Scout Guide Training 2026 : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे १ लाख ८ हजार शाळांमधील २ कोटी १० लाख विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण देण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी निर्देश दिले आहेत.
सध्या राज्यातील सुमारे ३० हजार शाळांमधील १७ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण दिले जात आहे. आता या उपक्रमाची व्याप्ती सर्व माध्यमांच्या शाळांपर्यंत वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईड उपक्रमाचा विस्तार
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईड उपक्रम राबविण्याबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच राष्ट्रप्रेम, शिस्त आणि संघभावनेचे महत्त्व समजावे, या उद्देशाने स्काऊट-गाईड प्रशिक्षणाची व्याप्ती वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजात ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना केंद्रस्थानी असल्याने प्रत्येक शाळेत स्काऊट-गाईड उपक्रम असणे आवश्यक असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
आनंददायी शनिवार उपक्रमात 2 तासिका
स्काऊट-गाईड प्रशिक्षण अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमाचा उपयोग करण्यात येणार आहे. या अंतर्गत आठवड्यातून दोन तासिका स्काऊट-गाईड उपक्रमासाठी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यामध्ये परेड, संचलन तसेच देशभक्तिपर गीतांवरील कवायतींचा समावेश करण्याचे सांगण्यात आले आहे. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, एकजुटीची भावना आणि देशाविषयी अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शिक्षकांना तालुकास्तरावर 7 दिवसांचे प्रशिक्षण
शाळांमध्ये स्काऊट-गाईड उपक्रम व्यवस्थित राबविता यावा, यासाठी शिक्षकांना तालुकास्तरावर 7 दिवसांचे प्रशिक्षण देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे मार्गदर्शन करता येणार आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण शुल्क आणि प्रशिक्षकांचे मानधन शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येईल, असेही मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.
स्काऊट-गाईड पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणांत वाढ होणार?
स्काऊट-गाईडमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्तरावर प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची बाब बैठकीत मांडण्यात आली.
सध्या राज्य पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना 3 गुण, तर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना 10 गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मात्र, गुणांमध्ये प्रत्यक्ष किती वाढ होणार आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार, याबाबत अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल.
स्काऊट-गाईड उपक्रमाच्या विस्ताराबाबत झालेल्या या बैठकीला प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह (ऑनलाईन), NCERT चे संचालक मंगेश जोशी (ऑनलाईन), उपसचिव तुषार महाजन आणि स्काऊट-गाईडचे सहायक राज्य सचिव रमेश जाधव यांच्यासह शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षणाची (Scout Guide Training) व्याप्ती वाढविण्याच्या या निर्णयामुळे शाळांमध्ये उपक्रमाचे नियोजन, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यांना महत्त्व प्राप्त होणार आहे.










