Kendrapramukh Payyabhut Prashikshan TNA 2026: महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये कार्यरत शिक्षकांमधून समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 अंतर्गत पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर यांनी नव नियुक्त केंद्रप्रमुखांच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या (Training Need Analysis – TNA) अनुषंगाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. या लेखात याबाबतची सविस्तर माहिती व गुगल फॉर्म लिंक दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५” या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षा दि. ०३ फेब्रुवारी २०२६ व दि. ०४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने तीन सत्रांत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल दि. १३ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
केंद्रप्रमुखांना त्यांच्या पदाच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडता याव्यात, तसेच त्यांच्यामध्ये प्रशासकीय कौशल्ये, शैक्षणिक नेतृत्व आणि तांत्रिक कौशल्ये विकसित व्हावीत, या उद्देशाने राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी आवश्यक घटक निश्चित करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण गरजांचा अभ्यास (Training Need Analysis – TNA) करण्यात येत आहे.
केंद्रप्रमुखांची भूमिका आणि जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यासाठी कोणकोणत्या प्रशिक्षण घटकांची आवश्यकता आहे, याबाबत विविध स्तरांवरील शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. त्यानुसार सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता, प्रशासन अधिकारी, शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य तसेच पर्यवेक्षकीय यंत्रणेतील सर्व सदस्यांनी निर्धारित गुगल फॉर्म भरून आपले अभिप्राय नोंदवायचे आहेत.
TNA प्रशिक्षणात समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित २४ घटक
गुगल फॉर्ममध्ये प्रशिक्षणासाठी एकूण २४ घटकांचा समावेश करण्यात आला असून, प्रत्येक घटकाबाबत ‘होय’ किंवा ‘नाही’ असा पर्याय निवडून आपले मत नोंदवायचे आहे.
यामध्ये पदनिहाय कर्तव्ये व जबाबदाऱ्या, शालेय शिक्षणातील प्रशासकीय संरचना व विविध शैक्षणिक संस्था, केंद्र व राज्य शासनाची शैक्षणिक पोर्टल्स व ॲप्स, शैक्षणिक प्रशासन व शालेय नेतृत्व, शालेय शिक्षणाशी संबंधित धोरणे व कायदे, अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रणाली, गुणवत्ता मूल्यांकन व शालेय निरीक्षण या घटकांचा समावेश आहे.
याशिवाय प्रेरणा, संवाद व संघटन कौशल्ये, सेवा नोंदी व दस्तऐवज व्यवस्थापन, माहितीचा अधिकार व जबाबदाऱ्या, ताणतणाव व्यवस्थापन, मानव संसाधन व्यवस्थापन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी, ई-गव्हर्नन्स प्रक्रिया, नियोजन, व्यवस्थापन व सनियंत्रण, एकविसाव्या शतकातील कौशल्ये, अध्यापनशास्त्रीय कौशल्ये, वर्ग निरीक्षण व अभिप्राय, मूल्यमापन कौशल्ये, वित्तीय नियमावली व आर्थिक अभिलेखे, माहितीचे विश्लेषण, विद्यार्थी लाभाच्या योजना व शिष्यवृत्ती, शिक्षण परिषदांचे प्रभावी आयोजन, शैक्षणिक व अशैक्षणिक कामाचा समतोल आणि निपुण भारत अभियान या विषयांचाही समावेश करण्यात आला आहे.

गुगल फॉर्ममध्ये कोणती माहिती भरावी?
संबंधित व्यक्तींनी गुगल फॉर्ममध्ये आपला ई-मेल आयडी, संपूर्ण नाव, पदनाम, संपर्क क्रमांक (WhatsApp), कार्यालयाचे नाव व पत्ता आणि जिल्हा ही प्राथमिक माहिती भरायची आहे.
त्यानंतर प्रशिक्षणात समाविष्ट करावयाच्या वरील २४ घटकांबाबत ‘होय’ किंवा ‘नाही’ या पर्यायाद्वारे आपले अभिप्राय नोंदवायचे आहेत. तसेच नमूद केलेल्या घटकांव्यतिरिक्त आणखी कोणत्या विषयांचा प्रशिक्षणात समावेश असावा, याबाबत सूचना देण्यासाठी स्वतंत्र प्रश्नही विचारण्यात आला आहे.
अभिप्राय सादर करण्याची अंतिम मुदत : १५ नोव्हेंबर २०२६
गुगल फॉर्म लिंक :
https://forms.gle/2Bfsn6vBNaXNxvDB8
राज्यातील सर्व संबंधित शिक्षक, अधिकारी व पर्यवेक्षकीय यंत्रणेतील सदस्यांनी निर्धारित मुदतीत गुगल फॉर्म भरून आपले अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण गरजांच्या अभ्यासातून केंद्रप्रमुखांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजापासून शैक्षणिक नेतृत्वापर्यंतच्या विविध जबाबदाऱ्यांसाठी आवश्यक प्रशिक्षण घटक निश्चित करण्यास मदत होणार आहे. परिणामी केंद्रप्रमुखांची कार्यक्षमता वाढविणे, शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करणे आणि शालेय शिक्षण व्यवस्थेतील पर्यवेक्षण अधिक प्रभावी बनविणे शक्य होईल.
अधिक माहितीसाठी केंद्रप्रमुख पायाभूत प्रशिक्षणासाठी (Kendrapramukh Payyabhut Prashikshan TNA) प्रशिक्षण गरजांचा अभ्यास (Training Need Analysis – TNA) करण्याचे निर्देश संदर्भातील खालील परिपत्रक वाचा











