Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

दुष्काळाच्या संकटात शैक्षणिक आधार, सर्वसमावेशक कृती आराखडा जाहीर

Dushkal Shaikshanik Kruti Arakhada

Dushkal Shaikshanik Kruti Arakhada 2026 : राज्यातील 305 तालुक्यांमध्ये नुकताच दुष्काळ जाहीर झाला असून, याच पार्श्वभूमीवर आता दुष्काळाच्या संकटात शैक्षणिक आधार देण्यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि सामान्य नागरिक यांनी पार पाडावयाची भूमिका व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या लेखात विद्यार्थ्यांचे शिक्षण, मानसिक आरोग्य आणि शैक्षणिक प्रगती अबाधित राखण्यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा याबाबतची सविस्तर माहिती व PDF डाउनलोड लिंक दिलेली आहे.

दुष्काळाच्या संकटात शैक्षणिक आधार घोषवाक्य

  • “संकट कितीही मोठे असले, तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट थांबता कामा नये!”
  • “पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवू या. शिक्षणाचा प्रत्येक दिवस सार्थकी लावूया!”

दुष्काळाच्या संकटात शिक्षणाची जबाबदारी

Dushkal Shaikshanik Kruti Arakhada 2026

जालना जिल्हा हा महाराष्ट्रातील शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि निसर्गाधारित जीवनपद्धतीशी घट्ट जोडलेला प्रदेश आहे. पावसाचे अनियमित वितरण, दीर्घकालीन पर्जन्यमानातील तूट, वाढते तापमान आणि भूजल साठ्यावरील ताण यांमुळे या प्रदेशांना वारंवार पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागतो.

अल निनो (EL Nino) च्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास किंवा त्याचे वितरण अनियमित झाल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीचे नुकसान, चाऱ्याची कमतरता, रोजगाराच्या संधीमधील घट आणि ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

अशा परिस्थितीत सर्वाधिक काळजी घेण्याची गरज असते ती बालकांची आणि विद्यार्थ्यांची. अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना स्थलांतर करावे लागू शकते. काही विद्यार्थ्यांना घरकाम, शेतीकाम किंवा लहान भावंडांची जबाबदारी सांभाळावी लागू शकते. आर्थिक अडचणींमुळे शैक्षणिक साहित्य खरेदी करणे, नियमित शाळेत जाणे, खासगी शिकवणी (Classes) घेणे किंवा पुढील शिक्षण सुरू ठेवणे कठीण होऊ शकते.

पाणीटंचाई, उष्णतेचा त्रास, कुटुंबातील आर्थिक चिंता आणि भविष्यातील अनिश्चितता यांमुळे विद्यार्थ्याच्या एकाग्रतेवर, उपस्थितीवर, अभ्यासाच्या सवयींवर आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच दुष्काळाच्या परिस्थितीत शिक्षण विभागाची जबाबदारी केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापुरती मर्यादित राहू शकत नाही. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवणे, त्यांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देणे, मानसिक आधार देणे, शाळाबाह्य होण्याचा धोका टाळणे आणि कुटुंब व समाजाच्या सहकार्याने त्यांची शैक्षणिक प्रगती टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे.

दुष्काळाच्या संकटात प्रत्येक शाळेने शैक्षणिक आधार केंद्र म्हणून काम करावे आणि प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संरक्षक म्हणून भूमिका बजावण्याच्या सूचना जालना जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्या आहे.

ऐतिहासिक प्रेरणा : जलव्यवस्थापनातून नियोजनाचा संदेश

छत्रपती शिवाजी महाराजांनी गड-किल्ल्यांवरील पाण्याचे नियोजन, जलसाठ्यांची व्यवस्था आणि उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा गरजेनुसार वापर यांना महत्त्व दिले. त्यांच्या कार्यातून संकटाच्या काळात दूरदृष्टी, नियोजन, साधनसंपत्तीचे संरक्षण आणि लोकहित यांचे महत्त्व अधोरेखित होते.

महात्मा जोतीराव फुले यांनी दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी आणि सामाजिक विषमता यांविषयी संवेदनशील भूमिका घेतली. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या काळात त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी केलेल्या मदतकार्याचा उल्लेख त्यांच्या सामाजिक कार्याच्या संदर्भात आढळतो. या ऐतिहासिक प्रेरणांमधून आजच्या शिक्षण व्यवस्थेने तीन महत्त्वाचे संदेश स्वीकारावेत.

  1. संकट येण्याची वाट न पाहता संभाव्य संकटाचा पूर्वानुमान घेऊन नियोजन करावे.
  2. उपलब्ध साधनसंपत्तीचा काटकसरीने आणि न्याय्य पद्धतीने वापर करावा.
  3. संकटाचा सर्वाधिक परिणाम होणाऱ्या वंचित, गरीब आणि दुर्बल घटकांना प्राधान्याने मदत करावी.

दुष्काळाच्या काळात याच तत्त्वांचा शिक्षण क्षेत्रात उपयोग करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे संरक्षण करता येईल.

शैक्षणिक आधार या संकल्पनेचा अर्थ आणि उद्दिष्टे

दुष्काळाच्या काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देणे म्हणजे केवळ त्यांना अभ्यास करण्यास सांगणे नव्हे. त्यांच्या शिक्षणात निर्माण होणारे अडथळे ओळखून ते दूर करण्यासाठी शाळा, कुटुंब आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणे होय.

प्रमुख उद्दिष्टे

१. दुष्काळामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ न देणे.

२. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती आणि अध्ययनातील सातत्य टिकवून ठेवणे.

३. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, स्थलांतरित, दिव्यांग आणि इतर जोखमीतील विद्यार्थ्यांना विशेष मदत करणे.

४. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि आत्मविश्वास जपणे.

५. शाळांमध्ये पाणीबचत, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जपणुकीची संस्कृती विकसित करणे.

६. शाळा, शिक्षक, पालक, ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण करणे.

७. शाळाबाह्य होण्याचा धोका असलेल्या विद्यार्थ्यांची वेळेवर ओळख करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.

८. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील उणिवा ओळखून त्यांची भरपाई करण्यासाठी पूरक अध्ययनाची व्यवस्था करणे.

९. बालमजुरी, बालविवाह, बालकांकडून धोकादायक कामे करून घेणे आणि शिक्षणापासून वंचित राहणे यांसारख्या धोक्यांना प्रतिबंध करणे.

१०. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांना आशावादी, संवेदनशील, स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रोत्साहित करणे.

भाग पहिला – मुख्याध्यापकांची भूमिका आणि कर्तव्ये

दुष्काळाच्या काळात मुख्याध्यापकांनी शाळेचे नेतृत्व केवळ प्रशासकीय पातळीवर न करता शैक्षणिक, सामाजिक आणि भावनिक आधार देणारे नेतृत्व म्हणून करणे अपेक्षित आहे.

शाळास्तरीय दुष्काळपूर्वतयारी

१. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची कौटुंबिक परिस्थिती, पाणीटंचाईची तीव्रता, पालकांचे स्थलांतर, आर्थिक अडचणी आणि शैक्षणिक गरजा यांचा आढावा घ्यावा.

२. नियमित उपस्थिती कमी होण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार करावी.

३. शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत दुष्काळाच्या संभाव्य परिणामांवर चर्चा करून कृती आराखडा निश्चित करावा.

४. शाळेतील पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहे आणि हात धुण्याच्या सुविधांची तपासणी करावी.

५. पाण्याची कमतरता असल्यास स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून सुरक्षित पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करावेत.

शैक्षणिक सातत्याचे नियोजन

१. दुष्काळामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी झाली तरी त्यांच्या अध्ययनाचे नुकसान कमीत कमी होईल, असे नियोजन करावे.

२. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तींचा आढावा घेऊन महत्त्वाच्या संकल्पनांना प्राधान्य द्यावे.

३. अध्ययनात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूरक अध्यापन आणि उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन करावे.

४. शाळेच्या वेळा, सुट्ट्या किंवा अध्यापन पद्धतींबाबत कोणताही बदल आवश्यक झाल्यास सक्षम प्राधिकरणाच्या सूचनांचे पालन करावे. उष्णतेच्या लाटेत किंवा पाणीटंचाईत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

५. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात त्यांच्या प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीचा संवेदनशीलतेने विचार करावा; मात्र त्यांच्या अध्ययनातील उणिवा दुर्लक्षित न करता त्या भरून काढण्यासाठी मदत करावी.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत

१. पाठ्यपुस्तके, वह्या, लेखनसाहित्य, गणवेश किंवा इतर आवश्यक शैक्षणिक साधनांची कमतरता असलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करावी.

२. उपलब्ध शासकीय योजनांची माहिती पालकांना द्यावी आणि पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मदत करावी.

३. शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी, स्थानिक सामाजिक संस्था आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा.

४. मदत करताना विद्यार्थ्यांचा स्वाभिमान जपावा. गरजू विद्यार्थ्यांना वर्गासमोर वेगळे पाडू नये.

५. कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षण सोडण्याच्या स्थितीत असल्यास त्याच्या कुटुंबाशी संवाद साधून योग्य मदत मिळवून द्यावी.

विद्यार्थी उपस्थिती आणि स्थलांतरावर लक्ष

१. सलग अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्याची तातडीने दखल घ्यावी.

२. अनुपस्थितीमागील कारणे जाणून घेण्यासाठी शिक्षकांमार्फत पालकांशी संपर्क साधावा.

३. रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी संबंधित शाळा, स्थानिक शिक्षण अधिकारी आणि इतर यंत्रणांशी समन्वय साधावा.

४. शक्य आणि आवश्यकतेनुसार स्थलांतरित विद्यार्थ्यांना शैक्षणिक नोंदी, पाठ्यपुस्तके आणि अध्ययन साहित्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.

५. स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी लागू असलेल्या शासकीय तरतुदींची अंमलबजावणी करावी.

मानसिक आरोग्य आणि सुरक्षितता

१. विद्यार्थ्यांमध्ये भीती, चिंता, चिडचिड, निराशा किंवा एकाग्रतेचा अभाव दिसल्यास शिक्षकांनी त्याकडे संवेदनशीलतेने लक्ष द्यावे.

२. विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या मोकळेपणाने सांगता येतील असे विश्वासपूर्ण वातावरण निर्माण करावे.

३. आवश्यकतेनुसार प्रशिक्षित समुपदेशक, विशेष शिक्षक, आरोग्य कर्मचारी किंवा संबंधित बालसंरक्षण यंत्रणांची मदत घ्यावी.

४. विद्यार्थ्याच्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीची किंवा वैयक्तिक समस्यांची सार्वजनिक चर्चा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

५. संकटाच्या काळात विद्यार्थ्यांना दोष देणे, अपमानित करणे किंवा अनावश्यक शैक्षणिक दबाव टाकणे टाळावे.

शिक्षकांची भूमिका आणि कर्तव्ये

शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ असतो. दुष्काळाच्या काळात शिक्षकांनी अध्यापनाबरोबरच निरीक्षण, प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि समुपदेशनाची पूरक भूमिका बजावणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवणे

१. विद्यार्थ्यांच्या वर्तनातील, उपस्थितीतील आणि अध्ययनातील बदलांचे निरीक्षण करावे.

२. विद्यार्थ्याच्या अभ्यासातील घसरणीमागे आळस किंवा निष्काळजीपणा आहे, असा निष्कर्ष त्वरित काढू नये.

३. पाणी आणणे, शेतीकाम, जनावरांची काळजी किंवा घरातील जबाबदाऱ्या यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळत आहे का, हे समजून घ्यावे.

४. आर्थिक अडचणींमुळे आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्यास पर्यायी साधनांचा वापर करून अध्ययन सुरू ठेवण्यास मदत करावी.

५. विद्यार्थ्याच्या अडचणींची नोंद गोपनीयतेने करून आवश्यकतेनुसार मुख्याध्यापकांना कळवावे.

कमी साधनांत प्रभावी अध्यापन

१. विद्यार्थ्यांना घरी महागडी शैक्षणिक साधने किंवा अतिरिक्त पुस्तके खरेदी करण्यास सांगण्याऐवजी उपलब्ध साधनांचा वापर करावा.

२. वर्गात शिकवलेल्या संकल्पनांची उजळणी, प्रश्नोत्तरे, गटचर्चा आणि कृतीआधारित अध्ययन यांचा वापर करावा.

३. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे लहान, साध्य होणारे टप्पे निश्चित करून द्यावेत.

४. उपस्थिती अनियमित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अध्ययन साहित्य, स्वाध्याय आणि महत्त्वाच्या संकल्पनांची संक्षिप्त नोंद उपलब्ध करून द्यावी.

५. मोबाईल किंवा इंटरनेट सर्व विद्यार्थ्यांकडे उपलब्ध आहे, असे गृहीत धरू नये. डिजिटल साधने वापरताना ऑफलाइन पर्यायही उपलब्ध ठेवावेत.

अध्ययनातील उणिवा भरून काढणे

१. विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन, गणित आणि विषयज्ञानातील उणिवा ओळखाव्यात.

२. उणिवांची भरपाई करण्यासाठी दररोज किंवा आठवड्यातून ठरावीक वेळ पूरक अध्ययनासाठी राखून ठेवावा.

३. प्रगत विद्यार्थ्यांच्या मदतीने सहाध्ययनाची व्यवस्था करता येईल; मात्र त्यांच्यावर अध्यापनाची जबाबदारी टाकू नये.

४. विद्यार्थ्याच्या प्रगतीचे नियमित निरीक्षण करून त्यांना विधायक अभिप्राय द्यावा.

५. परीक्षेच्या काळात केवळ गुणांवर भर न देता समज, कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे.

भावनिक आधार आणि समुपदेशन

१. विद्यार्थ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे आणि त्यांच्या भावनांना मान्यता द्यावी.

२. संकटामुळे निर्माण होणारी चिंता ही स्वाभाविक असू शकते, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगावे.

३. विद्यार्थ्यांमध्ये आशावाद, समस्या सोडवण्याची क्षमता आणि परस्पर सहकार्याची भावना विकसित करावी.

४. वारंवार उदास राहणे, मित्रांपासून दूर जाणे, तीव्र भीती किंवा स्वतःला इजा करण्याविषयी बोलणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने योग्य मदत मिळवून द्यावी.

५. शिक्षकांनी स्वतःला प्रशिक्षित समुपदेशक समजू नये. गंभीर मानसिक आरोग्यविषयक अडचणींसाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी.

पाणीबचत आणि पर्यावरण शिक्षण

१. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावी.

२. शाळेतील नळांची गळती, अनावश्यक पाणीवापर आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नियमित पाहणी करावी.

३. पावसाचे पाणी साठवणे, भूजल पुनर्भरण, मृदसंधारण, वृक्षसंवर्धन आणि स्थानिक जलस्रोतांचे संरक्षण यांविषयी माहिती द्यावी.

४. विद्यार्थ्यांना पाणीबचतीचे उपक्रम, जलसाक्षरता मोहिमा आणि पर्यावरणविषयक प्रकल्पांमध्ये सहभागी करून घ्यावे.

५. पाणीबचतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या किंवा स्वच्छतेच्या गरजांवर मर्यादा आणू नयेत.

भाग दुसरा- पालकांची भूमिका आणि कर्तव्ये

दुष्काळाच्या परिस्थितीत पालक आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणावातून जात असू शकतात. अशा वेळी मुलांच्या शिक्षणाला दुय्यम स्थान मिळण्याची शक्यता असते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचे संरक्षण करणे हे कुटुंबाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे.

शिक्षणाला प्राधान्य

१. आर्थिक अडचणी असल्या तरी मुलांचे शिक्षण शक्य तितके नियमित सुरू राहील, यासाठी प्रयत्न करावेत.

२. घरातील कामे किंवा शेतीकामे मुलांच्या क्षमतेनुसार आणि सुरक्षिततेचा विचार करूनच द्यावीत. शिक्षणाच्या वेळेत सातत्याने अडथळा येणार नाही, याची काळजी घ्यावी.

३. मुलांना रोजगारासाठी किंवा घरकामासाठी शाळा सोडण्यास भाग पाडू नये.

४. मुलगा आणि मुलगी यांच्या शिक्षणात भेदभाव करू नये.

५. आर्थिक अडचणींमुळे शाळेचा खर्च परवडत नसल्यास मुख्याध्यापक किंवा शिक्षकांशी चर्चा करून उपलब्ध शासकीय मदतीची माहिती घ्यावी.

घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण

१. घरात स्वतंत्र अभ्यासिका नसली तरी मुलांना ठरावीक वेळ शांतपणे अभ्यास करता येईल अशी व्यवस्था करावी.

२. रोजच्या अभ्यासासाठी साधारणतः निश्चित वेळ राखून ठेवावा.

३. मुलांनी शाळेत काय शिकले, गृहपाठ पूर्ण झाला का आणि कोणत्या अडचणी येत आहेत, याबाबत प्रेमाने विचारपूस करावी.

४. मोबाईल किंवा इंटरनेट उपलब्ध नसल्यास पाठ्यपुस्तके, शिक्षकांनी दिलेल्या नोंदी आणि स्वाध्यायाच्या आधारे अभ्यास करण्यास प्रोत्साहित करावे.

५. मुलांच्या अभ्यासाची तुलना इतर विद्यार्थ्यांशी करू नये; त्यांच्या स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.

मानसिक आधार आणि संवाद

१. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांची चर्चा करताना मुलांना असुरक्षित वाटणार नाही, याची काळजी घ्यावी.

२. मुलांच्या प्रश्नांना त्यांच्या वयानुसार सोपी आणि सत्य माहिती द्यावी.

३. आपली परिस्थिती कठीण आहे, पण आपण एकत्र प्रयत्न करू, असा विश्वास मुलांना द्यावा.

४. कमी गुण मिळाल्यास किंवा अभ्यासात मागे पडल्यास मुलांना दोष देण्याऐवजी अडचणी समजून घ्याव्यात.

५. मुलांना पुरेशी विश्रांती, सुरक्षित वातावरण, भावनिक जवळीक आणि आवश्यक तेवढा खेळ व मनोरंजनाचा वेळ द्यावा.

आरोग्य आणि सुरक्षितता

१. मुलांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा.

२. उष्णतेच्या काळात शारीरिक श्रम, उन्हात फिरणे आणि पाण्याअभावी होणारा त्रास यांपासून मुलांचे संरक्षण करावे.

३. मुलांना पाणी आणण्यासाठी दूरवर पाठवावे लागत असल्यास त्यांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यावे.

४. मुलांना धोकादायक शेतीकामे, अवजड कामे किंवा आरोग्यास अपायकारक कामे करण्यास सांगू नये.

५. मुलांच्या आरोग्यात बिघाड झाल्यास योग्य वैद्यकीय मदत घ्यावी.

स्थलांतराच्या परिस्थितीत

१. रोजगारासाठी स्थलांतर करण्याची वेळ आल्यास मुलांच्या शिक्षणाचे पुढील नियोजन आधी करावे.

२. संबंधित शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना परिस्थितीची माहिती द्यावी.

३. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, पाठ्यपुस्तके आणि आवश्यक नोंदी सुरक्षित ठेवाव्यात.

४. स्थलांतराच्या ठिकाणी शाळा किंवा पर्यायी शैक्षणिक सुविधांची माहिती घ्यावी.

५. मुलांना शक्यतो शिक्षणापासून पूर्णपणे दूर ठेवणारे निर्णय टाळावेत.

भाग तिसरा – विद्यार्थ्यांची भूमिका आणि कर्तव्ये

दुष्काळाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत, उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून आणि शिक्षक व पालकांच्या सहकार्याने शैक्षणिक प्रगती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा.

अभ्यासातील सातत्य

१. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी अभ्यासाशी असलेले नाते टिकवून ठेवावे.

२. दररोजच्या अभ्यासासाठी स्वतःचे छोटे वेळापत्रक तयार करावे.

३. शाळेत शिकवलेल्या धड्यांची घरी उजळणी करावी.

४. एखादा धडा समजला नाही किंवा अभ्यासात अडचण आली तर शिक्षक, पालक किंवा मित्रांची मदत घ्यावी.

५. गैरहजेरीमुळे राहिलेला अभ्यास शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

अभ्यासाचे नियोजन

१. सर्व विषयांचा अभ्यास थोड्या-थोड्या वेळेत नियमित करावा.

२. कठीण विषयांना अधिक वेळ द्यावा; मात्र सोपे विषय पूर्णपणे दुर्लक्षित करू नयेत.

३. मोठा अभ्यास लहान टप्प्यांमध्ये विभागावा.

४. परीक्षेच्या काळात शेवटच्या क्षणी सर्व अभ्यास करण्याऐवजी नियमित उजळणी करावी.

५. मोबाईल किंवा इंटरनेट उपलब्ध नसले तरी पुस्तकांच्या आधारे अभ्यास करण्याची सवय विकसित करावी.

आरोग्याची काळजी

१. तहान लागल्यावरच नव्हे, तर दिवसभर सुरक्षित पाणी पिण्याची काळजी घ्यावी.

२. उष्णतेमुळे चक्कर येणे, अशक्तपणा, डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवल्यास त्वरित शिक्षक किंवा पालकांना सांगावे.

३. उन्हात अनावश्यक फिरणे आणि अतिश्रम करणे टाळावे.

४. पाणी कमी उपलब्ध असले तरी हात धुणे, स्वच्छता आणि वैयक्तिक आरोग्य यांकडे दुर्लक्ष करू नये.

५. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी.

पाणीबचत आणि पर्यावरण संवर्धन

१. नळ उघडा राहणार नाही याची काळजी घ्यावी.

२. पाण्याचा वापर आवश्यकतेपुरता करावा.

३. शाळा व घरातील पाण्याची गळती दिसल्यास मोठ्यांना सांगावे.

४. झाडे, माती, स्थानिक जलस्रोत आणि नैसर्गिक संपत्ती यांचे संरक्षण करावे.

५. पाणीबचतीचा संदेश मित्र, कुटुंबीय आणि समाजातील इतर व्यक्तींपर्यंत पोहोचवावा.

मानसिक बळ आणि सहकार्य

१. दुष्काळामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबद्दल मनात भीती किंवा चिंता असल्यास पालक, शिक्षक किंवा विश्वासू प्रौढ व्यक्तीशी बोलावे.

२. मित्रांची आर्थिक परिस्थिती किंवा शैक्षणिक अडचणी यांवरून त्यांची चेष्टा करू नये.

३. गरजू मित्रांना अभ्यासातील मदत करावी.

४. अपयश आले तरी प्रयत्न सुरू ठेवावेत.

५. कोणत्याही अडचणीमुळे शिक्षण सोडण्याचा विचार मनात आल्यास त्वरित पालक किंवा शिक्षकांशी चर्चा करावी.

विद्यार्थ्यांसाठी संदेश: “दुष्काळ आपल्या परिसरात असू शकतो; पण आपल्या स्वप्नांमध्ये दुष्काळ पडू देऊ नका. परिस्थिती कठीण असली तरी शिक्षणाच्या मदतीने उज्ज्वल भविष्य घडवता येते.”

भाग चौथा – सामान्य नागरिक आणि ग्रामसमाजाची भूमिका

विद्यार्थ्याचे शिक्षण ही केवळ शाळेची किंवा पालकांची जबाबदारी नाही. दुष्काळाच्या काळात संपूर्ण गावाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासन

१. शाळेतील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि सुरक्षितता यांचा नियमित आढावा घ्यावा.

२. शाळेतील पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्यास पर्यायी व्यवस्थेसाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधावा.

३. शाळेतील स्वच्छतागृहे वापरण्यायोग्य राहतील यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

४. गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने मदत उभारावी.

५. गावातील स्थलांतरित कुटुंबे आणि शाळाबाह्य होण्याच्या धोक्यात असलेल्या मुलांची माहिती संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवावी.

शाळा व्यवस्थापन समिती

१. शाळेतील पाणी, स्वच्छता, उपस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा.

२. शाळेच्या गरजा निश्चित करून उपलब्ध साधनसंपत्तीचा प्राधान्यक्रमाने वापर करावा.

३. आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पालक व ग्रामस्थांशी समन्वय साधावा.

