Anganwadi Sevika Gratuity : पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून समाजातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांपर्यंत पोषण व आरोग्यविषयक सेवा पोहोचविण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना उपदान अर्थात ग्रॅच्युइटी (Gratuity) देण्याबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचेही मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प योजनेअंतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ९ व्या राष्ट्रीय पोषण माहाचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यंदाचा पोषण माह ‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित आहे.
कार्यक्रमाला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, सहआयुक्त संगिता लोंढे, विजय क्षीरसागर, आयुषचे सहायक संचालक सुश्रृत मुक्कावार यांच्यासह विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
बालके, माता यांच्या आरोग्यावर विशेष भर
पोषण माहाच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांच्या आहार व आरोग्याबाबत जनजागृती करण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे. यासाठी महिला व बालविकास विभागासोबत आरोग्य आणि आयुष विभागाने समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी जन्मापासूनच योग्य पद्धतीने शिशु अभ्यंग मिळणे आवश्यक आहे. त्याचे महत्त्व मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंदाच्या पोषण माहात आयुष विभागाचा सहभाग घेण्यात आला आहे. आयुष विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मार्गदर्शन देऊन ही माहिती मातांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर भर
यंदाच्या पोषण माहात ‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून अंगणवाडी केंद्रे अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.
डिजिटल अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध असलेल्या स्क्रीनवर आयुष विभागाने तयार केलेले आरोग्य आणि पोषणविषयक व्हिडिओ नियमितपणे दाखवावेत. तसेच या व्हिडिओमधील महत्त्वाची माहिती गरोदर आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
८१७ अंगणवाड्या होणार सक्षम
सक्षम अंगणवाडी प्रकल्प योजनेअंतर्गत स्नेहा सामाजिक संस्था आणि एकात्मिक बालविकास सेवा यांच्यात करार करण्यात आला आहे.
या करारानुसार मुंबईतील ८१७ अंगणवाड्या आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज करून सक्षम करण्यासाठी काम केले जाणार आहे. त्यामुळे या अंगणवाडी केंद्रांमधून बालके आणि मातांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमात आयुषच्या डॉ. शुभांगी ठाकूर यांनी बालकांचा मसाज आणि काळजी याबाबत सादरीकरणातून मार्गदर्शन केले. आरसीएचच्या डॉ. उपाली वाघमारे यांनी ‘ॲनिमिया’ या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी आयुक्त माधवी सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या एकात्मिक बालविकास सेवेच्या रंगीत लोगोचे, वेबपेजचे आणि ‘पोषण आहार प्रार्थने’चे उद्घाटन करण्यात आले.
उत्कृष्ट जिल्ह्यांचा गौरव

गेल्या वर्षीच्या ८व्या राष्ट्रीय पोषण माहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वर्धा, हिंगोली आणि नागपूर जिल्हा कार्यालयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
वर्धाच्या जिल्हा कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे व सहकारी, हिंगोलीचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विजय बोराटे आणि नागपूरचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कैलास घोडके यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वर्धा, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये मनिषा कुरसंगे, मुंबई जिल्हा कार्य अधिकारी प्रेमा घाडगे, मुंबई उपनगर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे, पर्यवेक्षक भाऊसाहेब बोरकर आणि नाशिकचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांचा गौरव करण्यात आला.
याशिवाय ज्योती गायकवाड, शुभांगी लोहकर आणि कांता गायकवाड या अंगणवाडी सेविकांचाही योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात प्रीशा धीवर, स्वामिनी कोलहाले आणि सुनिता मोगल या लाभार्थ्यांना योजनेच्या लाभाच्या रकमेचे धनादेश वितरित करण्यात आले.
तसेच लेक लाडकी योजनेचा लाभ आता DBT (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.














