SCERT School Time Table 2026-27: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020), राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-SE 2023) आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF-SE 2024) नुसार राज्यातील इयत्ता ३ री ते ८ वीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र यांनी इयत्ता ३ री ते ८ वीच्या शाळांसाठी विषययोजना, शालेय कामकाजाचे दिवस, विषयनिहाय तासिका विभाजन आणि शालेय वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, याबाबतचे अधिकृत परिपत्रक नवीन शैक्षणिक (2026-27) वर्षाच्या सुरुवातीलाच जारी केले आहे.
या परिपत्रकानुसार शाळांनी नवीन अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक तयार करणे आवश्यक असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ३ री आणि ६ वीमध्ये ही अंमलबजावणी सुरू झाली आहे.
नवीन शालेय वेळापत्रक निश्चित करण्याचा उद्देश काय?
SCERT ने दिनांक 12 जून 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकाचा मुख्य उद्देश हा नवीन अभ्यासक्रमानुसार प्रत्येक विषयासाठी आवश्यक अध्यापन तास निश्चित करणे, शाळेच्या कामकाजाचे दिवस निश्चित करणे आणि सर्व शाळांमध्ये समान शैक्षणिक नियोजन (शालेय वेळापत्रक) सुनिश्चित करणे हा आहे. यासाठी यापूर्वीच्या २०१७ च्या परिपत्रकात सुधारणा करून नवीन शालेय वेळापत्रक लागू करण्यात आले आहे.

शाळेच्या वार्षिक कामकाजाचे नियोजन
SCERT ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, शाळांचे वार्षिक कामकाज निश्चित करण्यात आले आहे.

वर्षातील एकूण ३६५ दिवसांपैकी २३७ दिवस शालेय कामकाजासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये २१० दिवस नियमित अध्यापन-अध्यापन कृती (वर्गकार्य), १४ दिवस परीक्षा, मूल्यमापन व इतर शैक्षणिक कामांसाठी तर दप्तराविना शाळा, शैक्षणिक सहल, शिबीर यांसारख्या सहशालेय उपक्रमांसाठी १३ दिवस निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित १२८ दिवसांमध्ये सुट्ट्यांच्या १२८ दिवसांमध्ये ५२ रविवार आणि ७६ इतर सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे.
या नियोजनानुसार प्रत्येक शाळेला आपले वार्षिक शैक्षणिक कॅलेंडर आणि शालेय वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. एका सत्रात भरणाऱ्या शाळा आणि दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांसाठी वेळेची विभागणी स्वतंत्रपणे देण्यात आली आहे.
इयत्ता ३ री ते ५ वीसाठी नवीन विषय योजना
नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता ३ री ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयरचनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी (R-1), इंग्रजी (R-2), प्रचलित पद्धतीनुसार भाषा, गणित, ‘आपल्या सभोवतालचे जग’ भाग १ व २, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण व निरामयता आणि कार्यशिक्षण हे विषय शिकवले जाणार आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी (R-1) आणि मराठी (R-2) अशी भाषा रचना असेल, तर इतर माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यम भाषा (R-1), इंग्रजी (R-2) आणि मराठी (R-3) यांचा समावेश असेल. याशिवाय स्काऊट-गाईड हा ऐच्छिक उपक्रम म्हणून ठेवण्यात आला आहे.
इयत्ता ६ वी ते ८ वीसाठी विषय योजना
इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमात विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी (R-1), इंग्रजी (R-2), प्रचलित पद्धतीनुसार भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण व निरामयता तसेच कार्यशिक्षण हे विषय शिकवले जातील. इंग्रजी आणि इतर माध्यमांच्या शाळांमध्येही याच धर्तीवर भाषांमध्ये आवश्यक बदल करून समान विषयरचना लागू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्काऊट-गाईड हा ऐच्छिक उपक्रम देखील सुरू राहणार आहे.
त्रिभाषा धोरणाबाबत नेमका निर्णय काय?
त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीचा अंतिम शासन निर्णय होईपर्यंत सध्या प्रचलित अभ्यासक्रम आणि सद्यस्थितीतील पाठ्यपुस्तकांचा वापर सुरू ठेवण्याच्या सूचना SCERT ने दिल्या आहेत. विशेषतः इयत्ता ६ वी पासून लागू असलेली तिसऱ्या भाषेची विद्यमान पद्धत नवीन धोरण आणि नवीन अभ्यासक्रम पूर्णपणे लागू होईपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे शाळांनी सध्याच्या भाषा रचनेनुसारच अध्यापन सुरू ठेवावे.
कार्यानुभव विषयाचे नाव बदलले
नवीन अभ्यासक्रमात ‘कार्यानुभव‘ या विषयाचे नाव बदलून ‘कार्यशिक्षण’ असे करण्यात आले आहे. केवळ नावात बदल करण्यात आला असून, या विषयामध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास, कृतीआधारित शिक्षण आणि जीवनोपयोगी अनुभवांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे.
विषयनिहाय तासिका विभागाणी व शालेय वेळापत्रकाबाबत सूचना
SCERT ने स्पष्ट केले आहे की, इयत्ता ३ री, ४ थी, ६ वी आणि ७ वीसाठी नवीन तासिका विभाजन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू होईल. इयत्ता ५ वी आणि ८ वीसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यानंतर त्यानुसार सुधारित तासिका लागू करण्यात येतील.

परिपत्रकात दिलेले साप्ताहिक वेळापत्रक हे केवळ नमुना असून स्थानिक गरजेनुसार शाळांना त्यात बदल करण्याची मुभा असेल. मात्र कोणत्याही विषयासाठी निश्चित केलेले साप्ताहिक किंवा वार्षिक अध्यापन तास कमी करता येणार नाहीत.
काही विषयांसाठी सलग दोन तासिका ठेवण्यात आल्या असून त्या कालावधीत कृतीआधारित, प्रात्यक्षिक आणि सरावाधारित अध्यापन करणे अपेक्षित आहे.
एक सत्र आणि दोन सत्रांमध्ये चालणाऱ्या शाळांमध्ये अध्यापनाचा कालावधी समान राहील. केवळ प्रार्थना, मधली सुटी आणि अतिरिक्त समृद्धीकरण तासिकांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करता येतील.
AEP (Additional Enrichment Period) म्हणजे काय?
AEP म्हणजे (Additional Enrichment Period) अतिरिक्त समृद्धीकरण तासिका होय. या तासिकांचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजेनुसार अतिरिक्त मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे. या वेळेत उपचारात्मक अध्यापन, अवघड विषयांचा अतिरिक्त सराव, स्पर्धा परीक्षा तयारी, पुनरावृत्ती, कौशल्य विकास आणि इतर शैक्षणिक उपक्रम राबवता येतील.
कोणत्या विषयासाठी AEP वापरायची हे संबंधित शाळेच्या गरजेनुसार मुख्याध्यापक ठरवू शकतात. दोन सत्रांमध्ये चालणाऱ्या शाळांमध्ये स्वतंत्र AEP तासिका नसल्यास वेळापत्रकात योग्य बदल करून त्याची अंमलबजावणी करावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
स्काऊट-गाईड आणि आनंददायी शनिवार
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्काऊट-गाईड आणि आनंददायी शनिवार यांसारखे सह शालेय उपक्रम नियमित वर्गाच्या वेळेबाहेर आयोजित करण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त, सामाजिक जबाबदारी, संघभावना आणि विविध जीवनकौशल्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे.
मूल्यवर्धन उपक्रम
SCERT च्या दि. 2/9/2025 रोजीच्या पत्रानुसार, इयत्ता ६वी ते ८वीमध्ये मूल्यवर्धन उपक्रमासाठी स्वतंत्र तासिकांचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या शाळांमध्ये हा उपक्रम लागू आहे त्यांनी शासनाच्या विद्यमान सूचनांनुसार त्याची अंमलबजावणी करावी. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव, सकारात्मक विचार आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करण्यासाठी या उपक्रमांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
शालेय शिक्षण (पूर्वतयारी स्तर) इयत्ता 3 री ते 5 वी विषय निहाय तासिका व भारांश
शालेय शिक्षण (पूर्वतयारी स्तर) इयत्ता 3 री ते 5 वी विषय निहाय तासिका व भारांश खालीलप्रमाणे

शालेय शिक्षण (पूर्वमाध्यमिक स्तर) इयत्ता 6 वी ते 8 वी विषय निहाय तासिका व भारांश
शालेय शिक्षण (पूर्वमाध्यमिक स्तर) इयत्ता 6 वी ते 8 वी विषय निहाय तासिका व भारांश खालीलप्रमाणे

इयत्ता 3 री ते 4 थी शालेय वेळापत्रक
इयत्ता तिसरी ते चौथी (शालेय नमुना वेळापत्रक) मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी

इयत्ता 5 वी शालेय वेळापत्रक
इयत्ता तिसरी ते चोथी मराठी व इंग्रजी वगळून अन्य माध्यमांसाठी (नमुना वेळापत्रक) आणि इयत्ता पाचवी सर्व माध्यमांसाठी

इयत्ता 6 वी ते 8 वी शालेय वेळापत्रक
इयत्ता सहावी ते आठवी सर्व माध्यमांसाठी (शालेय नमुना वेळापत्रक)

शालेय वेळापत्रक PDF
| शालेय वेळापत्रक 2026-27 | PDF Download |
| SCERT Maharashtra | Official Website |
निष्कर्ष
एकंदरीत नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी SCERT ने इयत्ता ३ री ते ८ वीसाठी विषययोजना, शालेय कामकाजाचे दिवस आणि विषयनिहाय शालेय वेळापत्रक (School Time Table 2026-27) बाबतचे सविस्तर स्पष्ट मार्गदर्शन दिले आहे. शाळांनी यानुसार शालेय वेळापत्रक तयार करून अध्यापनाचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शक आहे. तसेच कोणत्याही विषयाच्या अध्यापन तासांमध्ये कपात न करता विद्यार्थीकेंद्रित आणि कृतीआधारित शिक्षणावर भर देण्याच्या सूचनाही या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.









