TAIT Exam 2025 Clarification : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-2025 मध्ये 64 उमेदवारांनी एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिल्याची आणि त्यातील उमेदवारांची पवित्र पोर्टलमार्फत निवड झाल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर विभागाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
विभागाच्या पडताळणीनुसार, व्हायरल होत असलेल्या यादीतील 64 उमेदवारांच्या नावांमध्ये साधर्म्य आढळून येत असल्याने प्रथमदर्शनी हे उमेदवार एकच असल्याचे दिसून येते. मात्र, आधार क्रमांक, जन्मतारीख, आईचे नाव, ई-मेल आणि मोबाईल क्रमांक आदी माहितीच्या आधारे पडताळणी केली असता हे उमेदवार वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकरणाच्या अनुषंगाने TAIT-2025 परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांनी दुबार परीक्षा दिली आहे किंवा नाही, याबाबत पडताळणी करण्यात आली असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, TAIT-2025 च्या वेळी काही उमेदवारांनी अपूर्ण अर्ज, चुकीचा अर्ज किंवा अन्य विविध कारणांमुळे एकापेक्षा अधिक अर्ज केले होते. मात्र, अशा उमेदवारांना कोणत्याही एका ठिकाणीच परीक्षा देता येईल, तर उर्वरित प्रवेशपत्रे जमा करण्याच्या सूचना प्रवेशपत्रावरच देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना दुबार परीक्षा देता येणार नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
तसेच, काही उमेदवारांनी माहिती लपवून अथवा माहितीमध्ये तफावत दाखवून दिशाभूल करून निवड प्रक्रियेत सहभाग घेतल्याचे आढळून आल्यास त्यांची पडताळणी केली जाईल. अशा प्रकारच्या उमेदवाराची निवड झाल्याचे आढळल्यास, कोणत्याही टप्प्यावर संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून त्यांची निवड रद्द केली जाऊ शकते, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे TAIT-2025 मधील दुबार परीक्षा आणि पवित्र पोर्टलवरील निवडीबाबत सोशल मीडिया किंवा प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत असलेल्या माहितीबाबत अधिकृत पडताळणीशिवाय निष्कर्ष काढू नये, असे या स्पष्टीकरणातून स्पष्ट होते.
अधिक माहितीसाठी भेट द्या : https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/
पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना












