Poshan Recipe Competition 2026 : टीएचआर पौष्टिक पाककृती (THR Nutritious Recipes) तयार करण्याच्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये मुंबईतील अंगणवाडी सेविका प्रतिभा राहुल भालेराव आणि समुदायातील माता दीपाली संदीप तांबे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेचा संपूर्ण निकाल सविस्तर पाहूया.

बालकांचे आरोग्य, योग्य आहार आणि कुपोषण प्रतिबंध यासाठी अंगणवाडी केंद्रांमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. याच उद्देशाने पोषण माह २०२६ निमित्त के कॉर्प चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे ‘पोषण रसोई स्पर्धे’चे (Poshan Rasoi Competition 2026) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अंगणवाडी सेविका आणि समुदायातील मातांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. स्थानिक खाद्यपदार्थांचा वापर करून कमी खर्चात पौष्टिक आहार तयार करण्याचा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला.
पोषण रसोई स्पर्धेत मुंबईच्या संघाला प्रथम क्रमांक

मुंबईतील घाटकोपर येथील अंगणवाडी सेविका प्रतिभा राहुल भालेराव आणि समुदायातील माता दीपाली संदीप तांबे यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी पूरक पोषण आहाराचा (Take Home Ration – THR) वापर करून विविध पौष्टिक पदार्थांची थाळी तयार केली होती.
या थाळीमध्ये THR खिचडी, THR पराठा, शेवग्याच्या पानांची चटणी, मिश्र भाज्यांचा चाट आणि टीएचआर लाडू यांचा समावेश होता. या पाककृतींमधून उपलब्ध अन्नपदार्थांचा योग्य वापर करून चविष्ट आणि पौष्टिक आहार कसा तयार करता येतो, हे त्यांनी दाखवून दिले.

या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील यमुना सुरेश मिसाळ आणि प्रमिला सुभाष मिसाळ यांनी द्वितीय क्रमांक, तर गडचिरोली जिल्ह्यातील कविता रामू दुगा आणि पूजा रंजीत नारोटे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
हे ही वाचा: अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळी बोनस (भाऊबीज भेट) मंजूर
टीएचआर म्हणजे काय? (What is Take Home Ration?)
THR म्हणजे ‘टेक होम रेशन’ (Take Home Ration) एकात्मिक बाल विकास सेवा योजना (Integrated Child Development Services – ICDS) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पूरक पोषण आहार उपलब्ध करून देण्याची ही एक व्यवस्था आहे.
या पोषण आहाराचा योग्य वापर करून घरच्या घरी विविध पदार्थ तयार करता येतात. खिचडी, पराठा, लाडू, लापशी आणि हलवा यांसारख्या पाककृतींमुळे आहारात विविधता आणता येते. मात्र, पाककृती तयार करताना स्वच्छता, योग्य प्रमाण आणि पोषणमूल्ये यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
पाच प्रकल्प क्षेत्रांतील 175 संघांचा सहभाग
‘पहिले १,००० दिवस’ (First 1000 Days) या कार्यक्रमांतर्गत आयोजित या स्पर्धेत पालघर, नंदुरबार, गडचिरोली, कर्जत आणि मुंबई या पाच प्रकल्प क्षेत्रांतील सुमारे 350 सहभागी 175 संघांच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
स्पर्धेत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या आणि समुदायातील मातांनी सहभाग घेतला. त्यांनी टीएचआरचा वापर करून लाडू, पराठा, रवा वडी, लापशी, खिचडी, सुकडी आणि हलवा असे विविध पदार्थ तयार केले.
प्रत्येक संघाने पाककृतीसाठी लागणारे साहित्य, कृती आणि त्यातून मिळणाऱ्या पोषणमूल्यांची माहिती सादर केली. पदार्थांची पौष्टिकता, टीएचआरचा योग्य वापर, स्वच्छता, कमी खर्च, कुटुंबातील सदस्यांना पदार्थ स्वीकारार्ह वाटण्याची शक्यता आणि घरच्या घरी पाककृती पुन्हा तयार करता येणे, अशा विविध निकषांवर परीक्षण करण्यात आले.
अंतिम फेरीत 14 संघांचा सहभाग
स्पर्धेची पहिली फेरी सप्टेंबर २०२६ मध्ये पाचही प्रकल्प क्षेत्रांत घेण्यात आली. या फेरीतील निवडक संघांना जिल्हास्तरीय स्पर्धेत आणि त्यानंतर अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळाली होती.
स्पर्धेची अंतिम फेरी ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथे पार पडली. या फेरीत १४ संघ सहभागी झाले. प्रत्येक संघाला के हॉस्पिटॅलिटी कॉर्पमधील एका शेफचे मार्गदर्शन मिळाले. पाककृतींचा मूळ पोषणमूल्यांचा उद्देश कायम ठेवून त्यांची चव आणि पौष्टिकता वाढवण्यावर भर देण्यात आला. स्पर्धकांना पदार्थ तयार करण्यासाठी एक तासाचा वेळ देण्यात आला होता.
अंतिम फेरीच्या परीक्षक मंडळात आयसीडीएस महाराष्ट्राच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, पोषणतज्ज्ञ व शैक्षणिक सल्लागार डॉ. अनुराधा मित्रा आणि ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेसचे कॉर्पोरेट शेफ राजेश शेट्टी यांचा समावेश होता.
अंगणवाडी सेविका आणि मातांसाठी उपयुक्त उपक्रम
बालकांच्या वाढीसाठी संतुलित आहार महत्त्वाचा असतो. विशेषतः गर्भावस्थेपासून बालकाच्या आयुष्यातील पहिल्या दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीत पोषणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते.
अंगणवाडी सेविका आणि समुदायातील माता यांना पोषणविषयक उपक्रमात सहभागी करून घेणे, पूरक पोषण आहाराचा योग्य वापर वाढवणे आणि स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देणे, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता.
या उपक्रमातून निवडक पाककृतींचे संकलन करून टीएचआर पाककृती पुस्तिका (THR Recipe Book) तयार करण्यात येणार आहे. ही पुस्तिका अंगणवाडी केंद्रांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि कुटुंबांना विविध पौष्टिक पाककृतींची माहिती मिळण्यास मदत होईल.
के कॉर्प चॅरिटेबल फाउंडेशनने एकात्मिक बाल विकास सेवा योजना, आरोग्य विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, ग्रामपंचायती आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला.
पोषण रसोई स्पर्धेमुळे पूरक पोषण आहाराचा सर्जनशील वापर, स्थानिक अन्नपदार्थांचे महत्त्व आणि कुटुंबाच्या आहारातील पोषण याबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदत झाली आहे.