४. पालक बैठकीत दुष्काळाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाय यांची चर्चा करावी.

५. शाळा, ग्रामपंचायत आणि शिक्षण विभाग यांच्यात प्रभावी समन्वय ठेवावा.

सामाजिक संस्था आणि माजी विद्यार्थी

१. गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा.

२. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडण्याच्या स्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मदत मिळवून द्यावी.

३. स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन आणि शैक्षणिक समुपदेशनासाठी स्वयंसेवी सहकार्य उपलब्ध करून द्यावे.

४. शाळेच्या पाणीबचत आणि पर्यावरण संवर्धन उपक्रमांना सहकार्य करावे.

५. विद्यार्थ्यांना मदत करताना त्यांचा स्वाभिमान, गोपनीयता आणि सुरक्षितता जपावी.

बालसंरक्षण आणि सामाजिक जबाबदारी

दुष्काळाच्या काळात बालमजुरी, शाळाबाह्य होणे, बालविवाह आणि असुरक्षित स्थलांतराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी अशा घटनांकडे दुर्लक्ष करू नये.

१. मुलांना धोकादायक कामांमध्ये गुंतवले जात असल्याचे आढळल्यास संबंधित यंत्रणांना कळवावे.

२. शाळेतून दीर्घकाळ अनुपस्थित असलेल्या मुलांच्या परिस्थितीची संवेदनशीलतेने चौकशी करावी.

३. बालविवाह किंवा बालकांच्या शोषणाची शक्यता असल्यास संबंधित बालसंरक्षण यंत्रणांची मदत घ्यावी.

४. संकटाच्या काळात कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी गावपातळीवर सामूहिक प्रयत्न करावेत.

“मुख्याध्यापकांनी सक्षम नेतृत्व करावे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व भावनिक आधार द्यावा. पालकांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे, विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्य टिकवावे आणि ग्रामसमाजाने गरजू मुलांच्या पाठीशी उभे राहावे.”

“दुष्काळाच्या काळात विद्यार्थ्यांना केवळ पाणीबचतीचे धडे देऊन चालणार नाही; तर त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून संकट समजून घेण्याची, समस्यांवर उपाय शोधण्याची आणि जबाबदार नागरिक म्हणून उभे राहण्याची संधी द्यावी लागेल.”

“आज पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे आवश्यक आहे; त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य वाचविणेही आवश्यक आहे.”

“आजच्या प्रतिकूल परिस्थितीत दिलेला योग्य शैक्षणिक आधार विद्यार्थ्यांना उद्याच्या संकटांचा सामना करण्यासाठी सक्षम करेल. त्यामुळे प्रत्येक शाळा ही केवळ ज्ञानदानाची संस्था न राहता संकटाच्या काळात विद्यार्थ्यांना आधार देणारे सुरक्षित, संवेदनशील आणि प्रेरणादायी केंद्र बनली पाहिजे.”

सामूहिक संकल्प

  • “दुष्काळाच्या संकटात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू देणार नाही.”
  • “पाण्याचा प्रत्येक थेंब जपू. नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करू.”
  • “विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करू.”
  • “शाळा, शिक्षक, पालक आणि समाज यांच्या समन्वयातून प्रत्येक मुलाचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित ठेवू.”
  • “संकटावर मात करू. शिक्षणाची ज्योत तेवत ठेवू!”

दुष्काळ सर्वसमावेशक कृती आराखडा PDF

दुष्काळाच्या संकटात विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवणे ही केवळ शाळेची संपूर्ण जबाबदारी नसून शिक्षक, पालक आणि संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. योग्य नियोजन, विद्यार्थ्यांना भावनिक आधार, शैक्षणिक साहित्याची उपलब्धता आणि शाळा व ग्रामसमाजातील समन्वय यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित ठेवण्यासाठी प्रयत्न करता येतात. दुष्काळाच्या संकटात शैक्षणिक आधार, सर्वसमावेशक कृती आराखडा जालना जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील सर्व शाळांना देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी कृती आराखडा PDF येथे डाउनलोड करा.

“संकटावर मात करू, शिक्षणाची ज्योत तेवत ठेवू!” हा संदेश लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.

Related
राज्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment