयुक्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

जालना जिल्ह्यात विकसित होणाऱ्या या आदर्श शाळांचे अनुकरण राज्यातील तसेच इतर राज्यांतील शाळांनी करावे, अशा गुणवत्तेचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

‘नवीन वर्षात नवी शाळा’ अभियान

‘नवीन वर्षात नवी शाळा’ ही संकल्पना घेऊन संबंधित यंत्रणांनी शाळांच्या विकासाचे काम अभियान स्वरूपात हाती घ्यावे. पुढील दोन वर्षांत ५०० शाळांचा दर्जेदार विकास करण्यासाठी ठोस नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

शाळांच्या विकासकामांचा पुढील आढावा घेण्यासाठी आपण स्वतः जालना येथे बैठक घेणार असल्याचेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

नावीन्यपूर्ण योजनांचाही आढावा

बैठकीत पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात नावीन्यपूर्ण योजनांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचाही आढावा घेतला. या योजनांसाठी उपलब्ध असलेला निधी निर्धारित वेळेत खर्च करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मंजूर विकासकामांना कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. सर्व कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment